शहरात कामगार तरूणीचा मोबाईल हिसकावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 06:32 PM2018-11-18T18:32:49+5:302018-11-18T18:33:02+5:30
औरंगाबाद : शहरात काही दिवसांपासून मोबाईल चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, तीन जणांनी कामगार तरूणींचा मोबाईल हिसकावून नेल्याची घटना १५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास चिकलठाणा एमआयडीसीत घडली. याप्रकरणी एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. याशिवाय अन्य वेगवेगळ्या ठिकाणाहून चोरट्यांनी तीन मोबाईल चोरून नेले.
औरंगाबाद : शहरात काही दिवसांपासून मोबाईल चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, तीन जणांनी कामगार तरूणींचा मोबाईल हिसकावून नेल्याची घटना १५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास चिकलठाणा एमआयडीसीत घडली. याप्रकरणी एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. याशिवाय अन्य वेगवेगळ्या ठिकाणाहून चोरट्यांनी तीन मोबाईल चोरून नेले.
चिकलठाणा एमआयडीसीतील एका खाजगी कंपनीत कामगार म्हणून काम करणारर २२ वर्षीय तरुणी १५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कामावरून घरी जात होती. चिकलठाणा एमआयडीसीतील मिलीनियम पार्क ते वोखार्ड रिसर्च सेंटर दरम्यान ती पायी असताना मागून दुचाकीवरून (एमएच-२०-डीझेड-२९९६) आलेल्या तीन अनोळखींनी तिच्या हातातील मोबाईल हिसकावून नेला. सुमारे बारा हजार रुपये किंमतीचा हा मोबाईल होता. याप्रकरणी तरूणीने एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलीस हेड काँन्स्टेबल शेख अर्शद तपास करीत आहे.
बेगमपुरा भागातील मोहंमद आमेर अन्सारी ताहेर अन्सारी (२२, रा. महेमुदपुरा, बाबा बिल्डिंग) हे मुलांच्या वसतिगृहात(बॉईज हॉस्टेल) राहतात. त्यांच्या खोलीत प्रवेश करून चोरट्यांनी तीन हजार रुपये किंमतीचा मोबाईल लंपास केला. ही घटना १६ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेअकरा ते बाराच्या सुमारास घडली. याप्रकरणी आमेर यांनी बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.
सिडको एन-२ भागातील विठ्ठलनगर येथील महिलेने घरातील बेडवर मोबाईल चार्जिंग लावून ठेवला होता. शनिवारी सकाळी नऊ ते साडेनऊच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करुन सहा हजार रूपये किंमतीचा मोबाईल चोरून नेला. याप्रकरणी त्यांनी मुकुंदवाडी ठाण्यात तक्रार नोंदविली.
मुकुंदवाडी रेल्वे स्थानक येथे बाहेरगावी जाणाऱ्या आजीला रेल्वेत बसून देण्यासाठी गेलेल्या अनिरुध्द ज्ञानेश्वर धुमाळ (रा. गल्ली क्र. १, भारतनगर, गारखेडा परिसर) यांचा दहा हजारांचा मोबाईल गर्दीत चोरट्यांनी लंपास केला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी लगेच मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलीस नाईक घुनावत तपास करीत आहे.