जागतिक वसुंधरा दिन : मराठवाडा बोडखा तो बोडखाच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 06:31 PM2019-04-22T18:31:20+5:302019-04-22T18:32:50+5:30
वृक्षारोपणाची कोटीच्या कोटी उड्डाणे
- गजानन दिवाण
औरंगाबाद : राज्यात २०१८ या वर्षात १३ कोटी वृक्ष लागवडीचे टार्गेट असताना जवळपास १६ कोटी झाडे लावण्यात आली. यात सर्वाधिक जवळपास साडेपाच कोटी झाडे एकट्या मराठवाड्याने लावली. यातील जवळपास ७० टक्के झाडे जगल्याचा दावा वन विभागाकडून केला जात आहे. मराठवाड्यात सध्याच्या स्थितीत केवळ चार टक्केच वनक्षेत्र आहे. त्यामुळे दुष्काळवाड्याचे हे बोडखे चित्र बदलण्यासाठी मोठी कामगिरी करण्याची गरज वनप्रेमींमधून व्यक्त केली जात आहे.
मराठवाड्याला २ कोटी ९९ लाख ९३ हजार ११९ झाडे लावण्याचे टार्गेट असताना ५ कोटी ५६ लाख ९९ हजार २८७ झाडे लावून मोठी कामगिरी करण्यात आली. यात सर्वाधिक १ कोटी झाडे औरंगाबाद जिल्ह्यात लावण्यात आली. सर्वात कमी ३५ लाख झाडे परभणी जिल्ह्यात लावण्यात आली. लावलेली ही झाडे जगविणार कशी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. झाडे लावण्यापूर्वीची मशागत आणि नंतरच्या पाच वर्षांचे नियोजन करावे लागते. याची अंमलबजावणी करतानाच दरवर्षी ३१ आॅक्टोबर आणि ३१ मे रोजी या झाडांची गणना करावी लागते. ३१ आॅक्टोबर रोजी अशी गणना करण्यात आली असून, जवळपास ७० टक्के झाडे जगली असल्याचा दावा मुख्य वनसंरक्षक प्रकाश महाजन यांनी केला. मात्र, मराठवाड्यात असलेली दुष्काळ स्थिती आणि पाण्याची टंचाई पाहता हा दावा खोटा असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमी डॉ. किशोर पाठक यांनी केला. मराठवाड्यात पाच कोटी झाडे लावली जात असल्याचा दावाच खोटा असून, पाच लाख खड्डे दाखविले तरी मिळविले, असा आरोप पाठक यांनी केला.
मंत्र्यांच्या आग्रहामुळे झाडे लावली जातात खरी. मात्र ती जगविण्यासाठी आवश्यक असलेले पाच वर्षांचे नियोजन अजिबात केले जात नसल्याची माहिती एका निवृत्त वन अधिकाºयाने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर दिली. निधी, मनुष्यबळ, वेळ आणि कामांचा लोड, अशा अनेक गोष्टी कारणीभूत असतात. अधिकाºयांना हे उघडपणे बोलताही येत नसल्याचे या अधिकाºयाने स्पष्ट केले. त्यामुळे कोटीच्या कोटी झाडे लावली जात असली तरी लाखभरच झाडे लावावीत आणि ती जगवावीत, अशी अपेक्षा वनप्रेमींमधून व्यक्त
होत आहे.
वनविभाग, सामाजिक वनीकरण विभागासह सर्वच विभागांनी वृक्ष लागवडीत चांगली कामगिरी केली. सर्वांनीच टार्गेटपेक्षा अधिक झाडे लावली. यातील जवळपास ७० टक्के झाडे जगविण्यात यश आले.
- प्रकाश महाजन, मुख्य वनसंरक्षक
धुळे-सोलापूर महामार्गासाठी ३७ हजार झाडे तोडली. त्या बदल्यात एकही झाड लावले गेले नाही. १३ कोटी झाडे लावल्याची घोषणा म्हणजे निव्वळ धुळफेक आहे. जंगल वाचविण्याचे काम राहिले दूरच. वनखात्यातील सर्वच कर्मचारी या वृक्ष लागवडीच्या मागे लावण्यात आली आहेत. १३ लाख झाडे लावायला हवी आणि ती जगवायला हवी. शिवाय विकासाच्या नावाखाली झाडे तोडणे थांबायला हवे.
- डॉ. किशोर पाठक
२०१८ : कोणत्या जिल्ह्याने किती झाडे लावली?
(आकडेवारी लाखांत)
जिल्हा टार्गेट प्रत्यक्ष लावली
औरंगाबाद ४४.४५ ९७.९७
बीड ३०.४८ ५९.५६
हिंगोली ३०.४८ ५९.६६
जालना ३६.२२ ७७.१७
लातूर ३३.०२ ६०.२३
नांदेड ६०.२१ ८७.८४
उस्मानाबाद २८.१९ ५८.२९
परभणी ३४.१६ ३५.४
एकूण २९९.९४ ५५६.९९
वनक्षेत्र कुठे किती (चौ. कि.मी.मध्ये)
जिल्हा एकुण क्षेत्र वनक्षेत्र
औरंगाबाद १०,१०७ ९००
बीड १०,६९३ २४०
हिंगोली ४६८६ २७५
जालना ७७१८ ९९
लातूर ७१५७ ४०
नांदेड १०५२८ १२८१
उस्मानाबाद ७५६९ ६१
परभणी ६३५५ ९९