आता महिला सरपंचांच्या पतीची लुडबुड चालणार नाही; ‘पतीराज’ थांबवा, अन्यथा जाऊ शकते पद
By विजय सरवदे | Published: August 29, 2023 08:16 PM2023-08-29T20:16:31+5:302023-08-29T20:16:49+5:30
महिला सरपंच असलेल्या बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये त्यांचे पतीच कारभार चालविताना दिसतात.
छत्रपती संभाजीनगर : ग्रामपंचायतींमध्ये अनेक महिला आरक्षणामुळे सरपंचपदावर आरूढ झाल्या, परंतु महिला सरपंचांच्या कारभारात पतींचा हस्तक्षेप वाढत चालला आहे. सरकारने हे रोखण्यासाठी कायद्याचा बडगा उगारला, तरीही पडद्याआडून पुरुष मंडळीच ग्रामपंचायतींचा कारभार चालवत असल्याचे चित्र दिसत आहे. तथापि, आता तरी सावध व्हा, नाहीतर हा प्रकार अंगलट येऊ शकतो. एखादीही तक्रार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे प्राप्त झाल्यास त्यांच्या अहवालानुसार, विभागीय आयुक्त हे संबंधितांचे सरपंचपद रद्द करण्याचा निर्णय घेऊ शकतात.
महिला सक्षमीकरणासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्यांना ५० टक्के आरक्षण देण्यात आले आहे. मात्र, महिला सरपंच असलेल्या बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये त्यांचे पतीच कारभार चालविताना दिसतात. विरोधकांकडून यावर आवाजही उठवण्यात आला. आता यापुढे पती किंवा नातेवाइकांनी हस्तक्षेप केल्याचे आढळल्यास त्यांच्यावर थेट कारवाईचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
सरपंचपतीची ग्रामपंचायतींमधील लुडबुड बंद
वाढता हस्तक्षेप थांबविण्यासाठी सन २००७ मध्येच शासन निर्णय जारी केला होता. त्यानंतर, प्रशासनही अलर्ट मोडवर आले आणि काही प्रमाणात का होईना, सरपंच पती किंवा त्यांच्या नातेवाइकांची ग्रामपंचायतीतील लुडबुड बंद झाली.
...तर होणार कारवाई
सरपंचांचे पती किंवा नातेवाइकांचे अधिकारी-कर्मचाऱ्यांवर दबाव आणणे, अथवा संबंधितांच्या खुर्चीत बसणे अथवा गैरवर्तणूक केल्यास मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील ३९ कलमान्वये कारवाई केली जाऊ शकते.
जिल्ह्यात ५६२ महिला सरपंच
जिल्ह्यातील नऊ तालुक्यांत ५६२ महिला सरपंच निवडून आल्या आहेत. यापैकी काही सरंपचपतींकडून आजही ग्रामपंचायत कारभारात हस्तक्षेप सुरू आहे.
पदावरून काढण्याची कारवाई
ग्रामपंचायतीच्या कारभारात महिला सरपंचांचे पती अथवा नातेवाईक हस्तक्षेप करत असल्याची तक्रार पंचायत समिती अथवा जिल्हा परिषदेकडे प्राप्त झाल्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी त्याची चौकशी करतात. त्यासंबंधीचा अहवाल विभागीय आयुक्तांकडे सादर झाल्यानंतर ते कलम ३९ (१) अन्वये पदावरून काढण्याची कारवाई करतात.
- ओमप्रकाश रामावत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी.
४) कोणत्या तालुक्यात किती महिला सरपंच
तालुका महिला सरपंच
औरंगाबाद- ५४
फुलंब्री- ५२
सिल्लोड- ७०
सोयगाव- २७
कन्नड- ९३
खुलताबाद- १८
गंगापूर- ७७
वैजापूर- १०५
पैठण- ६६