प्रेस मशीनवर काम करताना कामगाराची चार बोटे तुटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:04 AM2020-12-22T04:04:36+5:302020-12-22T04:04:36+5:30
वाळूज महानगर : तांत्रिक ज्ञान नसताना एका कामगारास प्रेस मशीनवर काम करण्यास भाग पाडल्याने त्याची चार बोटे तुटल्याची घटना ...
वाळूज महानगर : तांत्रिक ज्ञान नसताना एका कामगारास प्रेस मशीनवर काम करण्यास भाग पाडल्याने त्याची चार बोटे तुटल्याची घटना वाळूज एमआयडीसीतील लक्ष्मी अग्नी या कंपनीत शुक्रवार घडली. याप्रकरणी कंपनीचा ठेकेदार व पर्यवेक्षकाविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोक भगवान डोंगरे (३० रा. लासूर, ता. गंगापूर) हा वाळूज एमआयडीसीतील लक्ष्मी अग्नी या कंपनीत गत दोन महिन्यांपासून ठेकेदारामार्फत काम करतो. शुक्रवारी अशोक डोंगरे हा सकाळी ७ वाजता कंपनीत कामासाठी गेला होता. दरम्यान, काही वेळाने कंपनीतील पर्यवेक्षकाने अशोक डोंगरे यास ऑपरेटर न आल्यामुळे प्रेस मशीनवर काम करण्यास भाग पाडले. कंपनीतील प्रेस मशीनवर काम करताना सकाळी ९.४५ वाजेच्या सुमारास अशोक डोंगरे याचा डाव्या हाताचा पंजा मशीनमध्ये अडकून त्याची चार बोटे तुटली. या अपघातानंतर अशोक डोंगरे यांनी मदतीसाठी आरडाओरड केल्यानंतर कंपनीत इतर कामगार व ठेकेदार बब्बू यांनी अशोक डोंगरे याला जखमी आवस्थेत उपचारासाठी पंढरपुरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले. तांत्रिक ज्ञान नसताना प्रेस मशीनवर काम करण्यास भाग पाडल्याने आपली चार बोटे तुटल्याची तक्रार कामगार अशोक डोंगरे याने एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात दिली आहे. या तक्रारीवरून कंपनीचा ठेकेदार बब्बू व कंपनीच्या पर्यवेक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास उपनिरीक्षक चेतन ओगले करीत आहेत.
--------------------