ग्रामीण भागातील स्त्रीच खरी करिअर वूमन
By Admin | Published: November 14, 2014 12:43 AM2014-11-14T00:43:43+5:302014-11-14T00:55:44+5:30
औरंगाबाद : ग्रामीण भागातील महिला काटकसर करून घर सांभाळते, तसेच शेतीसारख्या अंगमेहनतीच्या कामातदेखील हातभार लावते
औरंगाबाद : ग्रामीण भागातील महिला काटकसर करून घर सांभाळते, तसेच शेतीसारख्या अंगमेहनतीच्या कामातदेखील हातभार लावते. ही महिला शिकलेली नसली तरी ती उत्तमरीत्या संसार करीत असते. मुलांवर चांगले संस्कार घडवण्याचे काम करते, त्यामुळेच ग्रामीण भागातील महिला ही खरी करिअर वूमन आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास, जलसंधारण, महिला व बालविकासमंत्री पंकजा पालवे यांनी केले.
तापडिया कासलीवाल मैदानात महिला व बालविकास विभागातर्फे आयोजित विभागीय स्तरावरील प्रदर्शन व विक्री महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी राज्यमंत्री विद्या ठाकूर यांच्यासह व्यासपीठावर विभागीय आयुक्त संजीव जैस्वाल, माजी महापौर प्रवीण घुगे, सतीश नागरे, जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजनसह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
यावेळी पालवे पुढे म्हणाल्या की, बचत गटांनी महिलांच्या हाताला काम दिले, ताकद दिली; परंतु या महिलांनी तयार केलेल्या वस्तूंचे मार्केटिंग व्यवस्थित होत नसल्याने व जाहिरातीची ताकत बचत गटांना माहीत होत नाही, त्यामुळे बचत गट आज मागे आहे. यासाठी बचत गटांच्या महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना योग्य न्याय मिळावा यासाठी महिला व बालविकास विभागातर्फे एक पोर्टल तयार करण्यात आले आहे. या पोर्टलचे उद्घाटनदेखील यावेळी करण्यात आले, तसेच निराधार महिलांना व बालकांना बाल आधार कार्डची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती पालवे यांनी यावेळी दिली. या आधार कार्डला स्थायी रूप देण्यासाठी उद्या बीडमधील दहा बालकांना या कार्डचे स्थायी स्वरूपात वाटप करण्यात येणार असल्याचेही पालवे यांनी यावेळी सांगितले.
अंगणवाडीतील बालकांना स्वच्छतेचे महत्त्व कळावे, त्यांना स्वच्छतेच्या संदर्भात शिक्षण देण्यासाठी देखील काही तरतूद करण्याचा प्रयत्न बाल स्वच्छता योजनेद्वारे करण्यात आला आहे, अशी माहिती राज्यमंत्री विद्या ठाकूर यांनी यावेळी दिली.
बालदिनी बाल स्वच्छता
मोहिमेचा शुभारंभ
स्वच्छ भारत अभियानासारखे स्वच्छ बालक अभियान राबवण्यात येणार असल्याचीही माहिती पालवे यांनी यावेळी दिली. १४ नोव्हेंबर हा बालदिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी बालकांना स्वच्छतेचे महत्त्व तसेच स्वच्छतेची जाणीव करून देण्याचे काम करण्यात येणार आहे, असे पंकजा पालवे यांनी यावेळी सांगितले.
महिला व बालविकास विभागांतर्गत बचत गटाच्या महिलांनी तयार केलेल्या वस्तूंची विक्री प्रक्रिया व्यवस्थित व्हावी व महिलांच्या अंगी असलेल्या कलागुणांना योग्य न्याय मिळावा यासाठी एक पोर्टल तयार करण्यात आले आहे. हे पोर्टल सर्वांसाठी फायद्याचे ठरेल, तसेच या पोर्टलच्या साहाय्याने आॅनलाईन खरेदी करण्याची संधी उपलब्ध होणार आहे, या पोर्टलचे काम शेवटच्या टप्प्यात असून ते ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण होऊन सर्वांसाठी उपलब्ध करण्यात येईल, अशी माहिती पंकजा पालवे यांनी दिली.
४एकाच दालनात २७० स्टॉल - सिद्धा महोत्सव २०१४ - १५ यात २७० बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे व वस्तूंची विक्रीही करण्यात येत आहे. महिलांनी घरगुती वस्तूंचा वापर करून तयार करण्यात आलेले पदार्थ, ड्रेसेस, शोभेच्या वस्तू अशा अनेक प्रकारच्या स्टॉलचा समावेश आहे.