world book day : ‘ई-बुक’ पारंपरिक पुस्तकांचे आधुनिक रूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 07:51 PM2019-04-23T19:51:06+5:302019-04-23T19:52:26+5:30
आजच्या तरुणाईला आणि ‘टेक्नोसॅव्ही’ मंडळींना खुणावत आहे
- रुचिका पालोदकर
औरंगाबाद : काळानुसार सगळ्याच गोष्टी बदलत चालल्या आहेत. आधुनिक जीवनशैलीचा हात धरून पारंपरिक गोष्टीत बदल होऊन तिचे नवीन रूप समोर येते, तसेच काहीसे पुस्तकांच्या बाबतीतही झाले आहे. ‘ई- बुक’ हे पुस्तकांचे आधुनिक रूप आजच्या तरुणाईला आणि ‘टेक्नोसॅव्ही’ मंडळींना खुणावत असून, यामुळे आॅनलाईन पद्धतीने वाचन संस्कृती बहरत असल्याचे दिसून येते. २३ एप्रिल हा जगप्रसिद्ध साहित्यिक आणि थोर नाटककार शेक्सपिअर यांचा स्मृतिदिन जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
यानिमित्त वाचन संस्कृतीचा आढावा घेतला असता आजकाल आॅनलाईन पद्धतीने पुस्तके वाचणे आजच्या तरुणांना अधिक भावत असून, याचा सकारात्मकच परिणाम होत आहे, असे या क्षेत्रातील मंडळींनी सांगितले. वाचन संस्कृती कमी होत आहे, अशी कायम ओरड होते, मात्र असे प्रत्यक्षात होत नसून फक्त वाचनाची पद्धत, माध्यमे आणि जागा बदलत आहेत. पुस्तकांच्या जागी ई-बुक आणि वाचनालयाच्या जागी बुक कॅफे, आॅडिओ बुक आले आहेत, असे काही तरुणांनी आणि साहित्य क्षेत्रातील मंडळींनी सांगितले. वास्तववादी, आत्मचरित्र, जीवनकथा, अशा प्रेरणादायी पुस्तकांची मागणी सध्या वाढत आहे, पण त्याचबरोबर शिवाजी सावंत, आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे, व. पु. काळे, भालचंद्र नेमाडे आदी लेखकांची पुस्तकेही मोठ्या प्रमाणावर वाचली जात आहेत.
कमी किंमत आणि हवे तिथे उपलब्ध
अनेकदा पुस्तकांच्या किमती सर्वसामान्यांना परवडतील अशा नसतात. ‘ई-बुक्स’ने नेमकी याच मुख्य अडचणीवर मात केल्यामुळे तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळविली आहे. अत्यल्प किमतीत ‘ई- बुक्स’ डाऊनलोड करून वाचता येतात. याशिवाय पुस्तकाचे कोणतेही ओझे सोबत न बाळगता आपला मोबाईल किंवा लॅपटॉप सुरू केला की हवे तिथे हवे ते पुस्तक वाचता येते. हा ‘ई- बुक्स’चा सगळ्यात मोठा फायदा आहे.
परदेशातील वाचकांसाठी वरदान
‘ई- बुक’ वाचन संस्कृतीला पोषकच आहेत. नारायण धारप, पु. ल. देशपांडे, गदिमा यांच्या पुस्तकांना तसेच काल्पनिक कथांवर आधारित ई- बुक्सला वाचकांकडून चांगलीच मागणी आहे. काळाच्या या पाऊलखुणा ओळखून त्या पद्धतीने बदल करणे गरजेचे आहे. परदेशातील अनेक वाचकांसाठी ई- बुक्स वरदान ठरत आहे. कारण पूर्वी पुस्तकाची प्रत त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना अनेक दिवस वाट पाहावी लागत होती. पण आता मात्र कोणतेही पुस्तक आॅनलाईन पद्धतीने कायम त्यांच्याजवळ उपलब्ध असते. त्यामुळे वाचन संस्कृतीवर ‘ई-बुक्स’चा झाला तर सकारात्मकच परिणाम होत आहे.
- साकेत भांड