कामगारांना मिळणार दिवाळी बोनस; व्यापारी म्हणतात, बाजाराची उलाढाल होईल हजार कोटींची
By प्रशांत तेलवाडकर | Published: October 12, 2022 11:57 AM2022-10-12T11:57:33+5:302022-10-12T11:58:45+5:30
सर्वत्र बोनसची चर्चा सुरू झाली. बाजारपेठेतही व्यापारी त्यांच्या कामगारांना बोनस देतात.
- प्रशांत तेलवाडकर
औरंगाबाद : औद्योगिक क्षेत्रातून बोनसच्या रुपाने यंदा किमान १०० कोटी कामगारांच्या हाती पडणार या बातमीने बाजारपेठेत उत्साह संचारला आहे. शहरातील ३० हजार व्यापारीही त्यांच्याकडील दोन लाख कर्मचाऱ्यांना त्यांचा एक महिन्याचे वेतन बोनसच्या स्वरूपात देणार आहेत. बोनसाचा हा एकत्रित आकडाही १०० कोटींपेक्षा अधिक राहण्याची शक्यता असल्याने यंदा बाजारपेठेचीही दिवाळी धुमधडाक्यात होईल, असा अंदाज आहे.
पुढील दोन आठवड्यात बाजारपेठेत १ हजार कोटीची उलाढाल अपेक्षित आहे. दिवाळी दोन आठवड्यांवर येऊन ठेपली आहे. सर्वत्र बोनसची चर्चा सुरू झाली. बाजारपेठेतही व्यापारी त्यांच्या कामगारांना बोनस देतात. अनेक व्यापारी कामगारांना एक किंवा अर्ध्या महिन्याच्या पगाराएवढा बोनस; मिठाई, भेट वस्तू देतात. काही व्यापारी कर्मचाऱ्यांना नवीन कपडे देत असतात. बोनसची सर्व रक्कम आता बाजारपेठेत येणार आहे. यामुळे बाजारपेठ ग्राहकराजाच्या स्वागतासाठी सजली आहे. कालचा रविवार अनेकांनी ‘खरेदी के नाम’ केला. बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी होती. सायंकाळी गर्दीत आणखी भर पडली. सर्वाधिक गर्दी कपड्यांच्या शोरुममध्ये होती. लहान मुलांचे, तरुणींचे ड्रेस व महिलांच्या साड्या खरेदीला प्राधान्य देण्यात आल्याचे बघण्यास मिळाले. कापड बाजार, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स बाजार, वाहन बाजार, बांधकाम क्षेत्र व सराफा बाजारात मोठी उलाढाल होणार आहे.
औद्योगिकपेक्षा व्यापार क्षेत्रात जास्त बोनस वाटप
औद्योगिक क्षेत्र संघटित आहे. त्यामुळे त्यांची १०० कोटी बोनस वाटप केले ही आकडेवारी लगेच दिसून येते. मात्र व्यापार क्षेत्र विखुरलेले आहे. ३० हजार व्यापारी शहरात असून, दोन लाख कामगार काम करीत आहेत. कामगारांना १८० कोटींचे बोनस यंदा वाटप होण्याची शक्यता आहे. व्यापार क्षेत्रच जास्त नोकरी देते हे यावरून सिद्ध होते.
- प्रफुल्ल मालाणी, माजी अध्यक्ष, मराठवाडा चेंबर.
दिवाळीपर्यंत हजार कोटीची उलाढाल
सर्व बाजारपेठेचे लक्ष बोनसच्या बातमीकडे लागले होते. आता कामगारांना बोनस मिळत असल्याने पुढील दोन आठवडे बाजारात खरेदीची धूम राहणार आहे. या दोन आठवड्यात सुमारे १ हजार कोटीची उलाढाल शहरात होईल.
-संजय कांकरिया, अध्यक्ष, जिल्हा व्यापारी महासंघ.