Women's Day Special : पोळ्या लाटून पैशांसोबत पुण्यही कमविणारी ‘अन्नपूर्णा’ : कमलबाई जाधव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 11:54 AM2019-03-08T11:54:43+5:302019-03-08T11:57:12+5:30
२५ वर्षांपासून पतीला साथ आणि कुटुंबालाही हात
- दीपक देशमुख
औरंगाबाद : परिश्रमाला प्रामाणिक प्रयत्नांची जोड मिळाली की संसाराचे नंदनवन होते, यावर विश्वास होता. माझाही संसार फुलविण्याचा विचार मनात ठसला अन् निर्र्धाराने पदर कमरेला खोचला. सात-आठ घरी पोळ्या लाटण्याचे काम मिळाले. आनंदाने हे काम स्वीकारले. कामाचा मोबदला मिळतोच, यासोबतच चार लोकांना चवदार पोळीभाजी करून खाऊ घालते त्याचाही आनंद मिळत गेला. या कामातून आर्थिक उन्नती साधली. मने जोडली. आता या सगळ्याला २५ वर्षे लोटली. हातपाय चालतील तोवर ही अन्नपूर्णेची भूमिका पार पाडत राहणार... कमलबाई जाधव यांनी हा निर्धार बोलून दाखविला.
कमलबाई मूळच्या नाशिक जिल्ह्यातील ब्राह्मणगावच्या. गावात कामधंदा करून फार काही साध्य होणार नाही. मुलांना शिकवून मोठे करायचे हा विचार सतत दिनकर जाधव यांच्या मनात घोळत होता. या विचारानेच ते कमलबार्इंना सोबत घेऊन औरंगाबादेत आले. त्यांना एका सिक्युरिटी कंपनीमध्ये काम मिळाले; पण वेतन जेमतेमच. अशा परिस्थितीत कमलबार्इंनी त्यांंच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचा विचार बोलून दाखविला. पतीच्या पाठीशी उभे राहिले आणि सुरू झाले नवे पर्व!
कमलबाई सांगतात, आर्थिक कमाई करण्यासोबतच आपल्याला आनंद देणारे आणि त्यातूनच पुण्य कमावता येणारे काम कोणते? हा विचार मनात घोळू लागला. यातूनच घरोघरी पोळी-भाजी करून देण्याचे काम आपण मिळवावे असे वाटले. अन्नपूर्णा होण्याचे पक्के झाले. कामही मिळाले आणि ते वाढत गेले. यातून चार पैसे तर मिळू लागले. चवदार जेवण बनवून दिल्यानंतर दाद मिळू लागली. त्यामुळे उत्साह वाढत गेला.
संसारवेलीवर उमलेली दोन फुले, दोन्ही मुले शिकली. मोठा मनोज विमा कंपनीत, धाकटा एका ज्वेलर्सकडे ‘उत्तम कारागीर’ म्हणून काम करतो. दोघांचीही लग्न झाली. गावाकडे शेतीवाडी नव्हती. आपले स्वत:च्या मालकीचे घर असावे हे स्वप्न होते. तेही स्वप्न २००९ मध्ये पूर्ण झाले. संसारात अडचणी येतात; पण यातून मार्गही काढता येतो, यावर माझा विश्वास आहे. हाच अनुभव मीही घेतला. त्यातून सहज सावरताही आले. जबाबदाऱ्या ज्या काळात वाढत चालल्या होत्या त्याच वळणावर अडचणींनी आम्हा पती-पत्नीला गाठले होते. सारे काही सुरळीत सुरू असताना वादळेही अनुभवली. पतीची नजर क्षीण होत चालली होती. कालांतराने पतीची कमाई बंद झाली. तरीही आम्ही डगमगलो नाही. पोळ्याभाजी करण्याच्या कामातून बराच मोठा हातभार लागत होता. आता मुले कमावती झाली. ते आता आराम करा म्हणतात; पण गेली २५ वर्षे ज्यांच्याकडे पोळीभाजी केली, त्या सगळ्यांची मी कधी ‘मावशी’ झाली हे कळलेच नाही. आपुलकीचे नाते निर्माण झाले आहे. त्यामुळे मी ‘निवृत्ती’ घेणार नाही. हातपाय चालतील तोवर मी हे काम करीत राहणार, असे सांगायलाही कमलबाई विसरल्या नाहीत.
कधी पोळी करपली नाही
सकाळी ५ वाजता माझा दिवस सुरू होतो. सकाळचा चहा सगळ्यांसोबत गप्पाटप्पांमध्ये होतो. दिवसाची सुरुवात अशी रोज मोठ्या आनंदात होते. सकाळी ७ वाजता पोळ्या-भाजी करून देण्याच्या कामाला सुरुवात होते. हात यंत्रागत गतीने कधी चालायला सुरुवात होतात ते कळतच नाही. दुपारी १ वाजेपर्यंत घरोघरी जाऊन हे काम करते. गेल्या २५ वर्षांत पोळी करपल्याची कधी कोणाची तक्रार नाही आली, हे मला मोठे सुख देवून जाते, असे कमलाबाई स्वाभिमानाने सांगतात.