World Blood Donor Day : औरंगाबादमध्ये निगेटिव्ह रक्तगटाचे दाते जपतोय ‘इंडियन कॅडेट फोर्स’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 01:48 PM2018-06-14T13:48:26+5:302018-06-14T14:00:52+5:30
निगेटिव्ह रक्तगटाचे रक्त मिळविणे, हे रुग्णांच्या नातेवाईकांना मोठे आव्हान ठरते. ही बाब ओळखून इंडियन कॅ डेट फोर्सने निगेटिव्ह रक्तगटाच्या व्यक्तींना एकत्र आणले आहे.
औरंगाबाद : निगेटिव्ह रक्तगटाचे रक्त मिळविणे, हे रुग्णांच्या नातेवाईकांना मोठे आव्हान ठरते. ही बाब ओळखून इंडियन कॅ डेट फोर्सने निगेटिव्ह रक्तगटाच्या व्यक्तींना एकत्र आणले आहे. जेव्हा अशा रक्ताची आवश्यकता असते, तेव्हा दात्याला बोलावून रक्त उपलब्ध करून देण्याचे त्यांचे कार्य अविरतपणे सुरू आहे.
इंडियन कॅडेट फोर्सचे कमांडर विनोद नरवडे म्हणाले, १९९१ पासून रक्तदानाचा हा प्रवास सातत्याने सुरू आहे. शिबिरांचे आयोजन करून प्राधान्याने घाटीतील रक्ताचा तुटवडा दूर करण्याचा प्रयत्न केला जातो. घाटीत गोरगरीब रुग्ण येतात. त्यामुळे या रुग्णालयाला जास्तीत जास्त रक्त देण्याची आमची भावना आहे. इंडियन कॅडेट फोर्सचे आज जवळपास ३,५०० सदस्य झाले आहेत. यामध्ये नागरिकांबरोबर विविध महाविद्यालयांतील एनसीसी कॅडेटचा समावेश आहे.
रक्तदान शिबिरांत जर एखादा निगेटिव्ह रक्तगटाचा दाता आला, तर त्याचे रक्त घेतले जात नाही. कारण जेव्हा त्या गटाच्या रक्ताची आवश्यकता असते, तेव्हा ते उपलब्ध व्हावे, हा प्रयत्न असतो, त्यामुळे अशा निगेटिव्ह रक्तगटाच्या व्यक्तींची यादी आम्ही तयार केली आहे. जेव्हा आम्हाला अशा रक्ताची आवश्यकता असल्याचे कळते, तेव्हा दात्याला तात्काळ पाठवून गरजू रुग्णाला रक्त दिले जाते. वर्षभरात किमान ५०० रक्ताच्या पिशव्या घाटीतील रक्तपेढीला दिल्या जातात.डॉ. डी. के. कांबळे, अमृत बि-हाडे, प्रभूलाल पटेल, बबलू त्रिवेदी, गौरव भारुका, विशाल देशपांडे, अजय भोसले, जगदीश खैरनार, आनंद आंचलकर, भागूराव जाधव, किशोर नावकर, राहुल अहिरे अशा अनेकांचे रक्तदानाच्या कार्यात योगदान मिळत आहे.
‘घाटी’लाच रक्तदान करावे
घाटी रुग्णालयातून गोरगरीब रुग्णांना मोफत रक्त दिले जाते. त्यामुळे अधिकाधिक लोकांनी घाटीत रक्तदान करण्याची खरी गरज आहे. आज आमच्याकडे निगेटिव्ह रक्तगट असलेल्या १८० व्यक्तींची यादी आहे, त्याचा अनेकांना आधार मिळतो, असे कमांडर विनोद नरवडे म्हणाले.