Women's Day Special : पती सरपंच असताना पत्नीने घर सांभाळले; पत्नी सरपंच होताच पतीने सावरले : वंदना मनोहर नीळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 11:49 AM2019-03-08T11:49:22+5:302019-03-08T11:53:05+5:30
एकमेकांच्या साथीने मिळाले हस्ता गावाला बळ!
- सुरेश चव्हाण
कन्नड (जि. औरंगाबाद) : सुखी संसारासाठी नवरा बायकोच ट्युनिंग जुळायला हवे. ते जुळले की, निम्मे काम सोपे होऊन जाते आणि बाईचे कर्तृत्व उजळून निघते. हस्ता येथील एका जोडप्याने हे सिद्ध करून दाखवलेय. आधी नवरा सरपंच, नंतर बायको; पण दोघांनीही कुटुंब, शेती सांभाळत गावाचा प्रगतीचा मार्ग प्रशस्त केला. आधी पती सरपंच होते, नंतर मी; पण एकमेकांच्या पाठीशी उभे राहत आम्ही जबाबदाऱ्या स्वीकारल्या. या सगळ्या दगदगीत एकमेकांच्या साथीने सगळी आव्हाने पेलली आणि गावाचा विकास केला... सरपंच वंदना मनोहर नीळ यांची ही यशकथा!
बाईला कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळाली की, ती सोने करते. वंदना नीळही त्यापैकी एक़ पती सरपंच असताना त्यांनी सासू, पती आणि दोन मुले, असे कुटुंब सांभाळले. सोबत शेतीची सगळी कामेही पाहिली. डोंगराच्या कुशीत वसलेले हस्ता गाव. २०११ च्या जनगणनेनुसार गावाची लोकसंख्या १ हजार ७६७. जिल्हा परिषदेची इयत्ता सातवीपर्यंत शाळा. गावात दोन अंगणवाड्या. नऊ सदस्य संख्या असलेली ग्रामपंचायत.
सरपंचपदापर्यंत कशा पोहोचल्या? हे सांगताना वंदना नीळ म्हणाल्या, ‘पती मनोहर नीळ सरपंच होते. ते गावातील कामात व्यस्त राहायचे. त्यामुळे माझ्यावर शेती आणि कुटुंबाची सगळी जबाबदारी पडली. गावासाठी आपल्या हातूनही चांगली कामे व्हायला हवीत, असे सतत वाटत राहायचे.’ १९ नोव्हेंबर २०१७ रोजी ग्रामपंचायतची बिनविरोध निवड झाली. ५ महिला आणि ४ सदस्य बिनविरोध निवडून आले. सरपंचपद सर्वसाधारण महिला पदासाठी राखीव होते. वंदना नीळ यांची बिनविरोध निवड झाली. नीळ म्हणाल्या की, मला मिळालेली ही संधी धक्कायदायक आणि आनंददायी होती. पुढे गावाच्या विकासासंदर्भाने काम करताना कुटुंब आणि शेतीसाठी कमी वेळ मिळायला लागला; पण पतीने शेती आणि कुटुंबाची जबाबदारी स्वत:वर घेतली. मुले शाळेत जातात. सकाळी त्यांचे पतीच आवरून घेतात. पती आणि कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे मला काम करायला जास्त वेळ मिळतोय. वंदना नीळ सांगत होत्या.
ग्रामस्थ, सदस्यांचे सहकार्यही मोलाचे
पेव्हर ब्लॉक, न्हानी ड्रॉप जोडणीपासून ते गावशिवारात जलसंधारणाची कामे आता करीत आहे. या ग्रामविकासाच्या कामात ग्रामस्थ व सहकारी सदस्यांचे सहकार्यही तितकेच मोलाचे असल्याचे त्या सांगतात.
गावाचे रूपडे बदलले
महिलांच्या ५ बचत गटांत ४ ने भर टाकली आणि त्यांना प्रत्येकी ५० हजार रुपये कर्ज मिळवून दिले. दुग्धपालन, शेळीपालन, समूह शेती यांच्या माध्यमातून गटांनी उत्पन्न वाढवले. आणखी ५ गट तयार होत आहेत. गावात पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले. ड्रेनेजलाईन टाकण्यात आली. न्हानी ड्रॉप जोडणी देण्यात आली. प्रत्येक कुटुंबाला नळाच्या पाण्याच्या दोन तोट्या देण्यात आल्या. एका नळातून सांडपाणी, तर दुसऱ्या तोटीतून आरओचे शुद्ध पाणी मिळणार आहे. या दोन्ही तोट्यांना मीटर बसविले जाणार आहेत. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळता येणार आहे. याशिवाय स्मशानभूमी सुशोभीकरण, घनकचरा व्यवस्थापनसाठी ट्रॅक्टर खरेदी, कंपोस्ट खत खड्डे करण्यात आले आहेत. जलयुक्तमधून सुमारे २२ सिमेंट बंधारे बांधण्यात आली आहेत. गट शेती ही संकल्पना राबविली जात आहे, अशा विविध माध्यमांतून गावाचे रूपडे बदलले आहे.