महिलांनो, तुम्हीच करा तुमची सुरक्षा; पॅनिक बटण दाबत राहू नका,मदतीला कोणी येणार नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2022 06:29 PM2022-02-25T18:29:46+5:302022-02-25T18:31:06+5:30

प्रवासी वाहनांत ‘पॅनिक बटण’ची सुरक्षा यंत्रणा केवळ नावालाच

Women, protect yourself; Don't keep pressing the panic button, no one will come to help! | महिलांनो, तुम्हीच करा तुमची सुरक्षा; पॅनिक बटण दाबत राहू नका,मदतीला कोणी येणार नाही !

महिलांनो, तुम्हीच करा तुमची सुरक्षा; पॅनिक बटण दाबत राहू नका,मदतीला कोणी येणार नाही !

googlenewsNext

- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : महिलांनो, तुम्ही जर प्रवासी वाहनातून प्रवास करीत असाल आणि जर तुम्हाला असुरक्षित वाटल्यास वाहनातील ‘पॅनिक बटण’ दाबत राहू नका. कारण तुमच्या मदतीला कोणीही येणार नाही. ही यंत्रणा केवळ नावालाच आहे. त्यामुळे एक तर तुमची सुरक्षा तुम्हीच करा, इतरांची मदत मिळते का पहा, नाही तर तत्काळ पोलिसांना फोन करा. प्रवासी वाहनांत ‘पॅनिक बटण’ची सुरक्षा यंत्रणा केवळ नावालाच आहे.

प्रवाशांची, विशेषत: महिलांची सुरक्षितता डोळ्यांसमोर ठेवून रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सर्व टॅक्सी, बस आणि सार्वजनिक वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रवासी वाहनांमध्ये व्हीटीएस किंवा जीपीएस आणि पॅनिक बटण बसविण्याची सक्ती केली. या निर्णयाची अंमलबजावणी २०१८ पासून सुरू झाली. वाहनातून प्रवास करता ‘पॅनिक बटण’ दाबल्यानंतर मदत मिळते का, यासंदर्भात ‘रिॲलिटी चेक’ करण्यात आला. आकाशवाणी ते उस्मानपुरा भागात प्रवाशांकडून चारचाकी वाहनातून जाताना पॅनिक बटण वारंवार दाबण्यात आले; परंतु कोणीही मदतीसाठी आले नाही. यासंदर्भात संबंधित चारचाकी चालकास विचारले असता, ते बसविणे बंधनकारक आहे म्हणून बसविले, असे तो म्हणाला.

पॅनिक बटण, पण कंट्रोल रूमच नाही
याविषयी आरटीओ अधिकाऱ्यांशी संवाद साधला असता, पॅनिक बटण दाबल्यानंतर त्याची माहिती कोणाला जाईल, याची यंत्रणाच अद्याप बनलेलीच नसल्याचे समोर आले. पॅनिक बटणसंदर्भातील कंट्रोल रूम पोलिसांच्या यंत्रणेशी जोडणार की अन्य कुठल्या यंत्रणेशी जोडणार, हे अजून निश्चितच नाही.

पॅनिक बटण म्हणजे?
प्रवासी वाहनातून प्रवास करणाऱ्या महिलांना असुरक्षित वाटू लागल्यास किंवा सहप्रवासी किंवा गाडीच्या चालकाकडून गैरकृत्य केले गेल्यास मदत मागण्यासाठी ‘पॅनिक बटण’ वापरता येणार आहे. बटण दाबल्यानंतर संबंधित कंट्रोल रूमला माहिती मिळेल. तसेच, ‘व्हीटीएस’द्वारे ‘लोकेशन’देखील समजेल, असे सांगण्यात येते.

प्रवासात असुरक्षित वाटल्यास काय कराल?
प्रवासात असुरक्षित वाटल्यास ११२ या क्रमांकावरून पोलिसांची मदत घेता येईल. त्याबरोबर कुटुंबातील सदस्यांनाही संपर्क साधून माहिती देता येईल. वाहन जर थांबत नसेल तर रस्त्यावरील इतर वाहनचालक, पादचाऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न करावा.

पॅनिक बटण बंधनकारक
कायद्याप्रमाणे प्रवासी वाहनांमध्ये पॅनिक बटण बसविणे बंधनकारक आहे; परंतु त्याची यंत्रणा विकसित झालेली नाही. त्यावर कार्यवाही सुरू आहे.
- संजय मेत्रेवार, प्रादेशिक परिवहन अधिकारी

Web Title: Women, protect yourself; Don't keep pressing the panic button, no one will come to help!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.