डीएमआयसीसाठीच्या जलवाहिनीचे काम ९० टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 12:17 AM2018-01-09T00:17:46+5:302018-01-09T00:17:49+5:30
शेंद्रा व डीएमआयसीसाठी जायकवाडीतून पाणी आणणा-या जलवाहिनीचे ९० टक्के काम झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शेंद्रा व डीएमआयसीसाठी जायकवाडीतून पाणी आणणा-या जलवाहिनीचे ९० टक्के काम झाले आहे. येत्या मार्च महिन्यापासून दररोज ७२ एमएलडी पाणी डीएमआयसीला देण्यात येणार असल्याची माहिती एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता रवींद्र कुलकर्णी यांनी दिली.
शेंद्रा- डीएमआयसी येथील पायाभूत सुविधांची कामे अंतिम टप्प्यात आहे. जायकवाडीतून पाणी तात्काळ पोहोचविण्यासाठी सरकारने स्वतंत्र पाईपलाईनची योजना आखली़ . ११ महिन्यांत हे काम झाले आहे़ अधिकाºयांनी जलवाहिनीचे अंतर कमी करून सरकारचे कोट्यवधी रुपये वाचविल्याचा दावा केला जात आहे.
पैठण ते शेंद्रा हा मार्ग तसा ७० किमीच्या पुढे आहे़ मात्र, एमआयडीसीच्या अधिका-यांनी पैठण-कचनेर-शेंद्रा या मार्गाने हा जलवाहिनीचा आराखडा तयार केला. हे अंतर ५५ किमीपर्यंत आले. सरकारची ही महत्त्वाकांक्षी योजना असून मार्चपासून शेंद्रा औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठा होईल. आता जायकवाडीत तीन ते चार वर्षे पुरेल इतके पाणी आहे. त्यामुळे उद्योगांना पाण्याची कमतरता भासणार नाही, असा दावा कुलकर्णी यांनी केला. काम ९० टक्के पूर्ण झाले असून ३२ किमीपर्यंत पाणी आले आहे. २३ किमीपैकी आठ किमीचे काम मार्चपर्यंत पूर्ण होईल.