औरंगाबादेत केजरीवाल यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची उडाली झुंबड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 12:07 AM2018-01-12T00:07:55+5:302018-01-12T00:08:18+5:30
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज भेटणे क ठीण झाले होते. एक तर झेड सुरक्षेचे कारण सांगितले जात होते. पोलिसांचे कडे कमी झाले म्हणून की काय, आम आदमी पार्टीच्या महिलांनी आणखी एक कडे तयार करून रस्ता अडवला. या महिला आम आदमी पार्टी, अशी अक्षरे असलेल्या टोप्या परिधान करून होत्या व त्या दिल्ली- मुंबईहून आलेल्या होत्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज भेटणे क ठीण झाले होते. एक तर झेड सुरक्षेचे कारण सांगितले जात होते. पोलिसांचे कडे कमी झाले म्हणून की काय, आम आदमी पार्टीच्या महिलांनी आणखी एक कडे तयार करून रस्ता अडवला. या महिला आम आदमी पार्टी, अशी अक्षरे असलेल्या टोप्या परिधान करून होत्या व त्या दिल्ली- मुंबईहून आलेल्या होत्या.
रात्री ८.३० वाजता अरविंद केजरीवाल यांचे सुभेदारी गेस्ट हाऊसवर आगमन झाले. तत्पूर्वी, ते दिल्लीहून विमानाने चिकलठाणा विमानतळावर उतरले. आज रात्री सुभेदारी गेस्ट हाऊसवर मुक्काम करून ते उद्या दि.१२ जानेवारी रोजी सकाळीच सिंदखेडराजाकडे रवाना होणार आहेत. तेथे त्यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेला परवानगी देण्यावरूनही कवित्व रंगले होते. अखेर परवानगी मिळाल्यामुळे उद्या ही सभा होत आहे.
या सभेच्या निमित्ताने आम आदमी पार्टीच्या महाराष्टÑाच्या नेत्या प्रीती मेनन यांनी औरंगाबाद, जालना व सिंदखेडराजाचा दौरा केला होता. औरंगाबाद जिल्हा समन्वयक सुग्रीव मुंडे यांनी त्यांच्या सहकाºयांसह परिश्रम घेतले; पण आज केजरीवाल प्रत्यक्षात औरंगाबादला आले असताना कार्यकर्ते आणि सर्वसामान्यांना भेटणे दुरापास्त झाले. महिलांनी कडे करून रस्ता अडवल्यामुळे काही वेळ थांबून जयाजी सूर्यवंशी, गोपीनाथ वाघ यांच्यासारखे भेटायला आलेले कार्यकर्ते परत निघून गेले.
आम्हाला सुभाष झंवर यांनी निरोप पाठवून केजरीवाल यांना भेटा असे सांगितले. त्यामुळे आम्ही कार्यकर्ते घेऊन येथे आलो; पण येथे आल्यानंतर हा तमाशा पाहून नाराज झालो, असे उद्गार प्रा. फुलसिंग जाधव यांनी काढले. दरम्यान, प्राचार्य ग. ह. राठोड, प्रा. मोतीराज राठोड, राजपालसिंह राठोड व इतरांना भेटायला आत सोडून दिले. आम्ही आमच्या बंजारा समाजाच्या मागण्या केजरीवाल यांच्यासमोर मांडल्या, असे प्रा. राठोड यांनी सांगितले. भेट मिळण्यापूर्वी बंजारा समाजाच्या शिष्टमंडळाला ‘जय सेवालाल’ अशा घोषणा द्याव्या लागल्या. नंतर हा कधी ‘भारत माता की जय’, तर ‘वंदे मातरम्’ असा घोषणांचा सिलसिला चालूच राहिला. फार तर शे-शंभर कार्यकर्ते भेटायला आलेले होते. त्यापैकी जालिंदर ढाकणे या कार्यकर्त्याने तर खूपच गोंधळ घातला. ‘मी आम आदमी पार्टीचा जुना कार्यकर्ता आहे. रामलीला मैदनावर मी केजरीवाल यांच्याबरोबर उपोषण केले आहे. मला कोण अडवतंय बघू’, असे ढाकणे बोलू लागले; पण त्यांनाही भेटू दिले गेले नाही. शेवटी रात्री ९.३० वाजेदरम्यान पाच मिनिटांसाठी ते बाहेर आले. काही कार्यकर्त्यांचे बुके स्वीकारले आणि परत गेस्टहाऊसमध्ये गेले.
मानसिंग पवार भेटीला
औरंगाबादचे उद्योजक मानसिंग पवार यांची मात्र केजरीवाल यांच्यासमवेत निवांत भेट झाली. त्यावरून बाहेर तर्कवितर्क लढवले जात होते.