राष्ट्रीय कृषी विकास योजनेतील कामे संशयाच्या भोवऱ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 11:03 PM2018-10-16T23:03:52+5:302018-10-16T23:05:17+5:30
राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या कामाची देयके अदा करण्यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना असतानाही जिल्ह्यातील काही ठिकाणी कामांचे मूल्यमापन न करताच बिले अदा केल्याच्या तक्रारी सुरू झाल्या आहेत.
औरंगाबाद : राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या कामाची देयके अदा करण्यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना असतानाही जिल्ह्यातील काही ठिकाणी कामांचे मूल्यमापन न करताच बिले अदा केल्याच्या तक्रारी सुरू झाल्या आहेत. परिणामी योजनेतील कामे संशयाच्या भोवºयात आली आहेत. जिल्हा दुष्काळाच्या खाईत गेलेला असताना जलयुक्त शिवार, पाझर तलाव आणि सिमेंट नाला बंधाºयांच्या कामात गैरव्यवहार होण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. या सगळ्या प्रकरणातील दोषी कार्यकारी अभियंता, उपअभियंत्यांवर मात्र कुठलीही कारवाई अद्यापपावेतो झालेली नाही.
वैजापूर तालुक्यातील आलापूरवाडी, शिऊर गाव, कोल्ही, कोरडगाव, साफियाबादवाडी, शिरोडी, भादली, पारळा, नालेगाव, पानगव्हाण, मुंडवाडी, वडनेर, शिवगाव, हाजीपूरवाडी, बिबखेडा, भायगाव, शिवगाव, रोटेगाव, बाभूळतेल येथील पाझर तलावांची कामे न होताच बिले उचलण्यात आल्याचा संशय व्यक्त होतो आहे. उपविभागीय अभियंता आणि कार्यकारी अभियंत्यांनी भौतिकदृष्ट्या सर्व कामे पूर्ण करण्यात आल्याचे प्रमाणित केले आहे.
१०० हेक्टर सिंचन क्षमतेच्या गाव पाझर तलांवाकरिता सप्टेंबर महिन्यात शासनाने थकबाकी देण्याबाबत निधी दिला. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली आहे. मृदू व जलंसधारण आयुक्त दीपक सिंगला यांनी राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या कामाची देयके अदा करताना दक्षता घेण्यासाठी विशेष परिपत्रक जारी केले होते; परंतु त्याची पायमल्ली झाल्याचे दिसत आहे. २०१६ ते २०१८ पर्यंत ५८ कोटी रुपयांचा चुराडा पाझर तलाव सिंचनावर झालेला आहे. त्यातून किती सिंचन झाले, याबाबतची ठोस माहिती काही पुढे येत नाही. उलट गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. औरंगाबाद, वैजापूर, कन्नड, फुलंब्री, गंगापूर या तालुक्यांतील कामांची चौकशीची मागणी होत आहे.
साडेबारा लाख गेले कुठे
सोयगाव तालुक्यातील हळदा येथील पाझर तलावाचे काम पूर्ण होऊन त्याचे साडेबारा लाखांचे बिल अदा करण्यात आले. सविता मजूर सहकारी संस्थेने ते काम केले. पॅनकार्ड, टीडीएस, जीएसटी हे सगळे कररूपी सोपस्कार पार पडल्यानंतर ७९६३३२ या क्रमांकाचा धनादेश संस्थेला देण्यात आला; परंतु सदरील रक्कम या संस्थेच्या खात्यात जमा झाली नाही. शिवाय आॅगस्ट महिन्यात काम अर्धवट असल्याचे कनिष्ठ अभियंत्याने चौकशी करण्याचे आदेश लघुसिंचन कार्यकारी अभियंत्याने दिले. या सगळ्या प्रकारात साडेबारा लाख कुठे गेले याचे उत्तर मात्र मिळत नाही.