५३ व्या वर्षी तेजस्वी कामगिरी; स्वतः जोशाने सायकलिंगचा आनंद घेऊन इतरांनाही प्रोत्साहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 13:17 IST2025-03-08T13:16:25+5:302025-03-08T13:17:29+5:30

Women's Day Special: ५३ व्या वर्षीही जोशाने सायकलिंग, ‘तेजस्विनी सायकलिंग क्लब’ द्वारे इतरांनाही देताहेत प्रोत्साहन

Women's Day Special: Brilliant achievement! At 53, Neeta Gangawane enjoys cycling and encourages others | ५३ व्या वर्षी तेजस्वी कामगिरी; स्वतः जोशाने सायकलिंगचा आनंद घेऊन इतरांनाही प्रोत्साहन

५३ व्या वर्षी तेजस्वी कामगिरी; स्वतः जोशाने सायकलिंगचा आनंद घेऊन इतरांनाही प्रोत्साहन

छत्रपती संभाजीनगर : महिलांनी स्वतःसाठीही जगले पाहिजे, असे मानणाऱ्या नीता पंढरीनाथ गंगावणे यांनी स्वतःच त्याचा वस्तुपाठ घालून दिला आहे. एकेकाळी कुटुंबासाठी जीवन समर्पित करणाऱ्या नीता गंगावणे यांनी स्वतःसाठी नव्याने सुरुवात केली आणि त्यातूनच ‘तेजस्विनी सायकलिंग क्लब’ची पायाभरणी झाली. वयाच्या ५३ वर्षी त्या स्वतः सायकलिंगचा आनंद घेऊन इतरांनाही प्रोत्साहन देत आहेत.

नीता गंगावणे यांना जिजामाता कन्या शाळेत शिकत असतानाच क्रीडा स्पर्धांची आवड निर्माण झाली. त्या उत्कृष्ट बास्केटबॉलपटू आहेत आणि १९८५-८६ मध्ये डोंगर स्पर्धा जिंकल्या. सायकलिंगचे वेडही त्यांना लहानपणापासूनच होते. मात्र, १९८९ ते २०१७ हा संपूर्ण काळ त्यांनी कुटुंबासाठी दिला.

घर, कुटुंब, जबाबदाऱ्या या साऱ्यात आयुष्य वाहून गेल्यावर नीता यांनी ठरवले की, आता वेळ स्वतःसाठी द्यायचा! स्वतःच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करत त्यांनी पुन्हा सायकलिंग आणि ट्रेकिंग सुरू केले. त्यांनी स्वतःला फिट ठेवण्याचा संकल्प करत इतर महिलांसाठीही सायकलिंग आणि ट्रेकिंगच्या माध्यमातून आरोग्यविषयक जनजागृती सुरू केली. त्यांनी ‘तेजस्विनी सायकलिंग क्लब’ सुरू केला आणि महिलांना सायकलिंगसाठी प्रेरित करू लागल्या. आज अनेक महिला त्यांच्यासोबत सायकलिंग करत आहेत. सायकलिंग केवळ व्यायाम नव्हे, तर मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठीही फायदेशीर असल्याचे त्या सांगतात.

नीता गंगावणे या छत्रपती संभाजीनगरमधील पहिल्या महिला ठरल्या, ज्यांनी ५० वर्षांवरील वयात एकटीने सायकलवर पंढरपूर वारी पूर्ण केली. त्यांचा हा प्रवास अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरला. आज छत्रपती संभाजीनगरमध्ये महिलांबरोबरच पुरुषही सायकलिंगमध्ये सहभागी होत आहेत आणि विविध सायकलिंग आव्हाने स्वीकारत आहेत. महिला दिन म्हणजे केवळ एक दिवस नव्हे, तर महिलांनी स्वतःसाठी उभे राहण्याचा संकल्प करण्याचा दिवस! नीता गंगावणे यांचा प्रवास हा त्याच प्रेरणादायितेचा भाग आहे. त्यांनी महिलांसाठी आरोग्य आणि फिटनेसचा नवा मार्ग दाखवला आहे.

सायकलिंगचे फायदे - महिलांसाठी संजीवनी!
- वजन कमी होण्यास मदत होते.
- सहनशक्ती आणि शारीरिक ताकद वाढते.
- कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहते.
- पोटाची चरबी कमी होते.
- हृदयासाठी फायदेशीर ठरते.
- मधुमेहाचा धोका कमी होतो.
-मानसिक आरोग्य सुधारते.

Web Title: Women's Day Special: Brilliant achievement! At 53, Neeta Gangawane enjoys cycling and encourages others

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.