महिला दिन : महिलेने केले रेल्वेचे सारथ्य; तिकीट तपासनीस, सुरक्षा अधिकारीही महिलाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2020 07:06 PM2020-03-07T19:06:10+5:302020-03-07T19:07:53+5:30
यंदा महिला दिनाचे औचित्य साधून भारतीय रेल्वेतर्फे दिनांक १ मार्चपासून १० मार्चपर्यंत महिला गौरव मोहीम राबविली जात आहे.
औरंगाबाद : नांदेड-औरंगाबाद रेल्वे मार्गावर शुक्रवारी पहिल्यांदाच महिलेने रेल्वेचे सारथ्य केले. रेल्वेचालकासह या रेल्वेत तिकीट तपासनीस, ‘आरपीएफ ’ कर्मचारीही महिलाच होत्या. निमित्त होते येऊ घातलेल्या महिला दिनाचे.
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाकडून जागतिक महिला दिवस साजरा करण्यात येणार आहे. यंदा महिला दिनाचे औचित्य साधून भारतीय रेल्वेतर्फे दिनांक १ मार्चपासून १० मार्चपर्यंत महिला गौरव मोहीम राबविली जात आहे. याअंतर्गत शुक्रवारी नांदेड-औरंगाबाद विशेष रेल्वेचे सारथ्य महिलांच्या हाती देण्यात आले. वरिष्ठ पॉइंट्सन मधुबाई, सुनीता कुमारी यांनी या रेल्वेला झेंडी दाखविली, तर वरिष्ठ लोकोपायलट निधी सिंघ यांनी ही रेल्वे चालविली. तसेच वरिष्ठ तिकीट कलेक्टर मरियम, उज्ज्वला, वर्षा साळवे यांनी प्रवाशांकडे तिकीट तपासणीची जबाबदारी निभावली. रेल्वे सुरक्षा बलाच्या कॉन्स्टेबल आर.टी. वटाणे यांनी प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी घेतली होती.
नांदेडहून रेल्वे रवाना झाल्यानंतर निधी सिंग यांचे विविध रेल्वेस्टेशनवर स्वागत करण्यात आले. नांदेड-औरंगाबाद रेल्वे मार्गावर पहिल्यांदाच एक महिला रेल्वेचालक येत असल्याची माहिती रेल्वे अधिकारी-कर्मचाऱ्यांना मिळाली होती. त्यामुळे प्रत्येक जण या रेल्वेची आतुरतेने वाट बघत होता. औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास या रेल्वेचे आगमन झाले. रेल्वेच्या इंजिनमधून निधी सिंघ उतरतल्या. याप्रसंगी स्टेशन व्यवस्थापक लक्ष्मीकांत जाखडे यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर रेल्वेस्टेशनवरील नीलिमा ठाकरे, वर्षा साळवे, गायत्री गव्हाणे, राणी संजयकुमार, संगीता केळीकर आदी महिला कर्मचाऱ्यांनीही निधी सिंग यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी विजय दिवे, प्रेमसिंग आदी उपस्थित होते.
‘सेल्फी’साठी गर्दी
निधी सिंघ या परतीच्या प्रवासात औरंगाबादहून नरसापूर एक्स्प्रेसने नांदेडकडे रवाना झाल्या. निधी सिंग या महिला रेल्वेचालक असल्याचे महिला प्रवासी, युवतींना लक्षात आले तेव्हा अनेकांनी त्यांच्या सोबत सेल्फी घेण्यासाठी एकच गर्दी केली होती.