रांजणी येथे महिलांचा हंडा मोर्चा
By Admin | Published: June 10, 2014 12:23 AM2014-06-10T00:23:47+5:302014-06-10T00:56:24+5:30
रांजणी : घनसावंगी तालुक्यातील रांजणी ग्रा.पं.मध्ये ग्रामविकास अधिकारी, सरपंच, उपसरपंच नसल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
रांजणी : घनसावंगी तालुक्यातील रांजणी ग्रा.पं.मध्ये ग्रामविकास अधिकारी, सरपंच, उपसरपंच नसल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यातच भरीस भर नळांना पंधरा दिवसांपासून पाणी येत नसल्याने महिलांचा उद्रेक दि. ९ रोजी दिसून आला. संतप्त महिलांनी पाण्याच्या मागणीसाठी हंडामोर्चा काढला. मात्र त्याला सामोरे जाण्यास कोणीही नसल्याने अखेर महिलांनी ग्रा.पं.ला कुलूप ठोकून प्रशासनाचा निषेध केला.
यावेळी रुखीयाबी शाह, आबेदामी शेख, जुलेका अन्वरीबी, खुर्शिदा आदीसह फकीर गल्ली भागातील महिला, नागरिक मोठ्या संख्येने हजर होते. यावेळी महिलांसोबतच ग्रा.पं. सदस्य शेख रहीम, शफीक आतार, सेनेचे उपतालुका प्रमुख रामराव देशमुख, विश्वंभर वरखडे, अंकुशराव देवकर, शकील कुरेशी, गफूर कुरेशी, रशिद शेख, खालेद शेख , सय्यद लाल आदी उपस्थित होते.
जनता वाऱ्यावर
रांजणी ग्रा.पं. सरपंचपद जात पडताळणी प्रकरणाने रिक्त असून ग्रामविकास अधिकारी ई. टी. मुरदकर यांची परतूर पं.स.मध्ये बदली झालेली आहे. सध्या ही ग्रा.पं. सेनेकडे आहे. मात्र सेनेच्या सदस्यांना विश्वासात घेतले जात नसल्याने सदस्य नाराज आहेत. सरपंच, ग्रामविकास अधिकाऱ्यांनी तेराव्या वित्त आयोगाचा निधी कर्च करुन मोकळे झाले असून खर्चाची जुळवाजुळव झाली नसल्याने बदली झालेल्या ग्रा.वि.अ. यांनी पद्भार सोडला नसल्याचे कळते. मागील अनेक दिवसांपासून रांजणी ग्रा.पं. बेवारस असल्याने रहिवासी, विविध प्रमाणपत्रे व इतर कामे खोळंबली आहेत. यासंदर्भात विस्तार अधिकारी झिने यांना विचारणा केली असता रांजणी येथे ग्रामविकास अधिकारी म्हणून राणीउंचेगावहून सूर्यवंशी येणार असल्याचे सांगितले. परंतू त्यांना ग्रामविकास अधिकारी पदाचा पदभार दिलेला नसल्याचे सांगितले. दरम्यान, गावातील सर्वच भागातील पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी ग्रामस्थांतून जोर धरत आहे. ग्रामस्थांना नियोजनाअभावी बारमाही तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. (वार्ताहर)
रांजणी ग्रा.पं.साठी ग्रामविकास अधिकारी देण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन लवकरच निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती घनसावंगी पंचायत समितीचे सभापती मधुकर साळवे यांनी दिली.