महिला पोलीसही करतात गुन्ह्यांचा उत्तम तपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:03 AM2021-06-30T04:03:27+5:302021-06-30T04:03:27+5:30
सिटी गेस्ट पोलीस दलात येणाऱ्या महिला पुरुषांप्रमाणेच सर्व भरती प्रक्रियेतून दाखल होतात. मात्र त्या महिला आहेत, म्हणून त्यांच्या कार्यक्षमतेचा ...
सिटी गेस्ट
पोलीस दलात येणाऱ्या महिला पुरुषांप्रमाणेच सर्व भरती प्रक्रियेतून दाखल होतात. मात्र त्या महिला आहेत, म्हणून त्यांच्या कार्यक्षमतेचा वापर केला जात नव्हता.
..........................
आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसतात. महिला समानतेच्या केवळ चर्चा न करता, त्यांना पुरुषांच्या बरोबरीने संधी दिली पाहिजे. पोलीस विभागात महिला पोलिसांना वायरलेस सेट, सीसीटीएनएस अथवा आवक - जावक विभागापुरते मर्यादित न ठेवता त्यांचा गुन्ह्यांचा तपास करण्यामध्ये सहभाग असावा, यादृष्टीने आम्ही प्रयत्न केला असून त्यासाठी ‘पिंक स्कॉड’ स्थापन केले आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहनांतून गस्त करण्यासोबतच महिला पोलिसांना बीट मार्शलची जबाबदारी साेपविण्यात आली आहे. हा ‘जेंडर इक्वॅलिटी’चा भाग आहे. औरंगाबाद परिक्षेत्रातील २०७ महिला पोलीस कॉन्स्टेबल (अंमलदार) आज पुरुष अंमलदारांच्या बरोबरीने आणि अधिक कार्यक्षमतेने काम करीत असल्याचे दिसून येते. यावरून महिलांना संधी दिल्यास त्या मिळालेल्या संधीचे सोने करतात, हे लक्षात येते.
पोलीस दलात येणाऱ्या महिला पुरुषांप्रमाणेच सर्व भरती प्रक्रियेतून दाखल होतात. मात्र त्या महिला आहेत, म्हणून त्यांच्या कार्यक्षमतेचा वापर केला जात नव्हता. त्यांना पोलीस ठाण्यातील आवक - जावकचे काम करणे, वायरलेस सेट सांभाळणे अथवा सीसीटीएनएस प्रणालीचे काम सोपविले जात होते. पुरुष अंमलदाराप्रमाणे महिला पोलीस हवालदारही गुन्ह्याचा तपास करू शकतात, त्यांनाही गस्त दिली जाऊ शकते, याविषयी विचार मनात आला. यादरम्यान एका पोलीस ठाण्याला भेट दिली, तेव्हा एका महिला पोलीस काॅन्स्टेबल (अंमलदार)ने गुन्ह्याचा उत्तम तपास केल्याचे दिसून आले. तेव्हा परिक्षेत्रातील औरंगाबाद, जालना, बीड आणि उस्मानाबाद या चार जिल्ह्यांतील महिला पोलीस अधिकारी, हवालदार आणि काॅन्स्टेबल यांचे पिंक स्कॉड तयार करण्यात आले. महिलांसंबंधित गुन्ह्यांच्या तपासाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली. ही जबाबदारी पिंक स्कॉड उत्तमरित्या निभावत आहे. जेव्हा त्यांच्याकडे गुन्ह्याचा तपास नसेल, तेव्हा त्यांनी शाळा- महाविद्यालयांत जाऊन (महाविद्यालये सुरू झाल्यावर) लैंगिक अत्याचार कसा आणि कोणाकडून होऊ शकतो, अत्याचाराची तक्रार कोणाकडे करावी, याविषयी मार्गदर्शन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलाच्या अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी लिंगभेदावर जनजागृती करण्यासाठी महाविद्यालय आणि शाळकरी मुलांमध्ये जनजागृती करण्यासाठी अभिन्न हा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली. या स्तुत्य उपक्रमाचे चांगले परिणाम आगामी काळात दिसतील, असा विश्वास वाटतो.