जळगाव रस्त्याचे काम पैशाअभावी बंद; लक्ष कोण देणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 06:09 PM2019-07-03T18:09:17+5:302019-07-03T18:13:05+5:30
अजिंठा आणि जळगावपर्यंत जाणाऱ्या नागरिकांचे हाल
- विकास राऊत
औरंगाबाद : जळगाव ते औरंगाबाद या चौपदरी रस्त्याचे काम पैशांअभावी बंद पडले असून, कंत्राटदाराला बँकेकडून हमी मिळत नसल्यामुळे त्याने तोंड दडविण्यास सुरुवात केली आहे. रस्त्याचे ३० टक्केच काम झाले असून, उर्वरित काम पैसे मिळाले तरच वेगाने होण्याची शक्यता आहे.
राज्य महामार्ग प्राधिकरणाची सर्व सूत्रे मुंबईतून हालत असल्यामुळे स्थानिक कार्यालयातील अभियंत्यांना कंत्राटदार काहीही दाद देईना, तर मुंबई आणि दिल्लीतून पैसे देण्यासाठी कुणीही लक्ष घालेना. परिणामी, पर्यटक, शासकीय कर्मचारी आणि सामान्य नागरिकांना औरंगाबाद ते जळगावपर्यंत जाण्यासाठी रोज धूळ आणि चिखलातून प्रवास करत जावे लागते आहे.
जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांकडे जाण्यासाठी चौपदरी रस्ता असावा, यासाठी लोकमतने तीन वर्षे वृत्तांच्या माध्यमातून पाठपुरावा केला. त्यानंतर केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी लोकमतच्या पाठपुराव्याची दखल घेत भूमिपूजनाच्या दिवशी त्या रस्त्याच्या कामाला चौपदरीकरणाची तत्त्वत: मंजुरी दिली. त्यामुळे रस्त्याच्या खर्चाचा आकडा ८७० कोटींत गेला; परंतु कागदोपत्री तरतूद होण्यासाठी केंद्रीय दळणवळण मंत्रालयाने उशीर केला. दरम्यानच्या काळात कंत्राटदाराने पूर्ण रस्ता खोदून टाकला. सरकारी कार्यालये आणि लेण्यांकडे जाण्यासाठी पर्यायी रस्ता नसल्यामुळे वाहतूक कोंडी, अपघात आणि पाठीच्या दुखण्यासह नागरिक दीड वर्षापासून त्रस्त आहेत.
औरंगाबाद ते अजिंठापासून पुढे फर्दापूर ते जळगावपर्यंत हा रस्ता करण्यात येणार आहे. त्यासाठी तीन टप्प्यांत ८७० कोटींच्या आसपास खर्च होणार आहे. आंध्र प्रदेशमधील ऋत्विक एजन्सी या संस्थेकडे त्या कामाचे कंत्राट असून, चौपदरीकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळावी यासाठी राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांनी दिल्ली मुख्यालयाकडे २० हेलपाटे मारल्यानंतर मंजुरी मिळाली; पण पैसे मिळण्यास दिल्लीकरांनी हात आखडता घेतला.
अधीक्षक अभियंत्यांचे मत असे
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या महामार्ग विभागाचे अधीक्षक अभियंता एल.एस. जोशी यांनी सांगितले, अजिंठा ते सिल्लोड या टप्प्यातील कामाला पैसे मिळालेले नाहीत. दोन टप्प्यांतील पैसे मिळालेले आहेत. कंत्राटदाराला पुढील टप्प्यासाठी बँक गॅरंटी मिळालेली नाही. एका बाजूचे शेवटच्या अडीच किलोमीटरमध्ये काम बाकी आहे. फुलंब्री ते पाल फाट्यापर्यंत एका बाजूने काम झाले आहे. दुसरी बाजू पूर्णत: बाकी आहे. ३० टक्केच काम झाले आहे. सुधारित करार कंत्राटदाराबरोबर करावा लागणार आहे. तेव्हा कामाची डेडलाईन ठरेल. कंत्राटदाराला बँक गॅरंटी मिळण्यात आहे.
५० टक्के रक्कम तरीही ३० टक्केच काम
८७० कोटींपैकी सुमारे ६०० कोटींची नव्याने वाढीव तरतूद झाली आहे. मूळ काम २७0 कोटींचेच होते. साडेसात मीटर रुंद व मध्यवर्ती भागात दुभाजकासह तो रस्ता होईल. शहरात आल्यावर रस्त्याची रुंदी वाढेल. ५० टक्के रक्कम कंत्राटदाराला आजवर दिली आहे.
३०४ कोटी पहिल्या टप्प्यात
२५० कोटी दुसऱ्या टप्प्यात
३१६ कोटी तिसऱ्या टप्प्यात