जागतिक अन्न सुरक्षा दिन : शहरात अन्नपदार्थ सुरक्षित; अन्न व औषधी प्रशासनाचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 12:08 PM2019-06-07T12:08:53+5:302019-06-07T12:14:54+5:30

दोन ते तीन वर्षांतून एकदा निकृष्ट दुधावर कारवाई होते व नंतर काहीच नाही, असा प्रश्नही ग्राहकांमधून विचारला जात आहे. 

World Food Security Day: Foods in the Aurangabad city are safe; Food and Drug Administration Claims | जागतिक अन्न सुरक्षा दिन : शहरात अन्नपदार्थ सुरक्षित; अन्न व औषधी प्रशासनाचा दावा

जागतिक अन्न सुरक्षा दिन : शहरात अन्नपदार्थ सुरक्षित; अन्न व औषधी प्रशासनाचा दावा

googlenewsNext
ठळक मुद्देवर्षभरात घेतलेल्या १६३ नमुन्यांपैकी १२४ नमुने प्रमाणित

औरंगाबाद : मागील वर्षभरात विविध हॉटेल्स, रेस्टॉरंट, मिठाई दुकानांमध्ये तपासणी करून अन्नपदार्थांचे १६३ नमुने घेतले. त्यातील १२३ नमुने प्रमाणित निघाले आहेत. शहरात तयार करण्यात येत असलेले अन्नपदार्थ सुरक्षित असल्याचा दावा, अन्न व औषध प्रशासनाने केला आहे. 

पहिला जागतिक अन्न सुरक्षा दिन शुक्रवारी (दि.७) साजरा करण्यात येणार आहे. सर्वांना सुरक्षित व सकस अन्न मिळावे, ज्यामुळे सार्वजनिक आरोग्याचा दर्जा उंचावला जाऊन देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लागेल हा उद्देश समोर ठेवून अन्न सुरक्षा दिन साजरा केला जात आहे.‘अन्न सुरक्षा, प्रत्येकाचे कर्तव्य’ ही संकल्पना संयुक्त राष्ट्र संघटनेने मांडली आहे. औरंगाबादमध्ये हजारो हॉटेल्स, रेस्टॉरंट, मिठाईची दुकाने आहेत. याशिवाय हातगाडी, चहाच्या टपऱ्यांची संख्या १८,५९८ एवढी नोंदविण्यात आली आहे. पाणीपुरीवाला असो वा वडापाव, गरम पोहे विक्री करणारे सर्वांना अन्नपदार्थ विक्रीचा परवाना काढणे आवश्यक आहे. या सर्वांनी तयार केलेल्या अन्नपदार्थांच्या दर्जावर लक्ष ठेवण्यासाठी अन्न प्रशासनाकडे आजमितीला ७ अन्न निरीक्षक आहेत.

सहायक आयुक्त (अन्न) मि. दा. शाह यांनी सांगितले की, मागील वर्षभरात जिल्ह्यातील ८० हॉटेल्स व रेस्टॉरंटची तपासणी केली. याशिवाय अन्नपदार्थांचे १६३ नमुने घेण्यात आले. तपासणीसाठी ते प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. यातील १२३ नमुने प्रमाणित (चांगले) निघाले. ४ नमुने असुरक्षित होते. तर १८ नमुने कमी दर्जाचे होते. अन्नपदार्थांच्या वेष्टनावर दिलेली माहिती व आत वेगळेच अन्नघटक असलेले ५ नमुने आढळून आले. तर १६ नमुन्यांचा अहवाल प्रयोगशाळेतून येणे बाकी आहे. काही हॉटेल्समध्ये साफसफाई व्यवस्थित नव्हती, असुरक्षित ठिकाणी अन्नपदार्थ ठेवले होते. दर्शनी भागात परवाने लावण्यात आले नव्हते, असे आढळून आले. अशा हॉटेल व्यावसायिकांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्रुटीत सुधारणा करण्यास सांगण्यात आले असल्याचे त्यांनी नमूद केले. याशिवाय हॉटेलमध्ये काम करणारे, अन्नपदार्थ तयार करणाऱ्यांनी स्वच्छ कपडे घालावे, बोटाची वाढलेली नखे वेळोवेळी काढावीत, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. तेलाच्या दुकानातील ५ खाद्यतेलाचे नमुने घेण्यात आले. त्यातील ३ नमुने प्रमाणित निघाले तर २ नमुन्याचा अहवाल अजून प्राप्त झाला नाही. 

याशिवाय दुष्काळग्रस्त भागातून आलेल्या नागरिकांनी शहरात ठिकठिकाणी रसवंतीगृह उभारली आहेत. त्यातील १८ रसवंतीगृहांतील पाणी व बर्फाची तपासणी केली असून, दोष आढळले नसल्याचेही त्यांनी सांगितले. हातगाड्यांवर देण्यात येणारे अन्नपदार्थ ताजे असतात, ग्राहकांसमोरच भजे, पोहे बनवून दिले जातात. फक्त जास्त वेळा तापविलेल्या तेलात भजी तळू नये, असा सल्लाही विक्रेत्यांना देण्यात आल्याचे शाह यांनी सांगितले. 

अन्नपदार्थ विकले जातात उघड्यावरच 
अन्न व औषध प्रशासन जरी शहरात विक्री होणारे अन्नपदार्थ सुरक्षित असल्याचा दावा करीत असले तरी प्रत्यक्षात मात्र, हातगाड्यावर व हॉटेल्समध्येही तळलेले पदार्थ उघड्यावरच ठेवले जात असल्याचे आढळून आले आहे. औरंगपुऱ्यात नाल्याच्या बाजूलाच खाद्यपदार्थ, चहा विक्री केली जात आहे. तसेच अनेक हॉटेल्स व हातगाड्यांवर भजे, पोहे, जिलेबी, उघड्यावरच ठेवले जात आहेत. वडापाव सेंटरवरही मोठ्या परातीमध्ये वडाभाव ठेवला जात असून, त्यावर कोणतेही झाकण नसते. रस्त्यावरील धूळ, वाहनांचा धूर या वडापाववर बसतो.  पाणीपुरी ठेवण्यासाठी जी प्लेट वापरण्यात येते ती त्याच घाण पाण्यात धुतली जाते व सर्वांनी हात पुसलेल्या छोट्या टॉवेलनेच ती प्लेट पुसली जाते, असेही दिसून आले आहे. 

खाद्यतेलाच्या किंमतीमध्ये तफावत 
शहरात विविध ठिकाणी खाद्यतेलाच्या किमतीत तफावत आढळून येत आहे. विशेषत: करडी तेल सध्या महाग असून, काही ठिकाणी १५० रुपये तर काही ठिकाणी १२० ते १३० रुपये लिटरने विकल्या जात आहे. या तफावतीमागचे रहस्य काय, असा प्रश्नही ग्राहकांना पडत आहे. दिवाळीच्या वेळेस परराज्यांतून येणारा खवा जप्त केला जातो, पण नंतर वर्षभर एकही कारवाई होत नाही. दोन ते तीन वर्षांतून एकदा निकृष्ट दुधावर कारवाई होते व नंतर काहीच नाही, असा प्रश्नही ग्राहकांमधून विचारला जात आहे. 

अन्नपदार्थ विक्रेत्यांनी काय काळजी घ्यावी
- अन्न व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ नियमानुसार परवाना घेऊन विक्री करावी. 
- असुरक्षित, नकली अशा अन्नपदार्थांचे उत्पादन, साठा, विक्री करू नये. 
- संर्गजन्य व रोगपीडित व्यक्तीस कामावर ठेवू नये. 
- विक्रीसाठी ठेवलेले अन्नपदार्थ झाकून ठेवावे.
- अन्नपदार्थ ठेवण्यासाठीची भांडी गंजमुक्त आवरण असलेली असावीत. 
- अन्नपदार्थांच्या साठवणुकीसाठी कीटक नियंत्रण प्रणालीचा वापर करावा. 
- पिण्याचे पाणी निर्जंतुक केलेले असावे. 
- दुध व दुग्धजन्य पदार्थांची साठवणूक योग्य त्या तापमानात करावी. 

Web Title: World Food Security Day: Foods in the Aurangabad city are safe; Food and Drug Administration Claims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.