वाहनांच्या वर्दळीमुळे खोळंबली जुन्या बीड बायपासवरील उड्डाणपुलांची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 07:32 PM2021-02-13T19:32:09+5:302021-02-13T19:39:39+5:30

When will the old Beed bypass be safe? पावसाळ्यापूर्वी अडथळ्याचे बहुतांश टप्पे पूर्ण करण्याचा जागतिक बँक प्रकल्प विभागाचा प्रयत्न आहे.

Work on deepened flyovers due to traffic congestion; When will the old Beed bypass be safe? | वाहनांच्या वर्दळीमुळे खोळंबली जुन्या बीड बायपासवरील उड्डाणपुलांची कामे

वाहनांच्या वर्दळीमुळे खोळंबली जुन्या बीड बायपासवरील उड्डाणपुलांची कामे

googlenewsNext
ठळक मुद्देकेंब्रीज शाळेजवळ (जालना रोड), देवळाई चौक, संग्रामनगर आणि एमआयटी कॉलेजजवळ असे चार उड्डाणपूल उभारले जाणार पोलीस प्रशासनाकडे आम्ही वाहतूक नियमनासाठी प्रस्ताव दिलेला आहे

- विजय सरवदे

औरंगाबाद : वाहनांच्या चोवीस तास वर्दळीमुळे जुन्या बीड बायपास रस्त्यावरील चार उड्डाणपुलांची कामे खोळंबली आहेत. बांधकाम विभागाच्या जागतिक बँक प्रकल्पाने या रस्त्यावरील वाहतूक नियमनासाठी पोलीस प्रशासनाकडे प्रस्ताव दिला असून, तो मंजूर झाला तरच उड्डाण पुलांच्या कामांना सुरुवात होऊ शकते.

मृत्यूचा सापळा म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या बीड बायपास (बाह्यवळण रस्ता) रस्त्याचे रुंदीकरण अर्थात सर्व्हीस रोड (साईड पट्ट्या), उड्डाणपूल व मजबुतीकरणाचा मुद्दा अनेक वर्षांपासून रेंगाळत पडला होता. केंद्र व राज्य सरकारने अनेक पर्याय शोधले. पण, त्यासाठी निधीची उपलब्धता होत नव्हती. अलिकडेच हायब्रीड अन्युटी उपक्रमातून या रस्त्याच्या मजबुतीकरणाचा ठराव संमत झाला. यासाठी २९२ कोटी रुपयांचा निधीही मंजूर झाला. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने विविध विभागांच्या खर्चाला कात्री लावली. मात्र, बीड बायपासच्या निधीला हात न लावता कामे सुरू ठेवली. निविदा प्रक्रियेनंतर 'जीएनआय मनजीत जॉइंट व्हेंचर'ला हे काम मिळाले. प्रशासकीय मंजुरी व अन्य प्रक्रिया दोन-तीन महिने चालली.

एप्रिल २०२० पासून या रस्त्याचे काम सुरू होणार होते. तेवढ्यात लॉकडाऊनमुळे सर्वच कामे ठप्प झाली. अनलॉकनंतर कामाने गती घेतली. आता मजबुतीकरण व विस्तारीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे काम जवळपास संपत आले आहे. साईडपट्ट्यांचे मातीकाम संपल्यानंतर मजबुतीकरणाची कामे सुरु केली जाणार आहेत. मात्र, सध्या या रस्त्यावर ‘एमआयडीसी’ची जलवाहिनी व महावितरणकडून विजेच्या तारा, खांब हटवणे बाकी आहे. याविषयी देखील संबंधित यंत्रणेकडे पाठपुरावा करण्यात आला आहे. संबंधित यंत्रणांकडून ही कामे लवकर झाली तर बायपासच्या कामाचा वेग कायम राहू शकतो.

या रस्त्यावर केंब्रीज शाळेजवळ (जालना रोड), देवळाई चौक, संग्रामनगर आणि एमआयटी कॉलेजजवळ असे चार उड्डाणपूल उभारले जाणार आहेत. देवळाई चौकापासून झाल्टा फाट्याकडे तसेच महानुभाव आश्रम चौकाकडून एमआयटीकडे मजबुतीकरण, साईडपट्ट्याचे काम केले जात आहे. संबंधित यंत्रणांकडून सहकार्य मिळाले, तर काँक्रिटीकरण व उड्डाणपुलांची कामे तातडीने सुरू होतील. पावसाळ्यापूर्वी अडथळ्याचे बहुतांश टप्पे पूर्ण करण्याचा जागतिक बँक प्रकल्प विभागाचा प्रयत्न आहे.

वाहतूक नियमनानंतर गतीने होतील कामे
जागतिक बँक प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता भंडे यांनी सांगितले की, या रस्त्यावर जड वाहनांबरोबर हलक्या वाहनांची मोठी वाहतूक आहे. यासाठी पोलीस प्रशासनाकडे आम्ही वाहतूक नियमनासाठी प्रस्ताव दिलेला आहे. याबाबत येत्या आठ दिवसांत वाहतूक नियमनाची कारवाई होईल. दुसरीकडे, जलवाहिनी व विजेचे खांब आणि तारा हटविण्याची कारवाईदेखील लवकरच होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर रस्ता मजबुतीकरण व चार उड्डाणपुलांची कामे गतीने सुरू होऊ शकतात.

Web Title: Work on deepened flyovers due to traffic congestion; When will the old Beed bypass be safe?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.