world book day : विद्यापीठात आहे अजिंठ्याची कलाकृती जगभरात नेणारा ग्रंथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 07:43 PM2019-04-23T19:43:31+5:302019-04-23T19:46:49+5:30
द पेंटिंग इन द बुद्धिस्ट केव्ह- टेम्पल ऑफ अजंता हे पुस्तक विद्यापीठातील ग्रंथालयाचा समृद्ध वारसा आहे
- राम शिनगारे
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे ग्रंथालय म्हणजे दुर्मिळ ग्रंथांचा खजिनाच. या ग्रंथालयात १० व्या शतकापासून ते आजपर्यंतची दुर्मिळ, महत्त्वाची ३ लाख ७० हजार ग्रंथ उपलब्ध आहेत. ब्रिटिश चित्रकार जॉन ग्रिफिथ यांनी अजिंठा या जगप्रसिद्ध कलाकृतीची पेंटिंग, डिझाईन ‘द पेंटिंग इन द बुद्धिस्ट केव्ह-टेम्पल आॅफ अजंता’ या ग्रंथात चितारली आहे. हा ग्रंथ दोन खंडात १८९६ आणि ९७ साली ब्रिटनमध्ये प्रकाशित करण्यात आला. जगात मूळ प्रत उपलब्ध असलेल्या एकूण ३ ग्रंथांतील एक प्रत विद्यापीठातील ग्रंथ संग्रहात उपलब्ध आहे.
विद्यापीठाच्या स्थापनेनंतर अवघ्या दोन वर्षांनंतर तत्कालीन हैदराबाद राज्याचे उद्योगमंत्री राजे शामराज राजरायन बहादूर यांनी स्वत:च्या ग्रंथालयातील अतिदुर्मिळ ४५ हजार ग्रंथ या ग्रंथालयाला भेट दिले. यातील बहुतांश ग्रंथ हे जागतिक दर्जाचे आहेत. या गं्रथांमध्ये ब्रिटिश कलाकार जॉन ग्रिफिथ यांच्या ‘द पेंटिंग इन द बुद्धिस्ट केव्ह-टेम्पल आॅफ अजंता’ ग्रंथाचा समावेश आहे. दोन खंडात असलेला हा ग्रंथ ड्रॉइंग शीटच्या आकाराचा आहे.
एका हातात बसणार नाही, असा हा ऐतिहासिक दस्तऐवज आहे.
या ग्रंथात ग्रिफिथ यांनी अजिंठा येथील प्रत्येक लेण्यात असलेल्या पेंटिंग रेखाटल्या आहेत. ज्या पेंटिंग सद्य:स्थितीत अजिंठा येथे अस्तित्वात राहिल्या नाहीत, त्या पेंटिंगचा या ग्रंथात समावेश आहे. तसेच या ग्रंथात प्रत्येक लेणीचा आराखडा, पाणीपुरवठ्याचा नकाशा, लेणीच्या विविध आकाराचे नकाशेही रेखाटण्यात आले आहेत. हा ग्रंथ ब्रिटनमध्ये १८९६-९७ साली प्रकाशित झाला. या प्रकाशनाच्या मूळ ग्रंथापैकी जगात तीनच प्रती अस्तित्वात असल्याची माहिती ग्रंथपाल डॉ.धर्मराज वीर यांनी दिली. यातील एक प्रत विद्यापीठाकडे आहे. या प्रतीचे संगणकीकरण करून ठेवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. हा ग्रंथ विद्यापीठ ग्रंथालयाचे ‘अॅसेट’ असल्याचे डॉ. वीर यांनी स्पष्ट केले.
दुर्मिळ पुस्तकांचा खजिना
विद्यापीठाच्या ग्रंथालयात राजे शामराज राजरायन बहादूर यांनी भेट दिलेले ४५ हजार ग्रंथ आहेत. यात १६०० ते १८५० या कालखंडातील ३४१४ अतिदुर्मिळ ग्रंथ आहेत. या ग्रंथांच्या ७ लाख ५३६ पानांचे संगणकीकरण करून स्कॅन करण्यात आले आहे. या दुर्मिळ ग्रंथांमध्ये भारतीय राज्यघटना लिहिणाऱ्या व्यक्तींसह घटना समिती सदस्यांच्या स्वाक्षरी असलेली मूळ प्रत आहे. याशिवाय प्रिन्सेस अॅण्ड चीफस् आॅफ इंडिया, गिल्मसेस आॅफ निजाम डोमिनियन्स, रूबयत उमर खय्याम अशा शेकडो ग्रंथांचा समावेश असल्याचे सहायक ग्रंथपाल सतीश पदमे यांनी सांगितले.
ऐतिहासिक पोथींच्या दस्तऐवजांचे स्कॅनिंग
विद्यापीठाच्या ग्रंथालयात ३५०० पेक्षा अधिक ऐतिहासिक पोथ्या उपलब्ध आहेत. या पोथ्यांचे डिजिटलायझेशन करण्यासाठी स्कॅनिंगची प्रक्रिया मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर या ग्रंथांचे अस्तित्व कायम राहणार असल्याचे डॉ. धर्मराज वीर यांनी स्पष्ट केले.
विद्यापीठाच्या ग्रंथालयात राजे शामराज राजरायन बहादूर यांनी भेट दिलेल्या ग्रंथांशिवाय तब्बल ३ लाख ७० हजार ग्रंथ उपलब्ध आहेत. ई-बुक्सची संख्याही ३० लाखांपेक्षा अधिक आहे. यातील बहुतांश ग्रंथांचे डिजिटलायझेशन झाल्यामुळे ग्रंथ नष्ट होण्याचा धोका पूर्णपणे संपला आहे.
-डॉ. धर्मराज वीर, ग्रंथपाल, विद्यापीठ