तीन प्रमुख महामार्गांची कामे अंतीम टप्प्याकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:10 AM2021-02-20T04:10:12+5:302021-02-20T04:10:12+5:30
विजय सरवदे औरंगाबाद : जिल्ह्यातून जाणारा सोलापूर- धुळे राष्ट्रीय महामार्ग, समृद्धी महामार्ग आणि औरंगाबाद- जळगाव राष्ट्रीय महामार्गांची युद्धपातळीवर सुरु ...
विजय सरवदे
औरंगाबाद : जिल्ह्यातून जाणारा सोलापूर- धुळे राष्ट्रीय महामार्ग, समृद्धी महामार्ग आणि औरंगाबाद- जळगाव राष्ट्रीय महामार्गांची युद्धपातळीवर सुरु असून या तीनही महामार्गांवरुन या वर्षाखेरपर्यंत वाहतूक सुरू करण्याचा संबंधित प्राधिकारणांचा प्रयत्न आहे.
नव्वदच्या दशकात आशिया खंडातील सर्वाधिक झपाट्याने विकसित होणारे शहर म्हणून औरंगाबादची ओळख होती. मात्र, दळणवळणाच्या पायाभूत सुविधांअभावी इथे गुंतवणूक करण्यास बहुराष्ट्रीय तसेच देशातील मोठ्या उद्योग उत्सुक नव्हते. त्यातच आता औरंगाबादेत ‘डीएमआयसी’ सारखी आंतराष्ट्रीय दर्जाची औद्योगिक वसाहत उदयास येत आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन केंद्र व राज्य शासनाने विविध राज्यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांची कामे हाती घेतली.
यामध्ये सोलापूर- धुळे राष्ट्रीय महामार्गाच्या (क्रमांक २११) चौपदरीकरणाचे काम आठ वर्षांपूर्वी हाती घेण्यात आले होते. दीड वर्षापूर्वी पहिल्या टप्प्यात सोलापूर ते येडशीपर्यंत हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यानंतर वर्षभरापासून येडशी ते औरंगाबाद या महामार्गावर वाहतूक सुरु झाली. या महामार्गावरील वाहतूक औरंगाबाद शहराबाहेरुन वळविण्यासाठी नवीन बाह्यवळण (बायपास) रस्त्याचे काम हाती घेण्यात आले. निपाणीपासून सुरु झालेला हा बाह्यवळण रस्ता पुढे सातारा डोंगराच्या अलीकडून वाल्मी, पैठण लिंकरोड (वाळूजकडे जाणारा), करोडी, माळीवाडा, कसाबखेडा मार्गे कन्नड असा गेला आहे. सध्या या रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरु असून १ मेपासून या रस्त्यावरुन वाहतूक सुरु करण्याचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा प्रयत्न आहे. सोलापूर- धुळे हा महामार्ग औरंगाबाद जिल्ह्यातून ८९.५६ किलोमीटर लांबीचा जात आहे.
समृद्धी महामार्ग हा जालना व औरंगाबाद जिल्ह्यातून जात असून जालना जिल्ह्यातून ४२, तर औरंगाबाद जिल्ह्यातून ११२ किलोमीटर लांबीचा हा मार्ग आहे. या रस्त्याचे कामही गतीने सुरू असून नियोजित वेळेत हा टप्पा पूर्ण करण्याचा ‘एमएसआरडीसी’चा प्रयत्न आहे. तथापि, या रस्त्यावरुन नागपूर ते शिर्डी मार्गे औरंगाबाद अशी वाहतूक १ मे रोजी सुरु करण्यात येणार आहे. हा महामार्ग उद्योग, व्यापार, शेती क्षेत्रासाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.
चौकट...
औरंगाबाद- जळगाव महामार्गात भूसंपादनाचे अडथळे
औरंगाबाद- जळगाव मार्गे सिल्लोड राष्ट्रीय महामार्ग (क्र. ७५३ एफ) १४७ किलोमिटर लांबीचा चारपदरी रस्ता असून आतापर्यंत ९० किलोमिटर लांबीचा रस्ता तयार झाला आहे. या चार पदरी काँक्रीट रस्ता व पुलांची कामे ऑक्टोबर २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे; परंतु सध्या काही ठिकाणी खासगी, तर काही ठिकाणी वनविभागाच्या जमीन संपादनात अडथळे येत आहेत. चौका घाटात वनविभागाने जमीन न दिल्यामुळे तिथे चारपदरी रस्ता करणे शक्य झाले नाही. तरिही अडथळ्याची शर्यत पार करत रस्त्याचे काम केले जात आहेत, असे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत औटी यांनी सांगितले.
चौकट.....
(ग्राफिक्ससाठी पॉईंटर)
औरंगाबाद जिल्ह्यातून किती कि.मी. लांबीचे रस्ते जात आहेत
- सोलापूर- धुळे हा महामार्ग ८९.५६ किलोमीटर लांब
- समृद्धी महामार्ग हा महामार्ग ११२ किलोमीटर लांब
- औरंगाबाद- जळगाव हा महामार्ग ११० किलोमिटर लांब
चौकट......
(ग्राफिक्ससाठी पॉईंटर)
वाहतुकीसाठी महामार्गाची निर्धारित तारीख
- सोलापूर- धुळे महार्गावरील नवीन बायपास १ मेपासून
- समृद्धी महामार्ग १ मेपासून
- औरंगाबाद- जळगाव महामार्ग ३१ ऑक्टोबरपासून