नवलच! रोबोटने केली गणरायाची आरती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 12:55 AM2017-09-02T00:55:06+5:302017-09-02T00:55:06+5:30

आतापर्यंत तुम्ही हत्तीला गणरायाची आरती करताना पाहिले असेल; परंतु आजच्या मॉडर्न इंडियामध्ये रोबोटच्या हस्ते आरती केली जाते, असे सांगितले तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही; पण हे खरे आहे

Wonderfull! Robot is doing aarti! | नवलच! रोबोटने केली गणरायाची आरती !

नवलच! रोबोटने केली गणरायाची आरती !

googlenewsNext

मयूर देवकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : आतापर्यंत तुम्ही हत्तीला गणरायाची आरती करताना पाहिले असेल; परंतु आजच्या मॉडर्न इंडियामध्ये रोबोटच्या हस्ते आरती केली जाते, असे सांगितले तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही; पण हे खरे आहे. औरंगाबाद येथील ‘टूल टेक टूलिंग्स’ कंपनीमध्ये गणेशाची आरती एका स्वयंचलित रोबोटद्वारे केली जाते. ६४ कलांची देवता असणाºया गणरायाची अशी आरती पाहून काळ किती पुढे गेला आणि भविष्यात रोबोट काय काय करू शकतो याची कल्पना येते.
हाती पंचारती घेऊन गजाननाची आरती करणारा हा रोबोट परिसरात कौतुक आणि औत्सुक्याचा विषय ठरत आहे. वाळूज औद्योगिक वसाहतीमधील ‘टूल टेक टूलिंग्स’ कंपनीमध्ये रोज सकाळी आणि सायंकाळी सर्व कर्मचारी आणि कामगारांच्या उपस्थितीत अशी ‘टेक्नो आरती’ केली जाते.
‘माणसाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर तंत्रज्ञानामध्ये अफाट प्रगती साधली आहे आणि गणपती ही बुद्धीची देवता आहे. म्हणून कृतज्ञतेच्या भावनेतून आपण तंत्रज्ञानातूनच गणरायासाठी काहीतरी केले पाहिजे, या हेतूनेच हा उपक्रम साकारण्यात आला आहे, असे कंपनीचे संचालक सुनील किर्दक यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
आपला बाप्पा नेहमीच प्रत्येकातील ‘क्रिएटिव्हिटी’ बाहेर काढतो. म्हणून तर यंदाच्या गणेशोत्सवात काहीतरी हटके करायचे या विचारातून ‘टूल टेक टूलिंग्स’ कंपनीतील इंजिनिअर्सनी रोबोटच्या हस्ते आरती करण्याचे ठरवले. कंट्रोलप्रमुख प्रदीप पांडे व कंट्रोल इंजिनिअर शुभम सौरभ यांनी या रोबोटवर काम केले आहे. ते सांगतात, ‘साधारण एक महिन्यापूर्वी सर्व टीम सदस्यांच्या चर्चेतून ही कल्पना समोर आली. वरिष्ठांकडून होकार मिळाल्यानंतर आम्ही काम सुरू केले. सर्वप्रथम तर आरती कशी केली जाते याचा सविस्तर अभ्यास केला. आरतीचे ताट कसे ओवाळले जाते, ओवाळण्याची योग्य पद्धत कोणती, आरतीमधील इतर विधी कोणते, हे आधी समजून घेतले. त्यानुसार मग रोबोटला कोणत्या सूचना द्यायच्या त्याचा आराखडा बनवून प्रोग्राम तयार केला. दैनंदिन कामापेक्षा काहीतरी वेगळे करायला मिळाले याचे खूप समाधान आहे.
मग आरतीस किती वेळ लागतो, त्यानुसार ओवाळण्याची क्रिया निश्चित करण्यात आली. सेकंदा-सेकंदाचे आणि इंचा-इंचाचे मोजमाप करून रोबोटच्या हालचालींची आखणी व प्रोग्राम तयार करण्यात आला. आरती सुरू होताच रोबोट आरती ओवाळतो आणि आरती पूर्ण झाल्यावर सर्वांसमोर आरतीचे ताट धरून आरतीदेखील देतो.
‘सर्व औद्योगिक कारखाने यंत्रावरच अवलंबून आहेत. मग कंपनीतील गणपतीची आरती यंत्रानेच करावी, जेणेकरून त्यावर बाप्पाची कृपा होईल, अशी या संकल्पनेमागची भूमिका प्लँटप्रमुख शैलेश मुळूक यांनी स्पष्ट केली. हा आरती करणारा रोबोट पाहण्यासाठी वाळूज औद्यागिक वासाहतील इतर कंपन्यांचे कर्मचारी आणि कामगार आवर्जून आरतीला येतात. रोजच्या रटाळ वेळापत्रकातून जरा वेगळे काहीतरी अनुभवण्याची संधी त्यांना यातून मिळते. जग ‘आॅटोमेशन’कडे जात असताना धार्मिक विधीदेखील ‘टेक्नो सॅव्ही’ होणार असे दिसतेय.

Web Title: Wonderfull! Robot is doing aarti!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.