पाटीवर चालण्याऐवजी पेन्सिल जातेय महिलांच्या पोटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 02:40 PM2019-05-17T14:40:31+5:302019-05-17T14:47:45+5:30
पाटीला नव्हे, पण पाटीवरच्या पेन्सिलीला भरमसाठ मागणी
औरंगाबाद : हातात लेखणी धरून पाटीवर लिहिण्याचे दिवस आता मागे पडले आहेत. ग्रामीण भागातील शाळा किंवा शहरी भागातील काही तुरळक शाळा सोडल्या तर कोणत्याही शाळेत आता पूर्व प्राथमिक शिक्षणासाठीही पाटी- पेन्सिल वापरली जात नाही, असे असतानाही पाटीवरच्या पेन्सिलीला मात्र प्रचंड मागणी आहे. याचे कारण म्हणजे या पेन्सिली पाटीवर लिहिण्यासाठी नव्हे तर खाण्यासाठी घेऊन जात असल्याचे काही दुकानदारांनी सांगितले.
याविषयी सांगताना काही दुकानदार म्हणाले की, सध्या तर शाळांना सुट्या आहेत, यामुळे इतर स्टेशनरी साहित्याची मागणी मंदावलेली असते. पण तरीही पाटीवरच्या पेन्सिलींची मागणी मात्र किंचितही कमी झालेली नाही. त्यांच्या दुकानात दररोज एक तरी महिला पाटीवरच्या पेन्सिलीचा पुडा मागण्यासाठी येते. त्यामुळे पाट्या नाही मागविल्या तरी पाटीवरच्या पेन्सिली मात्र आम्हाला आवर्जून मागवाव्याच लागतात, असे या दुकानदारांनी सांगितले. कुमारवयीन मुलींपासून ते मध्यमवयीन महिलांचा या वयोगटात सहभाग आहे.
गमतीचा वाटत असला तरी हा विषय गंभीर असून, अनेक महिलांच्या आरोग्याशी निगडित आहे. डॉक्टरांच्या मते माती, पेन्सिल, खडू, भिंंतीचा रंग यासारख्या वस्तू खाव्या वाटणे हा एक प्रकारचा आजार आहे. अशा
व्यक्तींना अॅनिमिया असतो तसेच शरीरातील कॅल्शियम, झिंक, लोह यांचे प्रमाण कमी झालेले असते. अशा महिलांच्या पोटात जंत असू शकतात. पाटीवरच्या पेन्सिलला असलेल्या मागण्यांमुळे विविध ब्रॅण्डच्या पेन्सिली आता आॅनलाईन शॉपिंग साईटवर मागविण्याची सुविधाही उपलब्ध आहे. यावरूनच या पेन्सिलींची लोकप्रियता दिसून येते.
पेन्सिली मागायला येतात अनेक महिला...
अनेक वर्षांपासून दुकान असल्यामुळे साधारणपणे आमच्या परिसरात असणाऱ्या घरातील सदस्यांविषयी आम्हाला माहिती असते. पेन्सिली मागायला अशा काही महिला येतात, ज्यांच्या घरात शाळेत जाणारे कोणीही नसते. त्यामुळे सहज म्हणून या महिलांना विचारले असता, त्यांनी ही पेन्सिल आपण लिहिण्यासाठी नव्हे तर खाण्यासाठी नेत आहोत, असे सांगितले आणि या अजब प्रकाराचा शोध लागला, असे एका विक्रे त्याने सांगितले. बहुतांश मुलींनी लहानपणी एकदा तरी पाटीवरच्या पेन्सिलींचा आस्वाद घेतलेला आहेत. पण वयोमानानुसार ही सवय मागे पडून सुटत गेली आणि आता त्यांना या पेन्सिली खाव्या वाटत नाहीत, असेही काही महिलांशी चर्चा केल्यावर समोर आले.