वादळाच्या तडाख्याने संसार उघड्यावर

By Admin | Published: June 11, 2014 12:22 AM2014-06-11T00:22:14+5:302014-06-11T00:26:15+5:30

दिनेश गुळवे , बीड सोमवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने गेवराई, बीड तालुक्यातील काही गावांना जोरदार तडाखा दिला.

The world is in the crackdown of the storm | वादळाच्या तडाख्याने संसार उघड्यावर

वादळाच्या तडाख्याने संसार उघड्यावर

googlenewsNext

दिनेश गुळवे , बीड
सोमवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने गेवराई, बीड तालुक्यातील काही गावांना जोरदार तडाखा दिला. वादळामध्ये अनेकांची पक्की घरे पडली, दोनशे गंजी उडाल्या, चारशेवर झाडे उन्मळून पडली, तर कित्येकांच्या घरावरील, शेडवरील पत्रे उडाले. या नैसर्गिक आपत्तीने एकच हाहाकार उडाला. यात अनेकांना जखमा झाल्या, तर केतुरा परिसरात एक बैलही ठार झाला आहे.
सोमवारी दुपारपर्यंत तीव्र ऊन पडले होते. सायंकाळी ६ च्या सुमारास आभाळ आले. यावेळी वादळीवाऱ्यासह पाऊस झाला. कधी नव्हे तो असे वादळ गेवराई तालुक्यातील शिरसमार्ग, तरटेवाडी, दिमाखवाडी, बाबर वस्ती तर बीड तालुक्यातील केतुरा, बहाद्दरपूर, पारगाव, सोनगाव या परिसरात आले. या वादळात शेतात असलेल्या मजुरांची एकच तारांबळ उडाली. अनेकांना पावसाने झोडपून काढले.
शिरसमार्ग येथील आसाराम रडे, उत्तम रडे व दत्ता रडे यांनी शेतात कोंबड्या पाळल्या होत्या. वादळ व पावसाने तब्बल दीडशे कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या. तसेच यावेळी पंडित रडे व उत्तम रडे यांचे पत्र्याचे शेड पडले. यामुळे नुकसान तर झालेच शिवाय गणेश रडे व उत्तम रडे यांना गंभीर मार लागला. तसेच येथील आसाराम रडे, दत्ता रडे व गणेश रडे यांच्या मोसंबी बागाचेही नुकसान झाले. येथून जवळच बाबर वस्ती आहे. येथील कल्याण बाबर, रामदास बाबर व रामनाथ बाबर यांचे पक्के घर पडले. घरावरील पत्रे उडाल्याने त्यांचे संसार उघड्यावर आले, शिवाय संसारोपयोगी वस्तूंवर घरावरील दगड पडल्याने त्याही फुटल्या गेल्या. या परिसरातील दिमाखवाडी येथेलही अनेक शेतकऱ्यांच्या कडब्याच्या गंजी उडाल्या आहेत. तर, आंब्याचे झाडांचेही मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. बीड तालुक्यातील पारगाव येथेही शेतकऱ्यांची वादळी वाऱ्याने व पावसाने मोठी वाताहत झाली आहे.
गेवराई तालुक्यातील तरटेवाडी येथेही अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. येथील विठ्ठल कारंडे व नारायण कारंडे यांचे पक्के घर पडले आहे. वाऱ्यामुळे घरावरील पत्रे उडाले, शिवाय घराच्या वरांड्याही पडल्या आहेत. यामुळे घरातील धान्यही भिजले आहे. येथील अनेक झाडे पडली आहेत. काही झाडे विद्युत तारांवर पडल्याने येथील वीजपुरवठा रात्रीपासून खंडित आहे. येथील भागुबाई मार्कड यांचेही शेड पडले तर लक्ष्मण सजगणे, हरी काळे, मधुकर गवते, यांचेही मोठे नुकसान झाले आहे.
सायंकाळी आलेल्या वादळी वाऱ्याने अनेकांच्या घराची पडझड झाली. कित्येक जखमी झाले. यामुळे परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण होते. या परिसरातील जवळपास दोनशे शेतकऱ्यांच्या कडब्याच्या गंजी उडाल्या आहेत, आंबा, चिंच, लिंब, बाभूळ अशी चारशेपेक्षा अधिक झाडे पडली आहेत, दहापेक्षा अधिक शेतकरी जखमी आहेत. तर पक्के घर, पत्र्याचे शेड व जनावरांचे गोठेही मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त झाले आहेत.
बीड तालुक्यातील केतुरा, अवलपूर, पारगाव, सोनगाव येथेही मोठे नुकसान झाले आहे. केतुरा येथील भागवत कुडके यांचा बैल पावसात झोडपल्याने दगावला आहे. तर, पत्र्याचे शेड अंगावर पडल्याने उमाकांत जगताप, ऋषिकेश जगताप हे जखमी झाले आहेत. या परिसरात अनेक शेतकऱ्यांचे बांध फुटले आहेत, झाडे उन्मळून पडली, गंज्या उडाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या परिसरात सोमवारी सायंकाळी बंद झालेला वीजपुरवठा मंगळवारीही बंद होता.
नुकसानीचे पंचनामे करू
शिरसमार्ग, तरटेवाडी, दिमाखवाडी, बाबर वस्ती या परिसरात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्यासाठी तलाठ्यांना सूचना दिल्या आहेत. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी
शिरसमार्गसह परिसरात सोमवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत. अशा शेतकऱ्यांना शासनाने तात्काळ मदत करण्याची मागणी रायगड संघटनेचे रामेश्वर लंबे, प्रा. आसाराम पवळ, रोहित लंबे, नारायण ढगे, द्वारकादास पाबळे, पांडुरंग कारंडे, माऊली पंडित, सोमेश्वर लंबे, महादेव कारंडे, पप्पू पवळ, सुनील धस आदींनी केली आहे.
बैलगाडीसह संसारोपयोगी वस्तू उडाल्या
शिरसमार्ग येथील शेतकरी मनोज रडे यांची बैलगाडी शेतामध्ये उभी होती. सोमवारी सायंकाळी जोरदार वादळी वारे आल्याने ही बैलगाडी तब्बल शंभर फूट दूर फरफटत गेली. तसेच, यावेळी घरावरील पत्रे, कपडे, पाण्याच्या प्लास्टिकच्या टाक्या यासह विविध वस्तू वाऱ्याने उडून दूर गेल्या.
प्रशासनाने घेतली दखल
शिरसमार्ग, तरटेवाडी, दिमाखवाडी व बाबर वस्ती येथील झालेल्या नुकसानीची माहिती प्रशासनाला मिळताच दखल घेतली. शेतकऱ्यांसह ग्रामस्थांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करून अहवाल पाठविण्यासाठी तलाठी तांबे यांना सूचना दिल्या. यानंतर लगेच त्यांनी पाहणी केली.
अंगावर पत्रे पडल्याने वृद्धेचा तुटला हात
सोमवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने शिरूरकासार तालुक्यातील हिवरसिंगा येथील गंगुबाई भानुदास सानप यांचे घरही पडले. घरावरील काही पत्रे वाऱ्याने उडाले तर काही पत्रे घरातच पडले. यावेळी घरामध्ये गंगुबाई सानप (वय-७०) या बसल्या होत्या. त्यांच्या उजव्या हातावर घरावरील पत्रा पडल्याने त्यांचा हात कोपरापासून वेगळा झाला. यानंतर त्यांना उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल केले.
आपद्ग्रस्तांना मदत करू
बीड व गेवराई तालुक्यातील अनेक गावांतील ग्रामस्थ, शेतकऱ्यांचे वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्यात येतील. जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.

Web Title: The world is in the crackdown of the storm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.