रेल्वेच्या आशेने कामगार गाठताहेत रेल्वेस्टेशन; परिसरातच राहतात बसून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 05:22 PM2020-05-25T17:22:43+5:302020-05-25T17:28:26+5:30
रेल्वेस्टेशनच्या परिसरात ते आशाळभूत नजरेने पाहत होते, कोणीतरी येईल आणि आमची व्यवस्था करतील, असे त्यांना वाटत होते.
औरंगाबाद : पाठीवर बॅग, हातात अवजड गाठोडे घेऊन अनेक मजूर, कामगारांनी रविवारी रेल्वेस्टेशन गाठले. मात्र, येथून कोणतीही रेल्वे धावणार नसल्याचे कळताच अनेक जण निराश होऊन माघारी परतले, तर काही जण रेल्वेच्या आशेने परिसरातच बसून राहिले.
कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीने अनेक श्रमिक, कामगारांना गावी जाण्यास भाग पाडले. अनेक कामगारांनी गाव गाठण्यासाठी शेकडो कि.मी.चे अंतर पायीच कापले. रेल्वे रुळावरून गावाकडे पायी जाणाऱ्या श्रमिकांचा रेल्वेखाली येऊन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेने देशभरात हळहळ व्यक्त झाली. शासनाने विविध राज्यांतील मजुरांसाठी विशेष श्रमिक रेल्वे सोडल्या. औरंगाबाद रेल्वेस्टेशनवरूनही विविध राज्यांतील श्रमिकांना घेऊन रेल्वे रवाना झाल्या. त्यातून हजारो प्रवासी गावी रवाना झाले; परंतु अद्यापही अनेक कामगार गावी जाण्यासाठी प्रयत्नशील आहेत. रेल्वेने गावी जाता येईल, या आशेने रेल्वेस्टेशन गाठत आहेत.
बिहारला जाण्यासाठी काही कामगार रविवारी रेल्वेस्टेशन पोहोचले; परंतु बिहारची रेल्वे एक दिवसापूर्वीच रवाना झाल्याचे कळताच ते निराश झाले. रेल्वेस्टेशनच्या परिसरात ते आशाळभूत नजरेने पाहत होते, कोणीतरी येईल आणि आमची व्यवस्था करतील, असे त्यांना वाटत होते. यावेळी काहींनी बिहारमध्ये जायचे असून, पुण्यावरून आल्याचे सांगितले. रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, रविवारी रेल्वे नव्हती. आमच्यापर्यंत कोणताही कामगार आला नाही, असे त्यांनी सांगितले.
१ जूनपासून नांदेड- अमृतसर विशेष एक्स्प्रेस
१ जूनपासून नांदेड येथून नांदेड- अमृतसर विशेष एक्स्प्रेस धावेल. तसेच दिनांक ३ जूनपासून अमृतसर येथून अमृतसर-नांदेड सचखंड विशेष एक्स्प्रेस धावेल. या गाडीस २२ बोगी असतील, यात सामान्य म्हणजेच जनरलचे डबे नसतील. या विशेष रेल्वेची वेळ नियमित नांदेड-अमृतसर-नांदेड सचखंड एस्क्प्रेससारखीच असेल.