महिलांचा छळ थांबेना..!
By Admin | Published: July 10, 2017 12:39 AM2017-07-10T00:39:29+5:302017-07-10T00:40:02+5:30
जालना : जिल्ह्यात महिलांवरील शारीरिक व मानसिक अत्याचाराच्या घटना थांबता थांबायला तयार नाहीत.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्ह्यात महिलांवरील शारीरिक व मानसिक अत्याचाराच्या घटना थांबता थांबायला तयार नाहीत. गत दीड वर्षात सासरकडील होणाऱ्या छळामुळे ३३३ संसार उद्ध्वस्त झाले आहेत. तर छेडछाड व विनयभंगाच्या ३२० घटना घडल्या आहेत.
महिलांना सन्मानाची वागणूक मिळावी, त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी शासनासह सामाजिक स्तरावर वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत. असे असले तरी कौटुंबीक हिंसाचार, आत्महत्येस प्रवृत्त करणे, छेडछाड, लैंगिक छळ, बलात्कार यासारख्या घटनांचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात दीड वर्षात महिलांवर लैंगिक अत्याचाराच्या ६७ घटना घडल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणी होणारी छेडछाड, विनयभंगाच्या ३२० घटनांमध्ये अनेक युवतींना मानसिक त्रासाबरोबर आपले शिक्षण, नोकरी सोडण्याचे प्रसंग घडले आहेत. माहेरहून हुंडा आणला नाही म्हणून दीड वर्षात सासरकडील मंडळींकडून तीन महिलांचे खून झाले असून, पाच महिलांच्या खुनाचाप्रयत्न झाल्याची नोंद आहे. प्रेम प्रकरण, लैंगिक संबंधास नकार, कौटुंबिक वाद यासारख्या कारणांमुळे युवती व महिलांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या २५ घटना दीड वर्षात घडल्याचे पोलीस प्रशासनाकडील आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. ग्रामीण भागात घडणाऱ्या महिला अत्याचाराच्या अनेक घटनांची पोलीस प्रशासनाकडे नोंद होत नसल्याची वस्तुस्थिती आहे. महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी प्रभावी कायद्यांबरोबर त्याच्या कठोर अंमलबजावणीची गरज आहे.