महिला कुस्तीपटूने केला पुरुष पहेलवानाचा पराभव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 12:27 AM2017-10-04T00:27:42+5:302017-10-04T00:27:42+5:30
पूर्णा येथे आयोजित केलेल्या कुस्ती स्पर्धेत एका महिला कुस्तीपटूने पुरुष पहेलवानाला चीत केल्यानंतर सर्वांनाच अमीर खानच्या दंगल या चित्रपटाची आठवण झाली. महिला कुठेही कमी नाहीत हेच आमिर खानने या चित्रपटात दाखवून दिले होते. या चित्रपटातील आशयाची पूर्णेत पुनरावृत्ती झाल्याचे पहावयास मिळाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
पूर्णा : पूर्णा येथे आयोजित केलेल्या कुस्ती स्पर्धेत एका महिला कुस्तीपटूने पुरुष पहेलवानाला चीत केल्यानंतर सर्वांनाच अमीर खानच्या दंगल या चित्रपटाची आठवण झाली. महिला कुठेही कमी नाहीत हेच आमिर खानने या चित्रपटात दाखवून दिले होते. या चित्रपटातील आशयाची पूर्णेत पुनरावृत्ती झाल्याचे पहावयास मिळाले.
महाराष्ट्र व्यायामशाळा पूर्णा यांच्या वतीने आयोजित कुस्ती स्पर्धेमध्ये पुसद येथील १७ वर्षीय महिमा राठोड या मुलीने पुरुष पहेलवानास अवघ्या १० मिनिटात चीत केले. ३ आॅक्टोबर रोजी हा कुस्तीचा सामना रंगला. विजेत्या महिमा राठोड हिचे टाळ्यांच्या कडकडाटात कौतुक करण्यात आले.
३ आॅक्टोबर रोजी पूर्णा येथे या स्पर्धा पार पडल्या. दुपारी ३ वाजता लहान पहेलवानांच्या कुस्त्यांनी स्पर्धेला प्रारंभ झाला. परभणी, नांदेड, पुसद, हिंगोली, औरंगाबाद, जालना आदी जिल्ह्यातील सुमारे १०० हून अधिक पहेलवान या स्पर्धेत सहभागी झाले होते. उपनगराध्यक्ष विशाल कदम, शिवसेना शहरप्रमुख नितीन कदम, पोलीस निरीक्षक सुनील ओव्हळ, पहेलवान साहेबराव साखरे, बालाजी गव्हाणे, केशव साखरे, पत्रकार दौलत भोसले, संयोजक प्रताप कदम यांच्या उपस्थितीत पहिली कुस्ती स्पर्धा पार पडली.
खा.बंडू जाधव, व्यंकटेश शिंदे, नगरसेवक अमरदीप रोडे, संदीप भालेराव, रामप्रसाद रणेर, तालुकाप्रमुख काशीनाथ काळबांडे, साहेब कदम, श्याम कदम यांच्या उपस्थितीत महिला कुस्तीपटू महिमा राठोड व पूर्णा तालुक्यातील धनगर टाकळी येथील बाळू गव्हाणे या दोन पहेलवानांचा सामना रंगला. महिमा राठोड हिने १० मिनिटांमध्ये प्रतिस्पर्धी पहेलवानाला चीत करीत हा सामना जिंकला.
विजेत्या महिमा राठोड हीस खा.बंडू जाधव यांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत कुस्तीचे हे सामने सुरु होते. महिमा राठोड ही पुसद येथील रहिवासी असून यापूर्वी तिने आंतराष्ट्रीय स्तरावर दोन वेळा रजत तर राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत दोन वेळा सुवर्णपदक पटकाविले आहे. मराठवाड्यातील मुलींमध्ये कुस्तीबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने आपण ग्रामीण कुस्ती स्पर्धेत सहभाग नोंदवित असल्याचे तिने सांगितले.