कार्यारंभ आदेशाअभावी रखडली रोजगार हमी योजनेची कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 06:49 PM2019-03-04T18:49:11+5:302019-03-04T18:51:19+5:30
कामाच्या शोधार्थ मजुरांनी शहराकडे धाव घेतली आहे़
गंगाखेड (परभणी ) : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेंतर्गत ग्रामीण वर्षात चालू वर्षात प्रस्तावित केलेल्या ३ हजार ५३३ कामांपैकी मंजूर करण्यात आलेल्या ३ हजार १३३ या मंजूर कामांना अद्यापही कार्यारंभ आदेश मिळाला नाही़ त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून अपूर्ण असलेल्या कामांवर बोटावर मोजण्या एवढेच मजूर कार्यरत असल्याने कामाच्या शोधार्थ मजुरांनी शहराकडे धाव घेतली आहे़
गंगाखेड तालुक्यात शेतकऱ्यांनी व ग्रामीण भागातील नागरिकांनी रोहयो अंतर्गत वैयक्तीक व ग्रामपंचायत कार्यालयाच्या माध्यमातून प्रधानमंत्री घरकूल योजना, सिंचन विहीर, विहीर पुनर्भरण, निर्मल शोष खड्डे, शौचालय, तुती लागवड, शेततळे, ढाळीचे बांध, फळबाग, व्हर्मीकम्पोस्ट, नाडेप कम्पोस्ट आदी कामांचे प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयाकडे प्रस्तावित केले होते़ यामध्ये २०१६ पासून ते मार्च २०१९ पर्यंत सिंचन विहिरीचे ४७३, विहीर पुनर्भरणाचे १४६, निर्मल शोष खड्डे २४८, पंतप्रधान घरकूल योजनेचे १ हजार ५५, शौचालय ९८, जिल्हा रेशीम विभागाच्या तुती लागवडचे १२०, ढाळीचे बांध २४, फळबाग ८६, व्हर्मी कम्पोस्ट ५७०, नाडेप कम्पोस्ट ७१३ आदी कामांचा समावेश होता़ यात ग्रामपंचायत कार्यालयांतर्गत मोजक्याच कामांना मंजुरी देण्यात आली होती़ वरील यंत्रणांमार्फत चालणाऱ्या रोजगार हमीच्या कामांना पंचायत समिती कार्यालयातून अद्यापही कार्यारंभ आदेश दिले गेले नसल्याने मंजूर झालेली कामे कागदोपत्रीच आहेत़ रोजगार हमी योजनेंर्गत मंजूर झालेल्या विविध भागांच्या ३ हजार १३३ कामांना तात्काळ कार्यारंभ आदेश देऊन मंजुरांच्या हाताला काम उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी मजूर वर्गातून होत आहे़