राष्ट्रवादीच्या माजी नगराध्यक्षाने टक्केवारी घेऊन कामे वाटली !
By Admin | Published: February 21, 2017 10:58 PM2017-02-21T22:58:35+5:302017-02-21T22:59:20+5:30
उस्मानाबाद : येथील नगर परिषदेच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या
उस्मानाबाद : येथील नगर परिषदेच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. बांधकाम विभागाकडील निविदा मंजुरीचा विषय चर्चेला येताच राष्ट्रवादीचे विद्यमान सदस्य माणिक बनसोडे यांनी राष्ट्रवादीचेच माजी नगराध्यक्ष संपत डोके यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या. टक्केवारी घेवून डोके यांनी कामाची ठिकाणे बदलली, असा गंभीर आरोप त्यांनी केला. आयते कोलीत हाती मिळालेल्या सत्ताधाऱ्यांनी यावेळी बनसोडे यांना उचकाविण्याचा प्रयत्न केला. आरोप प्रोसेडींगवर घ्यावेत, अशी मागणी सत्ताधाऱ्यांनी केल्यानंतर नगराध्यक्षांच्या आदेशावरून आरोप प्रोसेडींगवर घेतले गेले. या प्रकारामुळे विरोधकांची गोची झाल्याचे चित्र पहावयास मिळाले.
पालिकेच्या सर्वसाधारण सभेस दुपारी १ वाजेच्या सुमारास सुरूवात झाली. यावेळी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, उपनगराध्यक्ष सुरज साळुंके यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीच्या सुरूवातीलाच राष्ट्रवादीच्या सदस्यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखविण्याची मागणी केली. नगराध्यक्ष राजेनिंबाळकर यांनी या मागणीला हिरवा कंदिल दिल्यानंतर जवळपास सव्वातास इतिवृत्त वाचनाचे काम चालले. त्यानंतर विषय पत्रिकेवरील विषय चर्चेला घेण्यात आले. बांधकाम विभागाकडे प्राप्त झालेल्या निविदांचा विषय चर्चेला येताच राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य माणिक बनसोडे यांनी त्यावर आक्षेप घेतला. राष्ट्रवादीचे तत्कालीन नगराध्यक्ष संपत डोके यांनी टक्केवारी घेवून दलित वस्तीतील प्रस्तावित कामांची ठिकाणे बदलून मंजुऱ्या दिल्या, असा गंभीर आरोप केला. राष्ट्रवादीचे सदस्यच राष्ट्रवादीच्याच माजी नगराध्यक्षांवर टक्केवारी घेतल्याचा आरोप करीत असल्याचे लक्षात आल्यानंतर सत्ताधारी शिवसेना-भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी बनसोडे यांनी केलेले आरोप रेकॉर्डवर (प्रोसेडिंगवर) घ्या, अशी मागणी केली. त्यावर नगराध्यक्ष राजेनिंबाळकर यांनी संबंधित कर्मचाऱ्यांला आदेशित केल्यानंतर बनसोडे यांचे आरोप प्रोसेडिंगवर घेण्यात आले. बनसोडे यांनी राष्ट्रवादीच्याच माजी नगराध्यक्षावर केलेल्या आरोपामुळे राष्ट्रवादीच्या गटनेत्यासह अन्य सदस्यांचीही अडचण झाल्याचे चित्र सभागृहात होते.
विरोधकांची मागणी फेटाळली
काही महिन्यापूर्वी नगर पालिकेची पहिली सर्वसाधारण सभा झाली होती. या सभेत विरोधी बाकावरील राष्ट्रवादी काँग्रेसने नाट्यगृह अपूर्ण असल्याचे कारण देत ते सुरू करण्यास विरोध दर्शविला होता. यावेळी सत्ताधाऱ्यांनी विरोधकांचा विरोध नोंदवून ठराव बहुमताने मंजूर केला होता. ठरावाच्या इतिवृत्तामध्ये ‘नाट्यगृह सुरू करण्यास राष्ट्रवादीचा विरोध’, असे नमूद करण्यात आले होते. या वाक्यास गटनेते युवराज नळे, नगरसेवक प्रदीप मुंडे यांनी आक्षेप घेत, ‘राष्ट्रवादीचा विरोध’ हे वाक्य वगळावे, अशी मागणी केली. त्यास सत्ताधाऱ्यांनी तीव्र विरोध केला. ‘विरोधक जे बोलले तेच इतिवृत्तात घेतले, त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत संबंधित वाक्य वगळले जाणार नाही’, अशी भूमिका घेत नगराध्यक्ष राजेनिंबाळकर यांनी राष्ट्रवादीच्या सदस्यांची मागणी फेटाळून लावली.(प्रतिनिधी)