Women's Day Special : पतीच्या आत्महत्येनंतर दोन लेकरांना जगविण्याच्या जिद्दीने मिळाले बळ : वैशाली येडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 12:26 PM2019-03-08T12:26:16+5:302019-03-08T12:31:41+5:30

वैशाली यांचा सहभाग असलेले आत्महत्याग्रस्त विधवा आणि शेतकऱ्यांच्या लेकीचं ‘तेरवं’ हे नाटक लक्षवेधून घेत आहे

Women's Day Special: After the husband's suicide, the stubbornness of nurturing two lives: Vaishali Yede | Women's Day Special : पतीच्या आत्महत्येनंतर दोन लेकरांना जगविण्याच्या जिद्दीने मिळाले बळ : वैशाली येडे 

Women's Day Special : पतीच्या आत्महत्येनंतर दोन लेकरांना जगविण्याच्या जिद्दीने मिळाले बळ : वैशाली येडे 

googlenewsNext

- राम शिनगारे

औरंगाबाद : आम्ही अल्पभूधारक शेतकरी. दुष्काळ पाचवीलाच पूजलेला. नवऱ्याकडे खाजगी सावकाराचे कर्ज. शेतीत काहीच पिकत नसल्यामुळे सावकारांनी कर्जाच्या परतफेडीसाठी लावलेल्या तगाद्यामुळे नवऱ्याने आत्महत्या केली. मी नुकतीच बाळांतीण झालेली. दीड वर्षाचा मुलगा, एक महिन्याची मुलगी. तीन जीव कसे जगवणार असा प्रश्न होता. पण दोन लेकरांना जगविण्याच्या जिद्दीने आणि मेहनतीमुळे खडतर प्रवास सुरळीत सुरू असल्याचे वैशाली येडे यांनी सांगितले.

अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या यावर्षीच्या उद्घाटक आंतरराष्ट्रीय लेखिका नयनतारा सहगल यांचे आमंत्रण ऐनवेळी रद्द केल्यामुळे आत्महत्या केलेल्या शेतकरी पत्नीच्या हस्ते साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील राजूर येथील वैशाली येडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तेव्हापासून परिचित झालेल्या वैशाली यांचा सहभाग असलेले आत्महत्याग्रस्त विधवा आणि शेतकऱ्यांच्या लेकीचं ‘तेरवं’ हे नाटक महिला दिनानिमित्त एमजीएम संस्थेच्या रुक्मिणी सभागृहात शुक्रवारी दुपारी होणार आहे. यानिमित्ताने वैशाली येडे यांचा जीवनप्रवास जाणून घेतला.

पतीच्या मृत्यूची वार्ता येताच पायाखालची जमीन हादरली. पोरगा दीड वर्षाचा, मुलगी एक महिन्याची. तीन जिवांना काय खाऊ घालावे? कसे जगवावे? असे अनेक प्रश्न समोर होते. वडिलांनी वर्षभर मदत केली. या वर्षाच्या कालावधीत शिवणकाम शिकले. वडिलांनी एक मशीन घेऊन दिली. २०१३ मध्ये दोन लेकरं घेऊन सासरी राहण्यास आले. घरातील लोक मदत करण्यास तयार नव्हते. याच वेळी अंगणवाडीत सेविका म्हणून अर्ज निघाले होते. अर्ज भरल्यानंतर नोकरी लागली. अंगणवाडी सेविकेच्या नोकरीतून मिळणाऱ्या तुटपुंज्या मदतीसह शिवणकाम सुरूच ठेवले. वेळ मिळेल तेव्हा दुसऱ्याच्या शेतात रोजंदारी सुरू केली. घरातील लोक लेकरं देऊन गाव सोडून जा म्हणून दबाव टाकत होते. त्यास ठाम नकार दिला. याच वेळी यवतमाळच्या एका संस्थेशी संबंध आला. त्या संस्थेत महिलांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येत होते. मीही त्यात प्रशिक्षण घेतले. त्यात काही मशीन मिळाल्या. यातून आत्मविश्वास बळावत गेला. त्यानंतर एकल महिला किसान संघटनेत सहभाग घेतला. तेथे अनेक एकल महिलांची भेट झाली. भेटलेल्या महिलांपेक्षा आपले दु:ख कमी असल्याची जाणीव झाली. पुढे नाम फाऊंडेशनने एकल महिलांना मदत वाटप केली. त्यात मला लाभ मिळाला नव्हता. त्यामुळे समन्वयक हरीश इथापे यांच्या घरी जाऊन भेट घेतली. त्यांनी परिस्थिती जाणून घेतली. त्यानंतर १५ हजारांची मदत मिळाली. तेव्हाच हरीश इथापे यांनी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी आणि शेतकऱ्यांच्या लेकींना घेऊन ‘तेरवं’ या नाट्यातून शेतकऱ्यांची परिस्थिती समाजापुढे मांडत असल्याचे त्यांनी सांगितले. 

पती गेला तेव्हा बाळंतपणासाठी माहेरी
वैशाली यांचे २००९ साली लग्न झाले. त्यांना त्याच वर्षी ३१ डिसेंबर रोजी एक मुलगा झाला. पतीसह त्या शेतात राबत होत्या. त्या कालावधीतील दोन वर्षात शेतात कष्ट करूनही उत्पन्न मिळाले नाही. शेतात खर्च करण्यासाठी बँकेकडून कर्जही मिळाले नाही. त्यासाठी खाजगी सावकाराकडून नवऱ्याने पैसे घेतले. भरमसाठ व्याजामुळे पैसे जास्त झाले. माझ्या माहितीप्रमाणे तेव्हा ७० ते ८० हजार रुपये व्याजाचे होते. पण पतीने आत्महत्या केल्यानंतर अनेक जण म्हणत होते की आमचेही पैसे आहेत म्हणून. पतीने २ आॅक्टोबर २०११ रोजी आत्महत्या केली. तेव्हा बाळंतपणासाठी माहेरी होते. २४ आॅगस्ट २०११ रोजी मुलगी झाली होती.

जगण्याच बळ पंखात भरल 
२०११ साली दीड वर्षाचा मुलगा, एक महिन्याची मुलगी. पतीची आत्महत्या. अशा कठीण परिस्थितीतून सुरू झालेला प्रवास इथपर्यंत येऊन पोहोचला आहे. आज जगण्याचे बळ पंखात भरलेले आहे. अंगणवाडीत नोकरी, शिवणकाम, एकल महिला किसान संघटना, नाम फाऊंडेशनसह ‘तेरवं’ नाट्यातून अभिनयापर्यंत मजल मारली आहे.
- वैशाली येडे, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी

Web Title: Women's Day Special: After the husband's suicide, the stubbornness of nurturing two lives: Vaishali Yede

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.