जगप्रसिद्ध अजिंठा लेणी ३ वर्षांपासून तहानलेली; पर्यटनमंत्र्यांच्या भेटीनंतरही पाणी दूरच

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 12:10 PM2022-04-18T12:10:07+5:302022-04-18T12:11:31+5:30

जेमतेम पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यात पुरातत्त्व विभागाला यश येत असले तरी लेणी परिसर आणि तेथील साैंदर्यीकरण, हिरवळ बघायला मिळणेही दुरापास्त झाले आहे.

World Heritage Site Ajanta Caves thirsty for 3 years | जगप्रसिद्ध अजिंठा लेणी ३ वर्षांपासून तहानलेली; पर्यटनमंत्र्यांच्या भेटीनंतरही पाणी दूरच

जगप्रसिद्ध अजिंठा लेणी ३ वर्षांपासून तहानलेली; पर्यटनमंत्र्यांच्या भेटीनंतरही पाणी दूरच

googlenewsNext

- योगेश पायघन
औरंगाबाद :
देशातील पहिले जागतिक वारसास्थळ जगप्रसिद्ध अजिंठा लेणी. जवळच वाघूर नदी आणि येथील धबधबा देश-विदेशातील पर्यटकांना भुरळ घालताे. तरीही अजिंठा लेणी गेल्या ३ वर्षांपासून तहानलेली आहे. कारण येथील पाणीपुरवठा गेल्या ३ वर्षांपासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने कापला आहे. याठिकाणी पर्यटनमंत्र्यांनीही भेट दिली. मात्र, अजूनही या लेणीत पाणी पोहोचले नाही. पाणी कधी मिळणार, असा सवाल पर्यटकांकडून उपस्थित केला जात आहे.

पाणीपट्टीची ३.२ कोटींची थकबाकी न भरल्याने २०१९ मध्ये अजिंठा लेणीत जाणारे पाणी कनेक्शन बंद करण्यात आले. त्यामुळे पर्यटकांना जेमतेम पिण्यापुरते पाणी शुद्धीकरण करून भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण उपलब्ध करून देत आहे. मात्र, डोंगररांगातील लेणीतील बाग नामशेष झाली असून पर्यटकांना न्याहरी करून उसंत घ्यायला छोटीशी जागाही इथे नसल्याने पर्यटकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. जेमतेम पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यात पुरातत्त्व विभागाला यश येत असले तरी लेणी परिसर आणि तेथील साैंदर्यीकरण, हिरवळ बघायला मिळणेही दुरापास्त झाले आहे.

पाणी उपलब्धेनंतर बायोटाॅयलेट
पाणी नसल्याने अनेक अडचणींना सामाेरे जावे लागत आहे. पिण्यासाठी आरओचे थंड पाणी एएसआयने उपलब्ध करून दिले आहे. पाणी उपलब्ध झाल्यास दिल्ली मेट्रोच्या धर्तीवरील बायोटाॅयलेट उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
-डाॅ. मिलन कुमार चावले, अधीक्षक, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण, औरंगाबाद विभाग

वीज बिल भरले, पाणीपट्टीही भरू...
लेणीत पाणीपुरवठ्याची एमजेपीची योजना असून गेल्या कोरोनाकाळात निधीची अडचण आल्याने पाणीपट्टी भरता आली नाही. मात्र, पर्यटनमंत्र्यांनी अजिंठा आणि वेरूळ येथील व्हिजिटर सेंटर सुरू करण्यासाठी १० कोटींचा निधी उपलब्ध करून दिला. त्यातून लवकरच पाणीपट्टीचे पैसे भरून पाणी सुरळीतपणे मिळेल.
-विनय वावधानी, कार्यकारी अभियंता, एमटीडीसी

लवकरच तोडगा निघेल...
अजिंठ्यात २००२ पासून ही योजना सुरू असून २०१९ पासून येथील देखभाल दुरुस्तीचे पैसे भरले गेले नाहीत. या विषयावर लवकरच तोडगा निघेल. बोअरवेलचा वापर करीत असून पर्यटकाच्या पाण्याच्या गरजा भागवत आहोत.
-चंद्रशेखर जयस्वाल, उपमहाव्यवस्थापक, एमडीटीसी

हा विषय आमचा नाही...
अजिंठा लेणीतील पाण्याचा विषय हा नगरविकास विभागाचा विषय आहे. यात पाणीपुरवठा विभागाचा संबंध नाही.
-गुलाबराव पाटील, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री

विदेशी पर्यटकांचा आलेख घसरतोय...
वर्ष -भारतीय पर्यटक -विदेशी पर्यटक

२०१६-१७ -३,९३,९८५ -२१,०६२
२०१७-१८ -३,९५,४५६ -२२,७८३
२०१८-१९ -३,५९,१५४ -२६,६८७
२०१९-२० -२,७३,३४४ -२०,०५७
२०२०-२१ -४०,१८७ -५५
२०२१ -२२ -९२,९६१ -२८९

Web Title: World Heritage Site Ajanta Caves thirsty for 3 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.