सावधानता हीच सुरक्षा ! सायबर गुन्हेगारी बेततेय महिलांच्या जिवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 06:28 PM2019-05-30T18:28:05+5:302019-05-30T18:31:28+5:30

सायबर गुन्हेगार हमखास पकडला जातो; आत्मघात करण्याऐवजी पोलिसांची घ्या मदत 

Womens Suffering from cyber crime | सावधानता हीच सुरक्षा ! सायबर गुन्हेगारी बेततेय महिलांच्या जिवावर

सावधानता हीच सुरक्षा ! सायबर गुन्हेगारी बेततेय महिलांच्या जिवावर

googlenewsNext
ठळक मुद्देमित्र-मैत्रिणींना छायाचित्रे, माहिती पाठविणे ठरतेय धोक्याचेसोशल मीडियाची विदारक बाजू समोर

- रुचिका पालोदकर 

औरंगाबाद : आज प्रत्येक गोष्टीचे सेलिब्रेशन हे फोटो काढून केले जाते. गोष्टी फक्त फोटो काढण्यापुरत्याच मर्यादित राहत नाहीत तर लगेच सोशल मीडियाच्या माध्यमातून ते फोटो ‘व्हायरल’ करण्याकडे अनेकांचा कल असतो. याच गोष्टीमुळे  सायबर गुन्हेगारी वाढत चालली असून, या माध्यमातून होणारी बदनामी महिलांच्या जिवावर बेतते आहे.

शहरात अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीच्या बाबतीत नुकतीच अशा प्रकारची घटना घडली. तिच्या मित्राने तिचे फोटो लॅपटॉपमधून तिच्या नकळत मिळविले आणि सोशल मीडियावर तिची बदनामी सुरू केली. या गोष्टीमुळे त्रस्त होऊन त्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली. अशा घटना वारंवार होत असल्यामुळे सोशल मीडियाची ही विदारक बाजू समोर येत आहे. सायबर गुन्हेगारी या प्रकारात गुन्हा करणारी व्यक्ती स्वत:ची ओळख लपवून असते. स्वत:ची माहिती लपविण्याचे अनेक प्रकार उपलब्ध असल्यामुळे अनेकदा गुन्हेगार कोण याचा शोध लावणे अवघड होते. याशिवाय सायबर गुन्हेगारी या प्रकारात फसवणूक झालेली व्यक्ती अनेकदा माहितीच्या अभावी किंवा दडपणामुळे तक्रार नोंदविण्याचे धाडस करीत नाही. त्यामुळे या प्रकारात गुन्हेगार पकडण्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे. याच गोष्टीमुळे अशा प्रकारचे गुन्हे सर्रास होताना दिसून येत आहेत. 

इंटरनेट आज मोबाईलच्या रूपात अत्यंत स्वस्त दरात प्रत्येकाच्या हातात उपलब्ध आहे. इंटरनेटच्या माध्यमातून कोणाची बदनामी करणे, कोणाबद्दल अश्लीलता पसरविणे हे गुन्हेगारीचे प्रकार आहेत. पण मुळात आपण करतो आहोत तो गुन्हा आहे, हीच गोष्ट गुन्हेगाराच्या लक्षात येत नाही. 

इंटरनेट नैतिकता जपणे आवश्यक
सोशल मीडियावर महिलांविषयी बदनामीकारक संदेश पसरविणे, अश्लीलता पसरविणे हे सर्व प्रकार सायबर गुन्ह्यांमध्ये मोडतात. या सर्व गोष्टींचे प्रमाण वाढत असून, यासाठी महिलांमध्ये जागरूकता निर्माण होणे गरजेचे आहे. असे प्रकार घडल्यास महिलांनी स्वत:हून पुढे यावे. केवळ तक्रार नोंदवून न थांबता गुन्हा दाखल करावा, जेणेकरून गुन्हेगाराला शिक्षा होईल आणि अशा गुन्ह्यांना आळा बसेल. ज्याप्रमाणे समाजात वागताना नैतिकता जपणे आवश्यक असते, त्याप्रमाणे इंटरनेट हाताळतानाही इंटरनेट नैतिकता जपणे गरजेचे असते. इंटरनेट युजर्सनी ही नैतिकता शिकावी, असे मत सायबर पोलिसांनी व्यक्त केले.

सायबर गुन्हेगारीअंतर्गत होणारी शिक्षा
सायबर गुन्हेगारी प्रकारात गुन्हेगाराला कमीत कमी ३ वर्षे तर जास्तीत जास्त ७ वर्षे शिक्षा होऊ शकते. यामध्ये जर महिलांविषयी अश्लीलता परसविण्याचा प्रकार घडला असेल तर गुन्हेगाराला जामीन मिळत नाही.
हॅकिंगसारख्या गुन्ह्यांना ६६- सी या कलमांतर्गत शिक्षा केली जाते. 
लहान मुलींची बदनामी, अश्लीलता यासाठी कलम ६७-बी आहे तर मोठ्या मुुलींच्या संदर्भातील गुन्ह्यांसाठी ६७-ए  कलम आहे. 
खाजगी फोटो काढून त्या फोटोंद्वारे महिलांची बदनामी करणाऱ्या गुन्हेगाराला ६६-ई या कलमाखाली शिक्षा होऊ शकते. 

गुन्हेगार हमखास पकडला जातो
सायबर गुन्हेगारीचे प्रकार स्वत:बाबतीत घडल्यास महिलांनी आत्महत्येचे टोक न गाठता आधी सायबर गुन्हे शाखेत संपर्क साधावा. यामध्ये गुन्हेगाराला पकडणे शक्य आहे. कारण आमच्याकडे गुन्हेगार शोधण्यासाठीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. याशिवाय या सर्व गोष्टी तांत्रिक स्वरूपातील असल्यामुळे यातील पुरावे कायमस्वरूपी राहतात. शब्द फिरविणे असा सामान्यपणे इतर गुन्ह्यात दिसणारा प्रकार याबाबतीत नसल्यामुळे पुरावे कायम इलेक्ट्रॉनिक स्वरूपात टिकून राहतात. कोर्टात सादर करता येतात आणि न्याय मिळवून देता येतो, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. 

महिला आयोग, महिला संघटनांचे मौन
एकीकडे सायबर गुन्हेगारी महिलांच्या जिवावर बेतत असताना शहरातील तथाकथित महिला संघटना आणि राज्य महिला आयोगाने मात्र याबाबतीत मौन पत्करले आहे. मौनच बाळगायचे असेल तर महिला संघटना आणि महिला आयोग कशासाठी, असा प्रश्न सर्वसामान्य महिला आणि तरुणी उपस्थित करीत आहेत. 

सोशल मिडीयाचा जबाबदारीने वापर करावा 
आत्महत्या करून स्वत:चे जीवन संपविणे हा पर्याय असू शकत नाही. असा प्रकार घडल्यास पोलिसांकडे गुन्हा नोंदवून खंबीरपणे या गोष्टींना सामोरे गेले पाहिजे. मुळात सोशल मीडियाचा वापर अत्यंत जबाबदारीने केला पाहिजे आणि वैयक्तिक गोष्टी सोशल मीडियावर टाकताना भान ठेवले पाहिजे. सोशल मीडियासारख्या आभासी जगातील अनोळखी लोकांशी किती मोकळेपणाने बोलायचे, याच्या मर्यादा ठरवून घेतल्यावर अशा घटनांचे प्रमाण निश्चितच कमी होईल.
- डॉ. रश्मी बोरीकर, सजग महिला संघर्ष समिती

Web Title: Womens Suffering from cyber crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.