जुन्या नाण्यांच्या माध्यमातून अनुभवला समृद्ध इतिहास, आशुतोष पाटील या विद्यार्थ्यांचा थक्क करणारा संग्रह
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2017 08:09 PM2017-12-02T20:09:44+5:302017-12-02T20:09:56+5:30
नाणे संग्राहक व अभ्यासक आशुतोष पाटील यांच्या संग्रहातील अत्यंत मौल्यवान आणि दुर्मिळ अशा ऐतिहासिक नाण्यांचे प्रदर्शन गुरुवारी (दि. ३०) देवगिरी महाविद्यालयात पार पडले.
मयूर देवकर
औरंगाबाद : नाणे संग्राहक व अभ्यासक आशुतोष पाटील यांच्या संग्रहातील अत्यंत मौल्यवान आणि दुर्मिळ अशा ऐतिहासिक नाण्यांचे प्रदर्शन गुरुवारी (दि. ३०) देवगिरी महाविद्यालयात पार पडले. इ.स. पूर्व ६०० ते स्वातंत्र्योत्तर काळातील विविध नाणी व नोटा पाहण्याची संधी याद्वारे विद्यार्थ्यांना मिळाली.
प्रदर्शनामध्ये प्राचीन नाण्यांमध्ये पंचमार्क नाणी, शाक्य, विदर्भ, विदिषा, उज्जैनसारख्या अनेक गणजनपदांची नाणी, सातवाहन काळातील विविध राज्यकर्ते, हुन, कुशान, गुप्त, पश्चिम क्षत्रिप नाणी, इ.स. पूर्व दोनमधील गजलक्ष्मी नाणे ठेवण्यात आली होती. ‘साधारणपणे इ.स. पूर्व सहाव्या शतकात भारतात सर्वप्रथम पंचमार्क नाण्यांची सुरुवात झाली होती. सुरुवातीच्या काळात प्रामुख्याने चांदीची नाणी तयार करण्यात आली. ही नाणी ‘आहत’ पद्धतीने म्हणजे नाण्याच्या एका बाजूस वेली, सूर्य, पर्वत, प्राणी, पक्षी अशा विविध चिन्हांचे ठसे उमटवून तयार केली जात असत, अशी माहिती पाटील यांनी दिली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील सुवर्ण होन, अर्धी शिवराई, तसेच सूर्य, चंद्र, बेलाचे पान, शिवपिंड, त्रिशूळ अशी चिन्हे असलेली त्या काळातील विविध नाणी यामध्ये ठेवण्यात आली होती. शिवराईच्या जवळपास दीडशेच्यावर आवृत्त्या आढळत असल्याचे पाटील यांनी सांगितले.
मुघलकालीन नाण्यांमध्ये अल्लाउद्दीन खिलजी, मोहम्मद तुघलक, औरंगजेब, अकबर, शहाजहाँ, शहा आलम, मोहम्मद शहा, मुर्तुजा निजाम, बुºहाण निजाम राजवटीतील चांदी व तांब्यांची नाणी, ब्रिटिशकालीन भारताच्या नाण्यांमध्ये ईस्ट इंडिया कंपनी, सातवा एडवर्ड, पाचवा जॉर्ज, राणी व्हिक्टोरिया, सहावा जॉर्ज यांच्या नाणी आणि स्वातंत्र्योत्तर भारतातील अर्ध्या आण्यापासून ते पाचशेच्या नव्या नोटेचा प्रदर्शनात समावेश होता.
त्याचबरोबर विद्यार्थ्यांना या प्रदर्शनामध्ये माल्टा, रवांडा, साऊथ कोरिया, मोझाम्बिक्वे, लक्झबर्ग अशा तीस ते चाळीस देशांतील नोटा पाहायला मिळाल्या. त्यामध्ये व्हिएतनामची दोन लाखांची नोट आणि भारताचा दीडशे रुपयांचा क्वॉईन आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले.
‘पुरातत्वाच्या दृष्टीने नाणी अमूल्य पुरावा असतात. इतिहासातील अनेक राजांची नावे, त्यांचे प्रदेश आणि कालखंड याचा उलगडा नाण्यांमुळेच झाला आहे. कालौघात विस्मृतीत गेलेल्या अनेक साम्राज्यांचा इतिहास, जीवनपद्धती नाण्यांमुळेच ज्ञात होतो’, असे पाटील यांनी नाण्यांचे महत्त्व विशद करताना सांगितले.