वर्षभर मेहनत करा, आयुष्यभर निश्चिंत रहा !
By Admin | Published: January 29, 2016 11:56 PM2016-01-29T23:56:17+5:302016-01-30T00:32:11+5:30
शिरीष शिंदे , बीड पुढील पाच वर्षांत बँक क्षेत्रामध्ये साडेसात लाख नोकऱ्यांची संधी तरुणांसाठी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे आतापासूनच युवकांनी तयारीला लागणे आवश्यक असून
शिरीष शिंदे , बीड
पुढील पाच वर्षांत बँक क्षेत्रामध्ये साडेसात लाख नोकऱ्यांची संधी तरुणांसाठी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे आतापासूनच युवकांनी तयारीला लागणे आवश्यक असून, बँकिंग स्पर्धेचा अभ्यास म्हणजे नोकरीची हमी असल्याचे मत स्टेट बँक आॅफ हैदराबाद कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष राजेंद्र लव्हाळे यांनी व्यक्त केले.
बँकीग स्पर्धा परिक्षेत यश मिळविण्याच्या अनुषंगाने राज्य उपाध्यक्ष लव्हाळे यांची मुलाखत घेतली असता त्यांनी सदरील परीक्षेसंदर्भातील वेगवेगळे पैलू उलगडले. बँकिंग क्षेत्रातील नोकरी अतिशय सुरक्षित मानली जाते. या क्षेत्रात जाण्यासाठी तरुणांनी ध्येय निश्चित केले पाहिजे, असे सांगत नियमितपणे इंग्रजी, गणित, सामान्यज्ञान, पेपरवाचन, तसेच दैनंदिन सराव कायम ठेवणे आवश्यक आहे.
जवळपास वीस स्पर्धा परीक्षांचा पाया हा बँकिंग क्षेत्रात रुजलेला आहे. कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा पाया हा गणित व इंग्रजी असतो, त्यामुळे जी मुले बँकिंग क्षेत्राचा अभ्यास करतात, त्यांना इतर स्पर्धा परीक्षेत यश मिळतेच. सरकारी नोकरी मिळण्याचे प्रवेशद्वार म्हटले तर वावगे ठरणार नाही, असेही ते म्हणाले.
बँकिंग स्पर्धेची तयारी करताना खाजगी कोचिंग क्लासेस लावणे आवश्यक आहे. कोणताही पदवीधर बँकिंग स्पर्धा परीक्षेसाठी पात्र ठरतो. सदरील स्पर्धा परीक्षा देताना किमान सहा तास अभ्यास करणे आवश्यक आहे. वर्ष-सहा महिन्यांची सलग मेहनत आणि पुढील आयुष्यभराची निश्चिंती, असे या बँकिंग क्षेत्राचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या क्षेत्राकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे, असेही ते म्हणाले.