निविदा एकाची काम दुसऱ्याला
By Admin | Published: July 15, 2017 12:53 AM2017-07-15T00:53:39+5:302017-07-15T00:54:42+5:30
औरंगाबाद : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत महापालिकेकडे ८० हजार ५०० अर्ज प्राप्त झाले आहेत
मुजीब देवणीकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत महापालिकेकडे ८० हजार ५०० अर्ज प्राप्त झाले आहेत. प्राप्त अर्जांची छाननी करणे, सर्वेक्षण करणे, प्रकल्प आराखडा तयार करण्यासाठी महापालिकेने कंत्राटदार नेमण्याची प्रक्रिया सुरू केली. निविदा प्रक्रियेत ज्या संस्थेने मनपाकडे निविदा दाखल केली त्या संस्थेसोबत आणखी एका संस्थेला काम देण्याचा प्रताप मनपा अधिकाऱ्यांनी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. १२ कोटी ३६ लाख रुपयांच्या या कामासाठी अधिकाऱ्यांनी हा खटाटोप केला आहे.
काँग्रेस आघाडी सरकारने २०१४ मध्ये महापालिकेला रमाई आवास आणि राजीव गांधी आवास योजनेंतर्गत तब्बल ५५ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला होता. या निधीतील फक्त १८ कोटी रुपये महापालिकेने खर्च केले आहेत. उर्वरित रक्कम आजही महापालिकेच्या खात्यात पडून आहे. लाभार्थी घरे बांधून द्या म्हणून मनपा अधिकाऱ्यांकडे उंबरठे झिजवत आहेत. मात्र अधिकाऱ्यांच्या हृदयाला पाझर फुटायला तयार नाही. घरकुल योजनेची पूर्णपणे अधिकाऱ्यांनी ‘वाट’लावलेली असताना केंद्र शासनाने मागील वर्षीपासून पंतप्रधान आवास योजना सुरू केली. औरंगाबाद शहरात योजना राबविण्यासाठी महापालिकेची निवड केली. शहरातील इच्छुक नागरिकांचे अर्ज आठ महिन्यांपूर्वी मागविण्यात आले. या योजनेला उदंड प्रतिसाद मिळाला. ८० हजार ५०० नागरिकांनी मनपाकडे अर्ज केले. अर्जांची छाननी करण्यासाठी मनपाने खाजगी प्रकल्प सल्लागार संस्था नेमण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर निविदा मागविल्या. निविदेत आर्क असोसिएटस्ने निविदा दाखल केली. अधिकाऱ्यांनी ७ एप्रिल रोजी स्थायी समितीला प्रस्ताव सादर केला. समिती सदस्यांना अंधारात ठेवून ऐनवळीत हा विषय टाकून मंजूरही करून घेतला. मंजूर प्रस्तावात १५ हजार रुपये प्रतिघरकुलांप्रमाणे आणि डीपीआर तयार करण्यासाठी एकूण १२ कोटी ३६ लाख रुपये आर्क असोसिएटस् आणि सीमा कन्सल्टंटला द्यावेत, असे प्रस्तावात म्हटले आहे.