गेल्या ७ वर्षांपासून कागदावर असलेल्या महिला व नवजात शिशू रुग्णालयास गती मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 07:06 PM2020-08-19T19:06:20+5:302020-08-19T19:08:48+5:30

जागतिक बँक प्रकल्पाच्या माध्यमातून या बहुप्रतिक्षित रुग्णालयाची उभारणी केली जाणार आहे.

The women's and neonatal hospital, which has been on paper for the last 7 years, will gain momentum | गेल्या ७ वर्षांपासून कागदावर असलेल्या महिला व नवजात शिशू रुग्णालयास गती मिळणार

गेल्या ७ वर्षांपासून कागदावर असलेल्या महिला व नवजात शिशू रुग्णालयास गती मिळणार

googlenewsNext
ठळक मुद्देइमारतीचा आराखडा सुधारणा, बदल सुचविण्यासाठी आरोग्य विभागाला सादरचार मजली इमारत, ८४ निवासस्थाने, धर्मशाळा ही असणार

औरंगाबाद : गेल्या ७ वर्षांपासून केवळ कागदावर असलेल्या २०० खाटांच्या महिला व नवजात शिशू रुग्णालयाच्या उभारणीला अखेर गती देण्यात येत आहे. प्रस्तावित रुग्णालयात काही बदल, सुधारणा आवश्यक आहे का, यासाठी इमारतीचा आराखडा सार्वजनिक बांधकाम विभागाने आरोग्य विभागाला सादर केला आहे.

महिला व नवजात शिशू रुग्णालयासंदर्भात सोमवारी बांधकाम विभाग आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. सार्वजनिक बांधकाम विभागाने रुग्णालयाचा प्रकल्प जागतिक बँक प्रकल्पाकडे दिला आहे. त्यांच्या माध्यमातून या बहुप्रतिक्षित रुग्णालयाची उभारणी केली जाणार आहे. दैनंदिन रुग्ण आणि त्यानुसार आवश्यक जागा, काही सुविधा,  फर्निचर, निवासस्थानांचा आकार यासह अन्य काही बाबींमध्ये काही बदल, सुधारणा आवश्यक असेल तर ते आरोग्य विभागाकडून बांधकाम विभागाला सुचविण्यात येणार आहे. 

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या महिला रुग्णालयाच्या बाजूने एक पाऊल नक्कीच पुढे पडले आहे. मात्र, रुग्णालयाच्या जागेच्या शोधात किमान ७ वर्षे लोटली. २९ आॅगस्ट २०१८ रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णालयासाठी दूध डेअरीची जागा आरोग्य विभागाकडे हस्तांतरित केली. त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने ११ फेब्रुवारी २०१९ रोजी प्रशासकीय मान्यतेसाठी १३८ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता.  २० सप्टेंबर रोजी रुग्णालय व कर्मचारी निवासस्थान बांधकामाला प्रशासकीय मान्यता मिळाली व ११ नोव्हेंबर रोजी प्रशासनाला मिळालेल्या पत्रानुसार १११ कोटी ८९ लाखांच्या निधीला मंजुरी मिळाल्याचे कळविण्यात आले.

चार मजली इमारत, ८४ निवासस्थाने, धर्मशाळा
प्रस्तावित रुग्णालय तळमजला आणि ४ मजली इमारतीचे राहणार आहे, तर वर्ग १ ते वर्ग ४ च्या कर्मचाऱ्यांसाठी ८४ निवासस्थाने आहेत. एक धर्मशाळाही प्रस्तवित आहे.

निधी वर्ग, आता निविदा प्रक्रिया
बांधकाम विभागाला निधी वर्ग झालेला आहे. आता निविदा प्रक्रिया राबविली जाईल. रुग्णालयाची इमारत, निवासस्थानासह आता फर्निचरचाही समावेश करण्यात आलेला आहे.
-डॉ. सुंदर कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक

Web Title: The women's and neonatal hospital, which has been on paper for the last 7 years, will gain momentum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.