जळगाव रस्त्याचे काम निधीअभावी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 06:49 PM2019-03-02T18:49:15+5:302019-03-02T18:52:50+5:30

नॅशनल हायवेच्या या भोंगळ कारभाराचा फटका हजारो नागरिकांना बसत आहे. 

Work of Jalgaon road is closed due to lack of funds | जळगाव रस्त्याचे काम निधीअभावी बंद

जळगाव रस्त्याचे काम निधीअभावी बंद

googlenewsNext
ठळक मुद्दे दीडशे कि.मी.मध्ये पन्नास ठिकाणी धोकादायक खोदकाम

औरंगाबाद : मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला जोडणारा प्रमुख रस्ता म्हणजे औरंगाबाद- जळगाव होय. तब्बल १२०० कोटी रुपये खर्च करून या रस्त्याच्या विस्तारीकरणाचे काम दीड वर्षापूर्वी हाती घेण्यात आले आहे. १५० कि. मी. अंतरावरील या रस्त्यात पन्नास ठिकाणी कंत्राटदाराने खोदकाम करून ठेवले आहे. रात्री वेगवेगळ्या अपघातात आतापर्यंत २५ पेक्षा अधिक निष्पाप दुचाकीस्वारांना जीव गमवावा लागला आहे. मागील दीड महिन्यापासून रस्त्याचे काम निधी नसल्याचे कारण समोर करून बंद केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. नॅशनल हायवेच्या या भोंगळ कारभाराचा फटका हजारो नागरिकांना बसत आहे. 

जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पाहण्यासाठी दररोज शेकडो पर्यटक औरंगाबादहून जातात. औरंगाबाद ते जळगाव रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था असताना तो सिमेंट पद्धतीने तयार करण्याचा निर्णय घेतला. पूर्वीपेक्षा रस्ता रुंद करण्याचे निश्चित झाले. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून एनएचएआयकडे रस्ता हस्तांतरित करण्यात आला. तब्बल १२०० कोटी रुपयांची निविदा काढून कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली. 

औरंगाबाद ते फुलंब्रीपर्यंत रस्ता चौपदरी तर पुढे जळगावपर्यंत तीनपदरी ठेवण्यात येईल. डिसेंबर २०१७ मध्ये या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. कंत्राटदाराने अनेक ठिकाणी रस्ता खोदून ठेवला आहे. त्यामुळे रात्री रस्त्याच्या बाजूला असलेले खोल खड्डे अजिबात दिसत नाहीत. त्यामुळे अपघाताच्या प्रमाणात बरीच वाढ झाली आहे.
 सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत २५ पेक्षा अधिक निष्पाप दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला आहे. कंत्राटदार सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याच उपाययोजना करायला तयार नाही. दिवसभर रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरलेले असते. या रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना, वाहनधारकांना अक्षरश: मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. औरंगाबाद-जळगाव रस्ता पूर्वी जेवढा खराब होता, त्यापेक्षा कितीतरी जास्त आता कंत्राटदाराने खराब करून ठेवला आहे.

निधीअभावी काम बंद
१२०० कोटी रुपयांच्या या कामासाठी नॅशनल हायवेने निधी उपलब्ध करून दिला होता. मागील दीड महिन्यापासून कंत्राटदाराने रस्त्याच्या कडेला सर्व यंत्रसामुग्री बांधून ठेवली आहे. निधी संपल्याने काम बंद झाल्याचे कंत्राटदाराचे कर्मचारी सांगत आहेत. निधी आल्याशिवाय काम सुरू होणार नाही, असेही सांगण्यात येत आहे. 

औरंगाबाद -जळगाव रस्त्यावरील प्रमुख गावे
हर्सूल, सावंगी, चौका, बिल्डा फाटा, फुलंब्री, पाल फाटा, महाल किन्होळा फाटा, आळंद, केºहाळा फाटा, माणिकनगर, सिल्लोड, गोळेगाव, अजिंठा गाव, फर्दापूर, वाकोद, पहूर, नेरी, जळगाव.

संथगतीने काम
हर्सूल गावापासून पुढे रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. कुठेच रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आलेले नाही. विस्तारीकरणासाठी दोन्ही बाजूने मोठमोठे खड्डे करून ठेवण्यात आले आहेत. हे काम एवढ्या संथ गतीने सुरू आहे की या रस्त्यावरील विविध गावांतील नागरिक त्रस्त झाले आहेत.

बससेवा पूर्वीप्रमाणेच
औरंगाबाद-जळगाव रस्त्यावरील एकही बस किंवा फेरी कमी करण्यात आलेली नाही. सर्वाधिक बसेस फुलंब्रीपर्यंत आहेत. बसची संख्या कमी करण्याचा प्रश्नच येत नाही. जळगाव डेपोकडूनही बस कमी करण्यात आलेल्या नाहीत. 
- प्रशांत भुसारी, विभागीय नियंत्रक

१० मार्चपर्यंत निधी येईल
आंध्र प्रदेश येथील एका कंपनीने रस्ता विकसित करण्याचे काम घेतले आहे. कंपनीने आतापर्यंत केलेल्या कामाचे बिल नॅशनल हायवेकडे सादर केले आहे. तब्बल ४० कोटींची ही बिले आहेत. कंत्राटदाराला बिलाचे पैसे देण्यासाठी आमच्याकडे निधी नाही. १० मार्चपर्यंत निधी येणार आहे. निधी येताच कंत्राटदार परत काम सुरू करणार आहे. 
-एल. एस. जोशी, अधीक्षक अभियंता, नॅशनल हायवे

Web Title: Work of Jalgaon road is closed due to lack of funds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.