जागतिक मूत्रपिंड दिन : मूत्रपिंड प्रत्यारोपणाची वेळेच येऊ देऊ नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 07:51 PM2020-03-12T19:51:33+5:302020-03-12T19:52:02+5:30

मराठवाड्यात प्रत्यारोपणासाठी ३०८ लोकांना प्रतीक्षा मूत्रपिंडाची

World Kidney Day: Do not let the kidney transplant arrive just in time | जागतिक मूत्रपिंड दिन : मूत्रपिंड प्रत्यारोपणाची वेळेच येऊ देऊ नका

जागतिक मूत्रपिंड दिन : मूत्रपिंड प्रत्यारोपणाची वेळेच येऊ देऊ नका

googlenewsNext

- संतोष हिरेमठ  

औरंगाबाद : औरंगाबाद विभागात म्हणजे मराठवाड्यात तब्बल ३०८ जण मूत्रपिंड मिळण्याच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती पुढे आली आहे. दिवसेंदिवस ही संख्या वाढतच आहे. मात्र, आरोग्याची योग्य काळजी घेतली, तर मूत्रपिंड प्रत्यारोपणाची वेळच येणार नाही, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

दरवर्षी मार्च महिन्याचा दुसरा गुरुवार जागतिक मूत्रपिंड दिन म्हणून पाळण्यात येतो. सामान्य लोकसंख्येच्या ३ पैकी एका व्यक्तीस मूत्रपिंडाचा आजार होण्याची शक्यता असते, अशी माहिती आरोग्य संघटनांच्या आकडेवारीवरुन समोर येते. त्यासाठी अनेक कारणे आहे. मूत्रपिंड निकामी झाल्यानंतर डायलिसिस (रक्तशुद्धीकरण) आणि मूत्रपिंड प्रत्यारोपण या सारखे उपचार करणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरील आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक खबरदारी घेतली, तर डायलिसिस, प्रत्यारोपणाची परिस्थिती टाळणे शक्य असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले.

मूत्रपिंड विकाराची लक्षणे
- भूक मंदावणे.
- थकवा जाणवणे.
- रक्तदाब खूप वाढणे.
- अंगावर सूज येणे.
- मूत्रपिंडातून रक्त, पू जाणे.
- मूत्रपिंडाच्या मागील भागात पाठीत दुखणे.

यांना सर्वाधिक धोका
- मधुमेह असणे.
- उच्च रक्तदाब असणे.
- स्थूलता.
- कुटुंबात एखाद्या व्यक्तीस मूत्रपिंड विकार.

ही घ्या काळजी
- नियमितपणे व्यायाम करणे.
- रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवणे.
- स्थूलता वाढू न देणे.
- रक्तदाब १४०-९० च्या खाली ठेवणे.
- जंकफूड टाळणे.
- विनासल्ला पेनकिलर घेणे टाळण
- रोज किमान अडीच लिटर पाणी पिणे.
- मूतखड्याचा वेळीच उपचार करणे.

असा वाढतोय आलेख
- मराठवाड्यात आॅगस्ट २०१९ मध्ये २७६ रुग्ण मूत्रपिंडाच्या प्रतीक्षेत होते. 
- रुग्णांची संख्या जानेवारी २०२० मध्ये २९३ वर गेली आहे.
- मार्च महिन्याच्या १० तारखेपर्यंत ही संख्या आता ३०८ वर पोहोचली आहे. 

योग्य आहार घ्यावा
मूत्रपिंड विकार टाळण्यासाठी नियमितपणे व्यायाम केला पाहिजे. दररोज २ कि.मी. चालले पाहिजे, शक्य झाले तर धावले पाहिजे. सकस आहार घेतला पाहिजे. वजन नियंत्रणात ठेवले पाहिजे. 
- डॉ. सुहास बावीकर, मूत्रपिंडविकारतज्ज्ञ

विनासल्ला औषधी नको
मूत्रपिंडाच्या कार्यक्षमतेसाठी वर्षातून एका तज्ज्ञाकडून तपासणी करून घेतली पाहिजे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधी, विशेषत: पेनकिलर घेता कामा नये. रोज किमान अडीच लिटर पाणी प्यावे.
- डॉ. रवींद्र भट्टू, मूत्रपिंडविकारतज्ज्ञ 

Web Title: World Kidney Day: Do not let the kidney transplant arrive just in time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.