रसायनाच्या स्फोटात महिला ठार
By Admin | Published: August 19, 2016 01:03 AM2016-08-19T01:03:00+5:302016-08-19T01:05:08+5:30
औरंगाबाद : चिकलठाणा शिवारातील नवपुते वस्ती येथे फायबर दरवाजे आणि कूलरच्या बंद पडलेल्या कारखान्यात केमिकलच्या कॅनीचा भीषण स्फोट झाला.
औरंगाबाद : चिकलठाणा शिवारातील नवपुते वस्ती येथे फायबर दरवाजे आणि कूलरच्या बंद पडलेल्या कारखान्यात केमिकलच्या कॅनीचा भीषण स्फोट झाला. या स्फोटात कारखान्याची मालकीण जागीच ठार झाली. स्फोट एवढा भीषण होता की, मृत महिलेल्या शरीराच्या चिंधड्या आणि रक्त-मांसाचे तुकडे संपूर्ण वर्कशॉपमध्ये उडाले. ही घटना गुरुवारी सकाळी पावणेदहा वाजेच्या सुमारास घडली.
मीरा ज्ञानेश्वर रुद्राके (४६,रा. नवपुते वस्ती, चिकलठाणा शिवार) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या पती, मुलगा अविनाश आणि अक्षय, मुलगी सायली आणि सून मनीषा यांच्यासह नवपुते वस्ती येथे राहत. १८०० चौरस फूट क्षेत्रफळाचा त्यांचा भूखंड आहे.
यापैकी सहाशे चौरस फुटांवर त्यांचे पत्र्याचे घर असून बाराशे चौरस फुटावर कूलर आणि फायबर दरवाजे बनविण्याचा कारखाना होता. २००६ ते २०१२ पर्यंत त्यांचा हा कारखाना सुरू होता. त्यानंतर त्यांनी हा कारखाना बंद करून वेल्डिंग वर्कशॉप सुरू केले. हे वर्कशॉप बीड बायपास परिसरातील माऊलीनगर येथे आहे. बंद पडलेल्या कारखान्याशेजारीच त्यांनी बांधलेल्या घरात रूद्राके कुटुंब अडीच महिन्यांपूर्वी राहण्यास गेले. राखी पौर्णिमा असल्यामुळे त्यांचे पती ज्ञानेश्वर आणि मुलगा अविनाश हे मोटारसायकलने सकाळी ९ वाजेच्या सुमारास नेवासा येथे राहणाऱ्या चुलत बहिणीकडे गेले होते. त्यामुळे घरी मीरा, मोठा मुलगा अक्षय, मुलगी सायली आणि सून मनीषा होते. मीरा या भिंतीला लागून असलेल्या चोहोबाजूने लोखंडी पत्रे लावलेल्या जुन्या कारखान्यात गेल्या. तेथे त्या काही तरी काम करीत असताना अचानक मोठा स्फोट झाला.
या स्फोटात मीराबाईच्या शरीराच्या चिंधड्या उडाल्या. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी सिडको पोलीस, बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल झाले.
केमिकल स्फोटाची दुसरी घटना
केमिकलच्या स्फोटात सामान्यांचे बळी जाण्याची एक महिन्यातील ही दुसरी घटना आहे. सातारा परिसरातील एका बिल्डरकडे काम करणाऱ्या वॉचमनच्या घरात ११ जुलै रोजी रात्री रंगकामासाठी वापरण्यात येणाऱ्या थीनर या केमिकलचा स्फोट झाला होता. या स्फोटात सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला तर तीन जण भाजले होते.
घरातील अन्य सदस्य बालंबाल बचावले
स्फ ोटामुळे घटनास्थळावरील वस्तू जोराने उडाल्याने शेडला लावण्यात आलेले काही पत्रे तुटले तर काही वाकडे झाले. एका पत्र्याला दगड अथवा लोखंडी वस्तू जोरात आदळून आरपार गेल्याने त्याला मोठे भगदाड पडले होते. डाव्या बाजूला त्यांच्या घराची भिंत असल्याने त्या खोलीतील कुटुंबियांना कोणतीही दुखापत झाली नाही. त्यामुळे ते बालंबाल बचावले. कारखान्याशेजारी राहणारे अन्य रहिवासीही या घटनेने हादरले.
पॉलिस्टर केमिकलचा स्फोट?
घटनास्थळी पाच ते सहा वर्षांपासून विविध केमिकल्सच्या कॅनी पडलेल्या होत्या. त्यामुळे हा स्फोट कोणत्या केमिकल्सच्या कॅनीमुळे झाला, हे तपासणीअंती स्पष्ट होईल असे फॉरेन्सिक सायन्सच्या तज्ज्ञांनी सांगितले. मात्र तेथे सर्वाधिक कॅन्स या फायबर कूलर बनिवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पॉलिस्टर (रेजिन) या केमिकल्सच्या असल्याची माहिती मृताच्या नातेवाईकांनी पोलिसांना दिली.
भयाण दृश्याने कुटुंबियांना धक्का
हा स्फोट एवढा भीषण होता की, स्फोटाचा आवाज परिसरातील दोन ते अडीच किलोमीटरपर्यंत गेला होता. अचानक झालेल्या या मोठ्या आवाजाने परिसर दणाणला. काय झाले अशी चर्चा नागरिक करीत होते.
४शेजारील आतल्या खोलीत असलेले त्यांचा मुलगा, सून आणि मुलगी हे धावतच कारखान्याकडे गेले. तेव्हा सुन्न करणारे दृश्य पाहून त्यांना चक्करच आली.
४मीरा यांच्या चेहऱ्यासह संपूर्ण शरीराच्या चिंधड्या होऊन त्या कोसळलेल्या होत्या. त्यानंतर प्रवासात असलेल्या वडील आणि भावाला अक्षयने फोन करून बोलावून घेतले.