‘सुरक्षेसह काम’; औरंगाबादेत उद्योगांचे अर्थचक्र सुरक्षेसह चालूच राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 07:27 PM2020-06-23T19:27:38+5:302020-06-23T19:37:09+5:30
उद्योगांमध्ये जवळपास १ लाखांहून अधिक कामगार कामावर परतले आहेत. म्हणजेच याचा अर्थ तेवढ्या कुटुंबांची दैनंदिनी भागण्यास सुरुवात झाली आहे.
औरंगाबाद : औद्योगिक वसाहतीत कोरोनासंसर्ग झालेले रुग्ण आढळत असल्यामुळे उद्योग पूर्णपणे बंद ठेवावेत, या दिशेने चर्चा सुरू झालेली आहे; परंतु उद्योग बंद ठेवणे परवडणारे नाही. उद्योगांचे अर्थचक्र सुरक्षेसह सुरूच राहील, यासाठी मंगळवारपासून कामगारांसाठी कंपनीत जाऊन कार्यशाळा घेण्यास सुरुवात करण्यात येत असल्याचे सीआयआयचे विभागीय अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी यांनी सांगितले.
‘सुरक्षेसह काम’ हे धोरण औरंगाबादच्या सर्व उद्योग वर्तुळात राबविण्याबाबत कुलकर्णी यांनी सांगितले, प्रत्येक कंपनीत ४० जणांच्या पाठीमागे एक कामगार प्रशिक्षित करण्यात येणार आहे. सीआयआय याबाबत एक प्रशिक्षणवर्ग आयोजित करीत आहे. कामगार, सुपरवायझर यांना कंपनीत आणि घरी गेल्यावर स्वत:च्या घरासह शेजाऱ्यांबाबत काय काळजी घ्यायची आणि सुरक्षा पाळायची याबाबत जागृत करण्यात येईल. मंगळवारपासून रोज एका ठिकाणी हा अभ्यासक्रम सुरू होणार आहे. उद्योग संघटना सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात पुढाकार घेत असून इतर ठिकाणांपेक्षा उद्योगांनी सर्वाधिक जास्त काळजी घेतली आहे.
आता थांबणे परवडणारे नाही
उद्योगांचे अर्थचक्र थांबणे कुणासाठी परवडणारेच नाही. उद्योगांमध्ये जवळपास १ लाखांहून अधिक कामगार कामावर परतले आहेत. म्हणजेच याचा अर्थ तेवढ्या कुटुंबांची दैनंदिनी भागण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे बाजारपेठेतील व्यवसायवृध्दीही वाढली आहे. इंधनाची दरवाढ होत असल्यामुळे सरकारकडील नियमित रोख कमी पडत असल्याचे दिसते आहे. शिवाय कंपन्या जर बंद ठेवल्या तर कर्ज हप्ते देण्याबाबत अडचणी येतील. त्यामुळे सुरक्षा बाळगून कसे काम करायचे, याबाबत प्रशिक्षण देण्यास सुरुवात करीत असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले
जिल्हाधिकारी म्हणाले : औद्योगिक क्षेत्रातील प्रत्येक कंपनीत घेतली जातेय काळजी जिल्हाधिकारी उदय चौधरी म्हणाले, उद्योग बंद करू शकत नाही. उद्योग व्यवस्थापनाने ठरविले तरच बंदचा निर्णय होईल. याबाबत शासन काही सांगू शकेल. प्रशासन याबाबत सध्या काही सांगू शकत नाही. एखादे छोटे युनिट असेल आणि तेथे २० पैकी १५ लोक पॉझिटिव्ह आले तर ते युनिट बंद ठेवावेच लागेल; परंतु आता उद्योग वर्तुळातील अर्थचक्र रुळावर येत आहे. प्रत्येक कंपनीमध्ये सॅनिटायझर दिले जात आहे, मास्क दिले आहेत. उद्योग वर्तुळात जास्त काळजी घेतली जात आहे. सर्व कंपन्यांतील आवारातही सॅनिटायझेशन केले जात आहे.