घाटी रुग्णालयातील परिचारिकांचा काम बंद आंदोलनाचा पवित्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 12:27 AM2017-12-05T00:27:10+5:302017-12-05T00:27:13+5:30
घाटी रुग्णालयातील परिचारिकांनी सोमवारी सकाळी आपल्या मागणीसाठी काम बंद आंदोलनाचा पवित्रा घेतला. त्यामुळे उपअधिष्ठाता, वैद्यकीय अधीक्षकांना रुग्णालयात धाव घ्यावी लागली.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील परिचारिकांनी सोमवारी सकाळी आपल्या मागणीसाठी काम बंद आंदोलनाचा पवित्रा घेतला. त्यामुळे उपअधिष्ठाता, वैद्यकीय अधीक्षकांना रुग्णालयात धाव घ्यावी लागली. जवळपास अर्धा तासाच्या चर्चेनंतर आश्वासन मिळाल्याने परिचारिका कामावर हजर झाल्या. तर दुसरीकडे पडेगाव येथील नर्सिंग ट्रेनिंग सेंटरमधील विद्यार्थिनींनी पुन्हा एकदा आरोग्य उपसंचालक कार्यालयात धाव घेतली.
शासकीय कर्करोग रुग्णालयातील अधिसेविक ा पद गेल्या सहा वर्षांपासून रिक्त आहे. परिणामी अधिसेविकांना अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात येत आहे. कर्करोग रुग्णालयातील अधिसेविक ा पद लवकरात लवकर भरण्याची मागणी करून सोमवारी सकाळी घाटीतील परिचारिकांनी कामावर न जाण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात घाटी प्रशासनाला निवेदनही देण्यात आले होते. त्यानुसार सकाळी ७.३० वाजता नर्सिंग कॉलेजच्या परिसरात सर्व परिचारिका एकत्र जमल्या. यावेळी शासकीय परिचारिका कर्मचारी संघटनेच्या सरचिटणीस इंदूमती थोरात यांच्यासह मोठ्या संख्येने परिचारिकांची उपस्थिती होती. परिचारिकांअभावी रुग्णसेवा विस्कळीत होण्याची परिस्थिती निर्माण झाली. ही बाब कळताच उपअधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे यांनी रुग्णालयात धाव घेऊन परिचारिकांशी चर्चा केली. डिसेंबरपर्यंत सदर पद भरण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यामुळे कामावर न जाण्याचा पवित्रा मागे घेत परिचारिका कर्तव्यावर हजर झाल्या.
विद्यार्थिनींना कारवाईचा इशारा
आरोग्य उपसंचालक कार्यालयात तक्रार घेऊन गेलेल्या नर्सिंगच्या विद्यार्थिनींवर कारवाई करण्याचा इशारा आरोग्य उपसंचालक डॉ. विजय कं देवाड यांनी दिला. त्यामुळे या विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
पडेगाव येथील नर्सिंग ट्रेनिंग सेंटरमधील विद्यार्थिनींनी ६ नोव्हेंबर रोजी पालकांसह आरोग्य उपसंचालक कार्यालयात ठिय्या मांडला होता. प्राचार्या, पाठ्य निर्देशिका मानसिक त्रास देत असून, निवड आदेशपत्र देताना रक्कम उकळल्याची तक्रार करीत उपाशीपोटी आलेल्या विद्यार्थिनींनी सहा तास ठिय्या आंदोलन केले होते. महिनाभरात कोणतीही कारवाई झाली नसल्याचे म्हणत सोमवारी या विद्यार्थिनी आणि पालकांनी पुन्हा आरोग्य उपसंचालक कार्यालय गाठून डॉ. विजय कं देवाड यांच्याशी चर्चा करताना म्हटले. संबंधित प्राचार्यांची आस्थापना ही मुंबईतील आहे. त्यामुळे तेथून कारवाई होईल. यापुढे उपसंचालक कार्यालयात येऊ नये, अन्यथा कारवाई केली जाईल, असे डॉ. कंदेवाड म्हणाले.