परराज्यात महिलांच्या विक्रीचा गोरखधंदा तेजीत; ६ वर्षांत औरंगाबादमधील ५०८ महिला बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 01:08 PM2020-02-12T13:08:58+5:302020-02-12T13:19:51+5:30
नोकरी, व्यवसाय व लग्नाच्या आमिषाने परप्रांतात नेऊन विक्री करण्याचा गोरखधंदा तेजीत
- बापू सोळुंके
औरंगाबाद : १५ दिवसांसाठी कामाला जायचेय अशी थाप मारून गरजू महिलांना परराज्यात नेऊन त्यांची विक्री केली जात असल्याच्या घटना समोर येत आहेत. याप्रकरणी गतवर्षी जवाहनगर, हर्सूल ठाण्यात तीन महिलांची विक्री करणाऱ्या वेगवेगळ्या रॅकेटचा पर्दाफाश केल्यानंतर जिन्सी पोलिसांनी आणखी एका रॅकेटमधील आरोपींना चार दिवसांपूर्वी बेड्या ठोकल्या. सहा वर्षांत शहरातून बेपत्ता असलेल्या ५०८ महिलांपैकी किती जणी रॅकेटच्या बळी ठरल्या आहेत, याचे गूढ मात्र उकलले नाही.
कामासाठी परराज्यात जायचे असल्याची थाप मारून सोबत नेलेल्या गरजू महिलेचे लग्न तिच्या संमतीविना अनोळखी व्यक्तीसोबत लावले जाते. खरेदीदार काही दिवस तिचा सांभाळ करतो आणि नंतर तोसुद्धा त्या महिलेची दुसऱ्याला विक्री करतो. औरंगाबादेतील एका महिलेची दीड लाखात गुजरातच्या नीलेश पटेल याला अडीच वर्षांपूर्वी विक्री करण्यात आली होती. स्वत:ची सुटका करून औरंगाबादेत परतलेल्या महिलेने जिन्सी पोलिसांना तक्रार नोंदविली. यानंतर या रॅकेटमधील दोन महिलांसह एका तरुणाला चार दिवसांपूर्वी अटक झाली. खरेदीदार नीलेश पटेल याला गुजरातमध्ये अटक करण्यात पोलिसांना यश आले. हर्सूल परिसरातून कामासाठी गेलेल्या तरुणीला ७० हजार रुपयांत विकण्यात आले होते. हा प्रकार समजल्यानंतर हर्सूल पोलिसांनी खरेदीदार पिता-पुत्राला अटक केली होती. गारखेड्यातील इंदिरानगर येथील दोन गरजू महिलांची परप्रांतात विक्री करण्यात आल्याचा गंभीर प्रकार जवाहरनगर पोलिसांनी उघडकीस आणला होता. यापैकी एक तरुणी अद्यापही पोलिसांना सापडली नाही.
वर्षभरात तीन घटना समोर आल्या आहेत. १ जानेवारी २०१४ ते ३१ डिसेंबर २०१९ या सहा वर्षांत ५०८ महिला बेपत्ता असल्याची पोलीस दप्तरी नोंद आहे. या सर्व महिला १८ वर्षांवरील आहेत. यापैकी किती महिलांची लग्नासाठी परप्रांतात विक्री करण्यात आली, याबाबतची माहिती पोलिसांकडे नाही. असे असले तरी शहरातील महिलांना कामानिमित्त परराज्यात नेऊन विक्री केली जाते, हे वर्षभरातील तीन घटनांवरून स्पष्ट झाले आहे.
‘त्या’ राज्यात मागणी
मुलींचा जन्मदर कमी असलेल्या राज्यातील तरुणांना विवाहासाठी मुलगी मिळणे कठीण झाले. वयाची चाळिशी ओलांडल्यानंतरही लग्न होत नसल्याने असे घोडनवरदेव गरजू महिलांची खरेदी करून त्यांच्यासोबत विवाह करीत असल्याचे समोर आले. महिलांची खरेदी-विक्री करणाऱ्या रॅकेटचे धागेदोरे औरंगाबादमध्ये असल्याचे समोर आले.
बेपत्ता महिलांची तक्रार आल्यानंतर पोलीस त्यांचा शोध घेऊन परत आणण्याचा प्रयत्न करतात. मात्र, ज्या महिला स्वेच्छेने घरातून निघून जातात. बऱ्याचदा त्या देहविक्रय व्यवसाय करतात. बदनामी होईल म्हणून त्या घरी येत नाहीत. बेपत्ता महिलांच्या विक्रीची आकडेवारी आमच्याकडे नाही. मात्र, गतवर्षी जवाहरनगर, हर्सूल आणि आता जिन्सी ठाण्यात या गुन्ह्यांची नोंद झाली.
- डॉ. नागनाथ कोडे, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा
वर्ष हरवलेल्या शोध न लागलेल्या
महिला महिलांची संख्या
२०१४ ५१३ ३७
२०१५ ६१८ ४८
२०१६ ४८३ ५२
२०१७ ४२८ ६०
२०१८ ५५४ ७३
२०१९ ६१२ ११९
शोध न लागलेल्या महिला - ५०८