औरंगाबादच्या साहित्य क्षेत्रातही डोकावतेय ‘विश्व मराठी परिषद’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 06:06 PM2019-07-01T18:06:24+5:302019-07-01T18:09:28+5:30
प्रस्थापित साहित्य संस्थांमध्ये वाढलेले राजकारण सामान्य वाचकांना आणि नवोदित लेखकांना त्यांच्या परिघात फिरकूही देत नाही.
औरंगाबाद : जगभरात असणाऱ्या मराठी वाचकांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने आणि मराठीच्या विकासासाठी व समृद्धीसाठी नवीन तंत्रज्ञान स्वीकारत नव्या युगात नव्या पिढीला सोबत घेऊन काम करण्याच्या उद्देशाने विश्व मराठी परिषद साहित्य क्षेत्रात डोकावू पाहत आहे. पश्चिम महाराष्ट्रात विश्व मराठी परिषद वेगाने वाढत असून, औरंगाबादेतही या परिषदेची सभासद नोंदणी सुरू झाली आहे.
मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसाराचे काम करणाऱ्या प्रस्थापित साहित्य संस्थांमध्ये वाढलेले राजकारण सामान्य वाचकांना आणि नवोदित लेखकांना त्यांच्या परिघात फिरकूही देत नाही. अशा राजकारणाने व्यापलेल्या या संस्था त्यांच्याच विश्वात गुरफटलेल्या असून, त्यांच्या उपक्रमांनाही साचेबद्ध स्वरूप आले आहे. असे असताना नव्या वाचकांनी, नवलेखकांनी व्यक्तव्हायचे कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर तोडगा म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी, ज्येष्ठ प्रकाशक अनिल कुलकर्णी आणि साहित्य सेतूचे प्रा. क्षितिज पटकु ले यांच्या पुढाकाराने या साहित्य संस्थेची निर्मिती झाली आहे.
तंत्रज्ञानाच्या साह्याने जगभरातील मराठी बांधवांमध्ये साहित्यिक, सांस्कृतिक, भावनिक सेतू तयार करणे, त्यांच्या मनामध्ये एक स्फुल्लिंग चेतवणे आणि त्यातून भावी पिढीसाठी समृद्ध वारसा तयार करणे, हे विश्व मराठी परिषदेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.तंत्रज्ञानाच्या बाबतीत प्रस्थापित साहित्य संस्था नेमक्या जेथे मागे पडत आहेत, तोच धागा पकडत विश्व मराठी परिषदेची वेगवान वाटचाल सुरू झाली आहे, अशी चर्चा साहित्य वर्तुळात सुरू आहे.
तंत्रज्ञानाची कास धरून नव्या पिढीला जोडणार
औरंगाबाद शहरातही अनेक नवे लेखक या संस्थेसोबत जोडले जात आहेत. ही संस्था पूर्णपणे काळानुसार पावले टाकणारी आहे. सध्या सर्वांनाच सोयीस्कर ठरणाऱ्या आॅनलाईन माध्यमातूनही व्यक्त होण्याची संधी याद्वारे मिळणार आहे. यामुळे आजची मराठी तरुणाईही प्रामुख्याने या संस्थेसोबत जोडली जाईल. संस्थेच्या कार्यास सुरुवात झाली की महाविद्यालयापासूनच उपक्रमांची सुरुवात केली जाणार आहे. यामध्ये महाविद्यालयांमध्ये ‘ब्लॉग रायटिंग’विषयी विशेष कार्यशाळा घेण्यात येईल. मराठी पुस्तके कींडल, ई- बुक, आॅडिओ बुक या नव्या माध्यमात प्रकाशित करण्याचाही परिषदेचा मानस असून यासाठी नवलेखकांना सर्वतोपरी संस्थेतर्फे मदत करण्यात येईल.
- प्रा. डॉ. वृंदा देशपांडे-जोशी, औरंगाबाद प्रतिनिधी, मराठी विश्व परिषद