अजिंठा, वेरूळचा जागतिक वारसास्थळाचा दर्जा धोक्यात! पर्यटकांच्या वाढल्या तक्रारी, तातडीने उपाययोजना करणे गरजेचे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2022 02:14 PM2022-11-26T14:14:01+5:302022-11-26T14:15:27+5:30
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवारी आयोजित ‘पुरातत्त्व स्मारके आणि स्थळेव्याप्ती, आव्हाने आणि पर्यटन’ या विषयावरील विशेष व्याख्यानात ते बोलत होते.
औरंगाबाद : वेरूळ, अजिंठा लेणींना मिळालेला जागतिक वारसास्थळाचा दर्जा धोक्यात आला आहे. यापूर्वी जागतिक वारसास्थळांच्या यादीतून ३ वारसास्थळे काढली आहेत. दिव्यांग, वृद्ध, विदेशी पर्यटकांची आर्थिक लूट, पाकीटमारी, चोऱ्या, लेणीत येणाऱ्या विक्रेत्यांविषयी पर्यटकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे जागतिक वारसास्थळाचा दर्जा धोक्यात आल्याची चिंता भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणचे औरंगाबाद मंडळाचे अधीक्षक डाॅ. मिलनकुमार चावले यांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवारी आयोजित ‘पुरातत्त्व स्मारके आणि स्थळेव्याप्ती, आव्हाने आणि पर्यटन’ या विषयावरील विशेष व्याख्यानात ते बोलत होते.
डाॅ. चावले म्हणाले, ‘जागतिक वारसास्थळाचा मिळालेला दर्जा हा कायमस्वरूपी नसतो. तो टिकवावा लागतो. सध्या भारतातील नैसर्गिक वारसास्थळ असलेले मानस सरोवर आणि सांस्कृतिक वारसास्थळ असलेले हंपी ही स्थळेही ‘डेंजर झोन’मध्ये आहेत.
स्थानिक विक्रेते वेरूळ लेणीत प्रवेश करून विक्री करीत आहेत. तो पुरातत्त्व कायद्यानुसार गुन्हा असून, आम्ही त्यावर कारवाई करण्यास असमर्थ ठरतो.
याविषयी पोलिस अधीक्षकांशी वैयक्तिक चर्चा केली असता त्यांनी गुन्हा घडल्याशिवाय काही करता येणार नसल्याचे स्पष्ट केले. जिल्हा प्रशासनाने त्यावर कारवाई केली पाहिजे.’
लेणीचे पाणी कनेक्शनही कापले -
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने २०१९ मध्ये अजिंठा लेणीत जाणारे पाण्याचे कनेक्शन कापले. त्यामुळे ‘एएसआय’ पर्यटकांना जेमतेम पिण्यापुरते पाणी शुद्धीकरण करून उपलब्ध करून देत आहे, असेही डाॅ. चावले यांनी सांगितले.
लेणीतील चित्रांची हानी
- अजिंठा लेणीतील चित्रे नैसर्गिक रंगांनी बनवलेली आहेत. तेथे रोज पाच ते दहा हजार पर्यटक भेटी देतात. त्यांच्या श्वसनक्रियेमुळे आर्द्रता तयार होऊन तेथे ‘सिल्व्हर फिश’ची (कीटक) उत्पत्ती होऊन ऐतिहासिक चित्रांना हानी पोहोचत आहे.
- पर्यटकांच्या गर्दीवरील नियंत्रणासाठी आम्ही तेथील इंटरप्रिटेशन सेंटर मागत असून, त्यातील चार लेणींच्या रिप्लिकातून पर्यटकांना लेणी समजावून घेता येतील.
२० वर्षांत एकही बैठक नाही...
जागतिक वारसास्थळाच्या आचारसंहितेनुसार दरवर्षी भागधारकांची बैठक होणे क्रमप्राप्त आहे. मात्र, २००२ पासून बैठक झालेली नाही. लेणापूर परिसरात ५०० मीटरच्या बफर झोनमध्ये लेणीच्या वरच्या बाजूने बांधकामे होत आहेत. बफर झोन वाचवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला पाहिजे, असेही डॉ. चावले म्हणाले.