‘एसटी’चे स्टिअरिंग हाती मिळविण्यासाठी महिला कर्मचारी एकवटल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 05:19 PM2020-08-17T17:19:54+5:302020-08-17T17:31:42+5:30
थांबविलेले प्रशिक्षण पुन्हा सुरू करून विद्यावेतन देण्याची मागणी
औरंगाबाद : एसटी महामंडळात महिला चालकांच्या हाती एसटीचे स्टिअरिंग मिळावे, यासाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या निर्भया समितीने संपूर्ण राज्यात अभियान चालू केले आहे. महिलांचे प्रशिक्षण पूर्ण करून त्यांचे विद्यावेतन देणे, त्यांना सेवेत सामावून घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
एसटी महामंडळात २०१९ मध्ये चालकपदी महिलांची नियुक्ती झाली. एसटीचे स्टिअरिंग महिलांच्या हाती देण्यात येणार होते; परंतु कोरोनाचे कारण पुढे करून अचानक त्यांचे प्रशिक्षण बंद करण्यात आले. त्यामुळे या चालक महिलांपुढे रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. हा प्रकार ‘लोकमत’ने २१ जुलै रोजी ‘महिलांच्या हाती दिले जाणारे एसटीचे स्टिअरिंग केले जाम’ या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित करून समोर आणला.
महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या राज्य महिला संघटक शीला नाईकवाडे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात संघटनेच्या निर्भया समितीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रातील निर्भयांनी म्हणजे महिला कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री, परिवहनमंत्र्यांना मेलद्वारे निवेदन पाठवून या महिलांना न्याय देण्याची मागणी केलेली आहे. त्यांचे प्रशिक्षण पूर्ण करून त्यांचे उर्वरित विद्यावेतन देऊन सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात औरंगाबाद जिल्हा कामगार संघटना अध्यक्ष बाबासाहेब साळुंखे, सचिव राजेंद्र मोटे, अरुणा चिद्री, युनिट सचिव रवींद्र डाखोरकर, प्रसिद्धी सचिव राजेंद्र वाहटुळे, कार्याध्यक्ष विजय पोफळे, उपाध्यक्ष साबेरा सिद्दीकी, नालंदा धीवर यांची नावे आहेत.
अभियान अधिक प्रखर करणार
माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, नीलम गोºहे, सुप्रिया सुळे यांनाही निवेदन पाठवून या महिलांना न्याय मिळवून देण्याचे अभियान अधिक प्रखर करण्यात येईल, असे शीला संजय नाईकवाडे यांनी सांगितले.