सांस्कृतिक उन्नतीमध्ये कामगार रंगभूमीचे योगदान अतुलनीय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 11:54 PM2017-12-28T23:54:57+5:302017-12-28T23:55:01+5:30
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे आयोजित कामगार नाट्य महोत्सवाच्या प्राथमिक फेरीला गुरुवारी (दि.२८) सुरुवात झाली. २१ दिवस चालणा-या या महोत्सवाचे ज्येष्ठ रंगकर्मी विजया शिरोळे यांच्या हस्ते ललित कला भवन येथे उद्घाटन करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे आयोजित कामगार नाट्य महोत्सवाच्या प्राथमिक फेरीला गुरुवारी (दि.२८) सुरुवात झाली. २१ दिवस चालणा-या या महोत्सवाचे ज्येष्ठ रंगकर्मी विजया शिरोळे यांच्या हस्ते ललित कला भवन येथे उद्घाटन करण्यात आले आहे. याप्रसंगी अध्यक्षस्थानी अनुराग कल्याणी, तर व्यासपीठावर डॉ. ज्ञानदा कुलकर्णी, प्रा. किशोर शिरसाठ, कैलास टापरे, सहायक कल्याण आयुक्त भालचंद्र जगदाळे उपस्थित होते.
महोत्सवाचे यंदा ६५ वे वर्ष आहे. ‘कामगार रंगभूमीने मराठी नाट्य क्षेत्राला अनेक दिग्गज कलावंत दिले आहेत. त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले आहे. कामगारांच्या कल्याणासाठी व सांस्कृतिक क्षेत्राच्या उन्नतीसाठी कायमच या रंगभूमीने योगदान दिले असून, ते अतुलनीय आहे. गेल्या ६५ वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा अभिमानास्पद आहे, असे प्रतिपादन शिरोळे यांनी केले.
कामगार नाट्य महोत्सवाच्या उद्घाटनाचा बहुमान परळी येथील कामगार कल्याण केंद्राला मिळाला. त्यांचे रानबा गायकवाडलिखित ‘फोटोसेशन’ नाटक पहिल्या दिवशी सादर करण्यात आले. २८ डिसेंबर ते १८ जानेवारीदरम्यान एकूण २१ नाटकांचे प्रयोग या महोत्सवात होणार आहेत. त्यामध्ये अजित दळवी, नवनाथ पवार, प्रेमानंद गज्वी, व्यंकटेश माडगूळकर, सुमित तौर, योगेश सोमण अशा लेखकांचे नाटक रंगमंचावर उभे राहणार आहे.
आज नाटक : पुस्तकाच्या पानातून
महोत्सवामध्ये शुक्रवारी रविशंकर झिंगारेलिखित ‘पुस्तकाच्या पानातून’ हे नाटक सादर होणार आहे. सेलूच्या कामगार कल्याण भवनतर्फे त्याची निर्मिती करण्यात आली आहे. उस्मानपुरा येथील ललित कला भवन येथे सायंकाळी ७ वाजता नाट्यप्रयोगाला सुरुवात होईल.