लोकसभेला जिवाचे रान केले, आता विधानसभा मतदारसंघ सोडून घ्या; भाजप कार्यकर्त्यांची मागणी

By विकास राऊत | Published: June 29, 2024 03:16 PM2024-06-29T15:16:45+5:302024-06-29T15:17:03+5:30

भाजपच्या विधानसभानिहाय बैठकीत कार्यकर्त्यांची आग्रही मागणी

work in the Lok Sabha, now keep the assembly constituencies for us; An urgent demand of BJP workers | लोकसभेला जिवाचे रान केले, आता विधानसभा मतदारसंघ सोडून घ्या; भाजप कार्यकर्त्यांची मागणी

लोकसभेला जिवाचे रान केले, आता विधानसभा मतदारसंघ सोडून घ्या; भाजप कार्यकर्त्यांची मागणी

छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद मतदारसंघ शेवटच्या क्षणापर्यंत भाजपला सुटेल, ही अपेक्षा ठेवून जिवाचे रान करून संघटन बांधणी केली. ऐन वेळी जागा शिंदेगटाला सुटली. तरीही महायुती म्हणून एकदिलाने काम करीत विजयश्री खेचली. याचे फळ म्हणून शहरातील मध्य आणि पश्चिम मतदारसंघ भाजपला सोडून घ्यावेत, अशी मागणी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शुक्रवारी शहर जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर यांच्याकडे केली.

शहरातील तिन्ही मतदारसंघांच्या बैठका बाेराळकर यांच्या उपस्थितीत पार पडल्या. पश्चिम मतदारसंघाची बैठक भाजप कार्यालयात, पूर्व मतदारसंघाची बैठक धर्मवीर संभाजी महाविद्यालयात, तर मध्य विधानसभा मतदारसंघाची बैठक खा. डॉ. भागवत कराड यांच्या नूतन कॉलनीतील कार्यालयात झाली. लोकसभा निवडणुकीत शहरातील तिन्ही मतदारसंघांत महायुतीचे उमेदवार खा. संदीपान भुमरे यांना पडलेल्या मतांवरून पुढील रणनीती कशी असावी, यासाठी बैठकीत चर्चा करण्यात आली.

पूर्व आणि मध्य मतदारसंघात महायुतीला कमी मते आहेत. मुस्लिम आणि दलित मतदारांपर्यंत जाताना नवीन मुद्दे घेऊन जाण्याचे ठरले. पश्चिम मतदारसंघात सर्वाधिक मते मिळाली असली तरी त्यात भाजपचे योगदान मोठे आहे. त्यामुळे हा मतदारसंघ विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळावा, अशी मागणी कार्यकर्त्यांनी बाेराळकर यांच्याकडे लावून धरली आहे. बैठकीला प्रत्येक मतदारसंघातून फक्त ५० जणांना बोलावण्यात आले होते. यात प्रमुख पदाधिकारी, माजी नगरसेवक व कार्यकर्त्यांचा समावेश होता. दुबार मतदारांची नावे, मतदारयादीत नावे नसणे, बुथनिहाय मतदारांची यादी अद्ययावत करणे इ. कामांवर भाजपने भर देण्याचे ठरविले आहे. तिन्ही मतदारसंघांत नव्या तंत्राने काम करण्यासाठी तयारी केली आहे.

कार्यकर्त्यांचे म्हणणे तर ऐकावे लागेल

लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही पुन्हा नव्याने जाेमाने कामाला लागलो आहोत. जागावाटपाचा निर्णय वरिष्ठ घेतील. परंतु पदाधिकारी, कार्यकर्त्यांची भावना काय आहे, हे तर ऐकून घ्यावे लागेल.

- शिरीष बोराळकर, शहराध्यक्ष, भाजप

Web Title: work in the Lok Sabha, now keep the assembly constituencies for us; An urgent demand of BJP workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.