पुलाचे काम वेगात;पण वाहतुकीची गती मंदावली
By Admin | Published: September 11, 2014 01:31 AM2014-09-11T01:31:12+5:302014-09-11T01:31:12+5:30
औरंगाबाद : जालना रोडवरील वाहतुकीची वर्दळ लक्षात घेऊन मोंढा नाका चौकात उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्याचे कामही सुरू झाले.
औरंगाबाद : जालना रोडवरील वाहतुकीची वर्दळ लक्षात घेऊन मोंढा नाका चौकात उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्याचे कामही सुरू झाले. उड्डाणपूल उभारणीच्या कामास गती येत आहे; परंतु वाहतूक सुरळीत राहावी, या उद्देशाने तयार केलेल्या पर्यायी रस्त्यावरच होणारी पार्किंग, विद्युत खांबांमुळे या मार्गावर वाहन चालविणे मुश्कील होत आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठीच्या पर्यायी रस्त्याच्या मुख्य उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. त्यामुळे ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना अक्षरक्ष: अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे.
रस्ते विकास महामंडळातर्फे मोंढा नाका, महावीर चौक आणि सिडको बसस्थानक चौक या तीन ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यात येत आहेत. तिन्ही ठिकाणी उड्डाणपूल उभारणीचे काम सुरू झाले असून, पुलांची उभारणी झाल्यानंतर जालना रोडवरील वाहतूक कोंडी फुटणार, असा अंदाज आहे. मोंढा नाका येथील उड्डाणपूल उभारणीसाठी १५ महिने, महावीर चौकाच्या कामासाठी १८, तर सिडको बसस्थानक चौकातील उड्डाणपूल उभारणीसाठी २४ महिन्यांचा कालावधी कंत्राटदाराला देण्यात आला आहे. तिन्ही उड्डाणपुलांच्या कामामध्ये मोंढा नाका पुलाचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे दिसून येते. रस्त्यावरील वाहनांची वर्दळ लक्षात घेऊन पुलाचे काम सुरू करण्याआधी मोंढा नाका येथे दोन्ही बाजूंनी पर्यायी रस्ता तयार करण्यात आला.